Nashik News : ‘स्वच्छ शहर- सुंदर शहर’ नाशिकच्या संकल्पनेमध्ये महत्त्वाची भर घालणारी संकल्पना शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अमलात आणली आहे.
सुरक्षित नाशिकसाठी ‘स्ट्रीट क्राईम’ आणि वूमन सेफ्टीला प्राधान्य देताना यासाठी पोलिस ठाणेनिहाय विविध पथके कार्यान्वित करण्यात आली आहे. (Concept of Panchasutri Assistant Commissioner of Police to prevent crime nashik news)
याकरिता आयुक्त कर्णिक यांनी पंचसूत्रीचा अवलंब केला असून, यातून नागरिकांना केंद्रस्थानी ठेवत पोलिसिंग करण्याची भूमिका घेतली आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील स्ट्रीट क्राइम नियंत्रणासाठी टवाळखोरांना ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका गेल्या महिनाभरापासून सुरू केला आहे.
याअंतर्गत शहरातील महाविद्यालयांसह शाळांबाहेरील आवारात रोडरोमिओंना कारवाईचा दणका देत शहर पोलिसांच्या विविध पथकांकडून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईची मोहीम राबविली. परिणामी महाविद्यालयीन युवतींकडून पोलिसांच्या या भूमिकेचे स्वागत होत आहे. याचप्रमाणे, शहरातील बेशिस्त वाहनचालकांनाही वाहतूक शाखेकडून लक्ष्य केले जात असून, जनजागृती व प्रबोधनासह दंडात्मक कारवाईचाही बडगा उगारला आहे.
तसेच शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी सर्कल अरुंद करणे, एकेरी वाहतूक, वाहनतळाच्या निश्चितीसंदर्भात अंमलबजावणीची प्रक्रिया विशेष पथकांकडून सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील काही सर्कल्सचे रुंदी कमी करण्याच्या कामांना प्रारंभही झाला आहे.
आयुक्तांनी सुरू केलेल्या व्हॉटसॲप हेल्पलाइनवरही आयुक्तांच्या निर्णयांचे स्वागत व केलेल्या कामगिरीला प्रोत्साहन देणारे संदेशच सर्वाधिक येत असल्याने त्यावरूनच आयुक्तांची पंचसूत्री शहरातील गुन्हेगारीला आळा बसण्यास मदतगारच ठरते आहे.
अशी आहे आयुक्तांची पंचसूत्री...
* महिला सुरक्षा (वूमन सेफ्टी) : शहरातील शाळा- महाविद्यालयांचा परिसर, निर्जन रस्ते, कॉलनी परिसरामध्ये ठाणेनिहाय पोलिसिंग आणि गस्त. टवाळखोरांविरुद्ध पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई. गर्दीच्या ठिकाणी निर्भया- दामिनी पथकांची गस्ती.
* टवाळखोरी (स्ट्रीट क्राइम) : रात्री रस्त्यावर धिंगाणा, टवाळखोरी, मोकळ्या मैदानांवर मद्यप्राशन, रेकॉर्डवरील संशयितांची नियमित तपासणी. ऑलआऊट कोम्बिंग ऑपरेशन, एमपीडीए, मोका, तडीपारीच्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे सराईतांना दणका.
* वाहतूक नियोजन : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई. शहरातील एकेरी मार्ग, सिग्नल, सर्कल, कोंडीच्या ठिकाणांचा अभ्यास करून त्यावर ठोस उपाययोजना, विनाहेल्मेट, सीट बेल्टसह ट्रिपल सीट चालक ‘टार्गेट’वर
* सीसीटीव्ही यंत्रणा : स्मार्टसिटीअंतर्गत महिनाअखेर कार्यान्वित होण्याचे संकेत. गुन्हेगारी नियंत्रणासह शहर सुरक्षितता कॅमेऱ्याच्या निगराणीत, गुन्हेगारांवर ठेवता येणार करडी नजर
* एटीएस सेल : पोलिस ठाणेनिहाय दहशतवादी विरोधी कक्ष कार्यान्वित. शहरातील भाडेकरू, हद्दीत घडणाऱ्या घटनांवर या कक्षाकडून ‘वॉच’, संवेदनशील परिसरातील हालचालींची मिळते माहिती, राज्य गुप्तवार्ता विभाग, दहशतवादविरोधी पथकांच्या नियमित बैठका.
''रात्री-बेरात्री घराबाहेर असलेली व्यक्ती सुरक्षित आहे, असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण होतो, तो पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे. शहराच्या सुरक्षिततेसाठी महिला सुरक्षा, स्ट्रीट क्राइम, वाहतूक नियोजन, सीसीटीव्ही व एटीएस सेल या पंचसूत्रीची प्रभावी कामगिरी महत्त्वाची आहे.''- संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.