नाशिक : शहरात नियमित औषधे फवारणी होत नसल्याने त्यास पेस्ट कंट्रोल (Pest control) ठेकेदार कारणीभूत असून, त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच आठ दिवसात डेंगी व चिकूनगुणियाच्या आजारावर नियंत्रण आणाव्या, अशा स्पष्ट सूचना महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिल्या.
शहरात डेंगी (Dengue), चिकूनगुनिया (Chikungunya), मलेरिया (Malaria) आजाराच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर सतीश कुलकर्णी यांनी वैद्यकीय व आरोग्य, मलेरिया व घनकचरा व्यवस्थापन विभाग, बांधकाम विभाग, भुयारी गटार योजना, नगर नियोजन विभाग, अतिक्रमण, पशुवैद्यकीय विभागाच्या प्रमुखांची बैठक महापौर दालनात बोलाविली होती.
परिस्थिती हाताबाहेर
शहरात डेंगी, चिकूनगुनिया, मलेरिया रोगांची परिस्थिती हाताबाहेर गेल्याची कबुली देताना महापौर कुलकर्णी यांनी आरोग्य व वैद्यकीय विभागास जबाबदार न धरता सर्व विभागांनी एकत्रित काम करण्याच्या सूचना दिल्या. येत्या आठ दिवसांत साथरोगांवर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे.
विभागीय अधिकाऱ्यांनी रोज सकाळी आठ ते अकरा या दरम्यान प्रभागांना भेटी देवून पाहणी करण्याच्या सूचना दिल्या.
अशा आहेत सूचना
- अर्धवट बांधकाम झालेल्या व जुन्या इमारतींची तपासणी करावी.
- समाजमंदिर, व्यायामशाळा, अभ्यासिका आदी इमारतींचे आउटलेट तपासावे.
- बांधकामाच्या साइटला भेट द्यावी.
- पाणी साचत असलेल्या ठिकाणी संबंधितांवर दंडात्मक कार्यवाही करावी.
- सर्व सोसायट्यांच्या चेअरमन यांना स्वच्छतेच्या सूचना द्याव्या.
- पाणी साचत असलेल्या इमारतींचे तळघर, पार्किंग धारकांना नोटीस द्यावी.
- पेस्ट कंट्रोल ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी.
- स्मार्टसिटीच्या कामात उघड्या पडलेल्या गटारींचा बंदोबस्त करावा.
- तुटलेले चेंबर, ढापे दुरुस्त करावे.
- गोठ्यांमधील मलमुत्राची पालिकेला जोडले असल्यास कारवाई करावी.
- मोकळे भूखंड स्वच्छ करावे.
पेस्ट कंट्रोलच्या ठेकेदाराचे काम असमाधानकारक
''आठ दिवसात साथीच्या आजारांवर नियंत्रण आणले जाईल. पेस्ट कंट्रोलच्या ठेकेदाराचे काम असमाधानकारक असल्याने दंडात्मक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.'' - सतीश कुलकर्णी, महापौर, नाशिक.
''डेंगी, चिकूनगुनियावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य व वैद्यकीय विभागाला शहरात साफसफाई, तसेच औषध फवारणीच्या सूचना दिल्या आहेत.'' - गणेश गिते, सभापती, स्थायी समिती.
यावेळी अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, उपायुक्त करुणा डहाळे, अर्चना तांबे, अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, शहर अभियंता नितीन वंजारी, कार्यकारी अभियंता संजय घुगे, चंद्रशेखर आहेर, बाजीराव माळी, वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे, संचालक घनकचरा व्यवस्थापन प्रमुख डॉ. आवेश पलोड, जीवशास्त्रज्ञ डॉ. त्र्यंबके, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.