नाशिक : (लासलगाव) यंदा कांद्याचे उच्चांकी उत्पादन झाले. त्यात कोरोनाचा दणका यामुळे कांद्याला मोठा फटका बसला आहे. लासलगाव येथील मुख्य बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी 700 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. तर मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल
मागील वर्षी 23 जुलै 2019 रोजी उन्हाळ कांद्याला सरासरी 1151 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला होता. शुक्रवारी (ता. 24) रोजी 700 रुपये दराने कांदा विक्री करण्याची वेळ शेतकरी बांधवावर आली आहे. कोरोनामुळे शेतात पिकविलेल्या मालाला बाजारपेठ राहिली नाही. खरीप हंगामाची पेरणीसुद्धा कर्जातून केली. चाळीत साठवलेल्या कांद्याला बाजारभाव मिळेल या आशेपोटी कांदा साठवला. सध्या फक्त पाच ते सात रुपये भाव मिळत आहे. मात्र, चाळीतून दुर्गंधी येऊन पाणी बाहेर पडू लागल्याने आता तरी कांद्याला योग्य बाजारभाव द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
कांदा विक्रीशिवाय पर्याय नाही...
17 डिसेंबर 2019 मध्ये कधी नव्हे तो 11 हजार 111 रुपये प्रतिक्विंटल उच्चांकी भाव मिळाला होता. परिणामी, जिल्ह्यासह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली. उत्पादनही मोठ्या प्रमाणात झाले. उन्हाळ्यात पाण्याचे व्यवस्थापन करून कांद्याचे पीक घेतले जाते. हा कांदा जुलै ते ऑगस्टपर्यंत कांदा कांदा चाळीत साठविला जातो. त्यानंतर या कांद्याला चांगला बाजारभाव मिळतो. हे धोरण आखून या भागातील शेतकरी कांदा पिकाचे नियोजन करताना दिसतात. साधारणता जून आणि जुलै महिन्यानंतर कांद्याला मागणी वाढते. परंतु कोरोनामुळे जुलै महिना संपत आला तरी बाजारात कांद्याची अपेक्षित भाववाढ झालेली नाही. त्यामुळे भाववाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या उत्पादकाला अखेर साठवणूक केलेला कांदा बाजारात विक्रीसाठी बाहेर काढावा लागत आहे.
हेही वाचा > निरक्षर आई- बापाची दिव्यांग लेक सुनिताने शेवटी करून दाखवलचं! पालकांचे आनंदाश्रु थांबेना...
केंद्राने नाफेडमार्फत खरेदी केली, कांदा निर्यातीसाठी रेल्वेद्वारे पार्सल व्हेन उपलब्ध करून दिल्या. मात्र भाव सुधारणा काही होतांना दिसत नाही. याकरिता केंद्राने कांदा निर्यात प्रोत्साहन योजना सुरू करावी. जेणेकरून कांदा निर्यातीला चालना मिळेल अशी मागणी व्यापारी वर्गाकडून केली जात आहे. आज लासलगाव येथील बाजार समितीच्या मुख्य आवारावर 1393 वाहनांद्वारे 22 हजार 265 क्विंटल आवक होऊन उन्हाळ कांद्याला किमान 301 रुपये कमाल 961 रुपये तर सरासरी 701 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.
(संपादन - किशोरी वाघ)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.