येवला (जि.नाशिक) : येथील प्रांताधिकारीने शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप महिला तलाठ्याने केला होता. गुन्हा दाखल झाल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. काय घडले नेमके?
महिला तलाठ्याच्या तक्रारीची दखल
प्रांताधिकारी सोपान कासार यांच्यावर दोन दिवसांपूर्वी एका महिला तलाठ्याच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात विनयभंग तसेच, दमदाटी करण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. बदलीस पात्र नसतांनाही कासार यांनी ज्येष्ठतेचे नियम डावलून नांदगाव तालुक्यात बदली केल्याचा आरोप करून या अन्यायकारक बदलीविरोधात पीडित महिलेने मॅटमध्ये धाव घेतली असून, २३ ऑगस्टपर्यंत मॅटने स्थगिती दिली आहे. याच दरम्यान या महिलेने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडेही तक्रार केली होती. शरीरसुखाची मागणी मान्य न केल्याने बदली केल्याचा आरोप केला होता. मात्र, सोमवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. येथील पोलिस ठाण्यात प्रारंभी गुन्हा दाखल करत नसल्याने या महिलेने थेट भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांना संपर्क साधला होता. त्यांनतर सूत्रे हलली अन् कासार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
सूत्रे हलली अन् कासारवर गुन्हा दाखल
तक्रारीत म्हटले आहे की, आपण येवला तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत आहे. कासार यांनी ३ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी २ ते ३ च्या दरम्यान आपणास घरी बोलावून आपल्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असता आपण त्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी आपल्याला नोटीस पाठवली. तुमची विभागीय चौकशी का करू नये, असे म्हणत त्यांनी लेखी खुलासा मागितल्याने आपण त्यास रीतसर उत्तर दिले. तरीही प्रांताधिकाऱ्यांनी आपली बदली तालुक्याबाहेर केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
महसूल विभागात एकच खळबळ
मनमाड विभागाचे पोलिस उपअधीक्षक समिरसिंह साळवे, पोलिस निरीक्षक संदीप कोळी, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खडांगळे यांनी हा गुन्हा दाखल करून घेतला आहे. यापूर्वी येथील दोन प्रांताधिकारी लाचलुचपतच्या कारवाईत अडकले आहेत. त्याच खुर्चीवर पुन्हा एकदा तिसऱ्यांदा प्रांताधिकाऱ्यांवर गंभीर आरोप झाले आहे. यामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून, यानंतरही काही तक्रारदार पुढे येण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.