Sakal Exclusive : ‘कंपनी सेक्रेटरीज्’च्या शिक्षणक्रमात नुकतेच आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल या स्तरावरील प्रत्येकी एक विषय घटवत अधिक सुलभता आणली आहे. यासोबतच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण डोळ्यासमोर ठेवून विविध विषयांचा अंतर्भाव शिक्षणक्रमात करण्यात आला आहे.
वर्षातून दोनदा विविध टप्प्यांवरील स्पर्धा घेतल्या जात असतात.
नियोजित असलेली डिसेंबरमधील परीक्षा सुधारित अभ्यासक्रमावर आधारित राहील, अशी माहिती दि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज् ऑफ इंडियाचे (आयसीएसआय) राष्ट्रीय अध्यक्ष सीएस मनीष गुप्ता यांनी नुकतीच येथे दिली. (CS Manish Gupta information about Implications of subject reducing educational policy in CS nashik news)
‘आयसीएसआय’च्या नाशिक शाखेतर्फे दोन दिवसांपूर्वी झालेल्या कार्यशाळेत मार्गदर्शनासाठी आलेल्या सीएस गुप्ता यांनी विविध मुद्यांवर ‘सकाळ’सोबत बोलताना सविस्तर माहिती दिली. राष्ट्रीय व स्थानिक स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते.
सीएस मनीष गुप्ता म्हणाले, की प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणक्रमातील पुढील टप्प्यात सीएस एक्झिक्युटिव्हकरिता आता आठऐवजी सात विषय असतील. प्रोफेशनल स्तरावरही नऊऐवजी सात विषयांची परीक्षा द्यावी लागेल. या सात विषयांमध्ये प्रत्येक स्तरावर एक विशेष विषयाचा समावेश असेल.
सीएसआर, फॉरेन्सिक ऑडिट यांसह आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) अशा आधुनिक काळाशी सुसंगत विषयांची निवड विद्यार्थ्यांना करता येईल. देश व परदेशातील शाखांचे सक्षमीकरण करण्यावर भर आहे.
स्वमालकीच्या शाखांवर सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी, तसेच परदेशातील केंद्रांचेही सक्षमीकरण केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. या वर्षी नोव्हेंबरमध्ये वाराणसी येथे संघटनेची वार्षिक सभा होणार असून, त्याचे आमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अग्निवीरांसाठी शुल्कमाफी
गुप्ता म्हणाले, की केंद्रीय संरक्षण मंत्रालयासोबत इन्स्टिट्यूटने सामंजस्य करार केला आहे. याअंतर्गत पाच वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या अग्निवीरांना सीएस शिक्षणक्रमाची शंभर टक्के शुल् माफी दिली जाईल. उत्तर-पूर्व राज्यातील तसेच जम्मू-काश्मीर, लडाखच्या विद्यार्थ्यांना शुल्कातील सवलत योजना लागू आहे. तर गुणवत्तेच्या आधारावर देशभरातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात आहे.
जागतिक स्तरावर भारतीय ‘सीएस’ची छाप
जगभरात सुमारे एक लाख पाच हजार सीएस कार्यरत असून, यापैकी केवळ भारतातील सीएसची संख्या ७२ हजार आहे. जागतिक स्तरावर भारतीय सीएस या क्षेत्राचे नेतृत्व करत आहेत. कंपन्यांची संख्या वाढण्यासह ‘सीएस’च्या मागणीतही वाढ होत आहे. सुमारे अडीच लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून, यापैकी काही आंतरराष्ट्रीय स्तरावर सेवा बजावतील.
पश्चिम क्षेत्रात महाराष्ट्राची छाप
‘आयसीएसआय’च्या पश्चिम क्षेत्रांतर्गत येणाऱ्या महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा या पाच राज्यांतून एकूण सुमारे ६५ हजार विद्यार्थी ‘सीएस’चे विविध स्तरावरील शिक्षण घेत आहेत. यापैकी एकट्या महाराष्ट्रातील विद्यार्थी संख्या ४५ हजार असून, पश्चिम क्षेत्रासह राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राने आपली छाप सोडली आहे, असेही गुप्ता म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.