Chakra Puja esakal
नाशिक

Chakra Puja : प्रतीकांच्या माध्यमातून निसर्गाशी एकरूपतेची पूजा

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : नवरात्रोत्सवामध्ये कुलधर्म म्हणून खानदेशात रूढी-परंपरेने चक्रपूजा केली जाते. प्रतीकांच्या माध्यमातून जीवन समृद्ध करणारी ही पूजा निसर्गाशी एकरूप होणारी पूजा आहे. बीजोत्पादनाच्या चाचणीकाळात घटाप्रमाणे या पूजेचेही आगळे-वेगळे महत्त्व आहे. पाचव्या, सातव्या, आठव्या व नवव्या माळेला ही पूजा होते. पूजेनिमित्त खानदेशात गावोगावी ‘अग्या हो, तिसर अग्या हो’ (आज्ञा हो ईश्‍वर आज्ञा हो)चा गजर होईल.

कसमादे (कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा) पट्ट्यात प्रामुख्याने घरोघरी ही पूजा होते. खानदेशातील नोकरी, व्यवसायानिमित्त नाशिकसह अन्यत्र गेलेले रहिवासी कुटुंबासह स्थलांतरित झाले असल्यास नोकरीच्या गावी चक्रपूजा करतात. भाऊबंद व मित्र परिवाराला भोजनाचे निमंत्रण दिले जात असल्याने अनेकांना चक्रपूजेची माहिती झाली आहे. कसमादे पट्ट्यात बारा बलुतेदार चक्रपूजा करतात. सप्तशृंगगडावर चक्रपूजा केली जाते. काही गावांमध्ये नरक चतुर्दशीला (लक्ष्मीपूजन) चक्रपूजा केली जाते. (culture in Khandesh Chakra Puja start from today Nashik News)

...अशी करतात चक्रपूजा

कुटुंबप्रमुख घटासमोर अथवा देवघरात चक्र काढतो. पूजेला पाच जण बसतात. चक्राच्या चारही दिशेला दरवाजे तयार केले जातात. चक्र तयार करण्यासाठी तांदळाचा वापर होतो. तांदळाच्या राशीचे सात चक्र गोलाकार बनविण्यात येतात. या नळ्यामध्ये एक चक्र पांढरे, तर दुसरे चक्र रंगीत तांदळाचे अशी सात चक्र व चोहोबाजूला दरवाजे तयार करतात. तांदूळ, राख, मीठ, उडीद यांचे चार मारुती तयार केले जातात.

अकरा कणकेचे दिवे चक्रावर ठेवून प्रमुख दिवा मध्यभागी ठेवला जातो. त्याला मेंढ्या संबोधतात. कणकेचे हे दिवे कुटुंबातील सदस्यच प्रसाद म्हणून खातात. अन्य निमंत्रितांना शडसान्न सोळा अथवा अकरा पक्वान्नाचे जेवण असते. चक्रपूजेच्या मुख्य जागी अकरा मांडे गोलाकार ठेवून त्यावर दिवे ठेवतात. तत्पूर्वी चक्रावर पूजापत्री ठेवली जाते. पूजापत्रीचे औषधी महत्त्व आहे. घटस्थापनेजवळील अखंड वातेवरून दिवा पेटवून पूजेत मांडणी केलेला प्रमुख दिवा वातेची ज्योत टाकून प्रज्वलित होतो. त्या वेळी देवीचा गजर करण्यात येतो. आरती होते. होम पेटवून पूजा व नवसपूर्ती करतात.

चक्रपूजेसाठी लागणारे साहित्य

अकरा ओंजळ तांदूळ (मोती), अकरा कणकेचे दिवे, पेरू, सीताफळ, आंबे, चाफा, रामफळ, कापूर, उडीद, गुलाल, समीधा, पाच नारळ यांसह विविध प्रकारची वनस्पती व पूजापत्री. अकरा पुरणपोळ्या (मांडे), पुऱ्या, सांजोरी, करंजी, भजी, पापड, कुरडई, मोदक (डाळिंब) यांसह विविध पदार्थ भोजनासाठी रसई, भात, खीर केली जाते.

मात्र पूजेच्या ठिकाणी ते ठेवत नाहीत. प्रसाद म्हणून हरभऱ्याची घुगरी करतात. एकाच दिवशी अनेक ठिकाणी पूजा असल्याने निमंत्रितांनी जेवण न केल्यास त्याला प्रसाद म्हणून हरभरा घुगरी दिली जाते. ग्रामीण भागात गोमूत्र टाकून जागा सारवून शुद्ध करतात. रांगोळी काढली जाते. या जागेवर चाफ्याची पाने ठेवून कापूर प्रज्वलित केला जातो.

श्री दुर्गा सप्तशतीमध्ये उल्लेख

श्री दुर्गा सप्तशतीमध्ये शडसान्न (सोळा पक्वान) पूजेचा उल्लेख आहे. त्याला अनुसरून देवीला प्रसन्न करण्यासाठी ही पूजा केली जाते. चक्र हे देवतांच्या हातातील एक आयुध आहे. स्वतंत्र दैवत म्हणून त्याचे पूजन सुरू झाले. कुलदेवतेचे आगमन, आराधना, भक्ती व शक्तीची उपासना मानून पूजा केली जाते.

प्रतीकांविषयी...

पृथ्वी, चंद्र, सूर्य, कुबेर याप्रमाणे प्रतीकांच्या माध्यमातून विहीर, नदी यांसह निसर्गाशी जवळीक साधणारी जीवन समृद्ध करणारी ही चक्रपूजा आहे. पूर्वी घरोघरी साठवलेले बीज असताना शेतातील माती व पाणी आणून मडक्यात बीज टाकले जाई. बीजोत्पादनाची चाचणी घेण्याची कृषिप्रधान संस्कृतीची पद्धत होती.

वैदिक संस्कृतीचा संपर्क आल्यानंतर देवीचा कौल घेण्याच्या व मातृसत्ताक पद्धतीतून देवीला अधिष्ठान मानून ही पूजा सुरू झाली. सातव्या दिवशी बीजोत्पादनाचा कौल घेतला जात असल्याने सातवी माळ आली. चक्राच्या (पृथ्वी) आकाराचा पोळ्या म्हणून मोठी पुरणपोळी (मांडे) केले जातात. मांड्यांसाठी मागील वर्षी रब्बी हंगामात टाकलेला गहू वापरला जातो. या गहूच्या पुरणपोळ्याही चवदार असतात.

विविध धर्मियांमधील महत्त्व

शैव, शाक्त धर्मियांत विविध प्रकारच्या चक्रपूजा केल्या जातात. उत्तर महाराष्ट्रात अहीर सुवर्णकार समाज कुलदेवी, आसरादेवी व म्हसोबाच्या उपासनेसाठी चक्रपूजा करतात. सुवर्णकार समाजात चक्रासाठी मोठी सजावट करतात. संपूर्ण दिवस सजावट व पूजा होते. बारी समाजात चक्रपूजा रूढ आहे. ते धरित्रीची पूजा मांडतात. शिवकालीन कार्यकाळात सैनिक पावसाळ्यात घरी यायचे. खरीप हंगाम करायचे. सैनिकाला मान म्हणून वीर नाचविले जात. सैनिकाच्या तलवारीचे पाते धारदार असल्याने हे पाते काहीही छाटू शकते. मध्य प्रदेशातील सेंधवा भागात काही ठिकाणी आजही ही प्रथा आहे.

"कुलधर्म, कुलाचाराप्रमाणे सर्व भाऊबंद एकत्र येऊन चक्रपूजा करतात. रूढी-परंपरेनुसार ही पूजा सुरू आहे. पूर्वी देवीला बळी दिला जायचा. आता होम-हवन करून बळी म्हणून कुसमांड फळ (भुईबळ) होममध्ये अर्पण केले जाते. पूजेसाठी वापरली जाणारी पत्री औषधी असते. त्याची माहिती पुढील पिढीला व्हावी, तिचे संवर्धन व पर्यावरण संरक्षण व्हावे, हा या मागचा हेतू आहे."

-किशोर विभूते, पुजारी, मालेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT