Nashik Crime : मखमलाबाद रोडवर महाविद्यालयीन तरुणाला चाकूचा धाक दाखवून सव्वा तोळ्याची सोन्याची चेन ओरबाडून नेल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा तशीच जबरी लुटीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
बुधवारी (ता. २) दुपारी मखमलाबादच्या दिशेने जाणाऱ्या मंडप व्यावसायिकालाही चाकूचा धाक दाखवून दोन तोळ्याच्या सोन्याच्या चेन ओरबाडून चोरटे पसार झाले.
पाठोपाठ घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही शंका उपस्थित केली जात आहे. (Daylight robbery on Makhmalabad Road 2 incidents in 4 days Nashik Crime)
सुजित खांदवे यांचा मुलगा व त्याचा मित्र ३० जुलैला दुपारी क्लासवरून घरी जात असताना घराजवळील नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीवरील दोघा भामट्यांनी त्यांना थांबविले. चाकूचा धाक दाखवून त्याच्या गळ्यातील सव्वा तोळ्याची सोन्याची चेन ओरबाडून ते पसार झाले.
घाबरलेल्या दोघांनी आरडाओरडा केल्यानंतर काही रहिवाशांनी संशयितांचा पाठलाग केला, मात्र चोरटे पसार झाले. ही घटना ताजी असतानाच बुधवारी (ता. २) दुपारी पावणेतीनच्या सुमारास मंडप व्यावसायिक विनोद केकाण यांच्या दुचाकीला दोघा भामट्यांनी दुचाकी आडवी लावून थांबविले.
एकाने चाकूचा धाक दाखवून केकाण यांच्या गळ्यातील दोन तोळ्याच्या सोन्याच्या चेन ओरबाडून घेतल्या. यावर केकाण यांनी आरडाओरडा केल्यानंतर रस्त्याने जाणारे काही वाहनचालक थांबले, मात्र संशयितांनी त्यांनाही थांबू नका, अन्यथा भोसकून टाकेल, असा दम भरल्याने भीतीपोटी त्यांनीही काढता पाय घेतला.
यानंतर चोरटे पसार झाले. जाताना त्यांनी केकाण यांच्या दुचाकीची चावी गवतामध्ये फेकून दिल्याने त्यांना पाठलागही करता आला नाही. त्यावर केकाण यांनी काही मित्र व नातेवाइकांना बोलावून पंचवटी पोलिस ठाणे गाठत याप्रकरणी फिर्याद दाखल केली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
दोन्ही घटनांमध्ये साम्य
मखमलाबाद रोडवर चार दिवसांत घडलेल्या दोन्ही घटना बऱ्याच अंशी सारख्याच दिसून येतात. घटना घडली ते ठिकाण, घटनेची वेळ, दोघा संशयितांचे वर्णन, त्यांनी वापरलेली दुचाकी, चाकू आणि त्यांची मोडस ऑपरेंडी या सर्व गोष्टींमध्ये साम्य असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे दोन्ही घटनांमधील भामटे हे एकच असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पंचवटी पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
एकाच परिसरामध्ये अवघ्या चार दिवसांत भरदिवसा जबरी लुटीच्या दोन घटना घडूनही पंचवटी पोलिसांकडून कोणतीही कारवाई केल्याचे दिसून येत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.