NMC Fraud News: महापालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांकडे असलेला संगणक पासवर्ड कॅशिअरकडे असल्याने जमा झालेली रिसिट पुन्हा रद्द करून आर्थिक अफरातफर होण्याचे प्रकार वाढले आहे. त्यासाठी सर्वोत्तम उपाय असलेली ‘ओटीपी’ प्रणाली महापालिकेकडे उपलब्ध नसल्याने फसवणुकीचे प्रकार घडल्याची बाब समोर आली असून, जवळपास चाळीस लाख रुपयांचा चुना या प्रणालीअभावी लागला आहे.
दिडशे कोटी रुपयांचा विक्रमी टप्पा गाठताना महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञानातील त्रुटीदेखील प्रामुख्याने समोर आल्या आहेत. त्यामुळे विविध करांचा भरणा करताना ओटीपी प्रणाली अमलात आणली जाणार असल्याची माहिती विविध कर उपायुक्त श्रीकांत पवार यांनी दिली. (Deception of Municipal Corporation due to lack of OTP system nashik news)
नाशिक महापालिकेचे सहा विभाग असून, या सहा विभागीय कार्यालयामध्ये घरपट्टी, पाणीपट्टी अशा अन्य शुल्काचा भरणा केला जातो. विभागीय कार्यालयांमध्ये महापालिकेचे रोखपाल नियुक्त करण्यात आले आहे. सिडको विभागीय कार्यालयामध्ये विविध करांचा भरणा झाल्यानंतर तो भरणा बँकेत जमा न करता खासगी कामासाठी वापरल्याचा प्रकार उघडकीस आला.
सिडको विभागात आतापर्यंत २३ लाख ४५ हजार रुपयांचा कराचा हिशोब न लागल्याने संबंधित महिला रोखपालाला निलंबनाची नोटीस बजावण्यात आली आहे. यापूर्वी नाशिक रोड विभागीय कार्यालयात घरपट्टी व पाणीपट्टीचा भरणा झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. नाशिक रोड पोलिस ठाण्यात त्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. लेखा विभागात कार्यरत असलेल्या एका महिलेनेही भरणा न करता पाच लाख रुपये उकळल्याची बाब समोर आली होती.
मागील आठवड्यात विविध कर विभागाकडील भरण्यात ७५ हजार रुपयांची तूट दिसून आली होती. परंतु अधिकाऱ्यांच्या तत्काळ लक्षात आल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याकडून त्याच दिवशी रक्कम वसुल करण्यात आली. वांरवार महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचे प्रकार घडत असल्याने माहिती व तंत्रज्ञानात कमतरता असल्याचे दिसून येत आहे.
...तर बसेल चुकीच्या कामांना आळा
महापालिकेच्या सहा विभागीय कार्यालयांमार्फत विविध करांचा भरणा होतो. संगणक प्रणालीमध्ये विभागीय अधिकाऱ्यांकडे संगणकाचा पासवर्ड असतो. विभागीय अधिकारी रोखपालाच्या जागेवर बसू शकत नाही. त्यामुळे विश्वासू कर्मचाऱ्यांकडे पासवर्ड देण्याची पध्दत आहे. दिवसभरात जमा झालेल्या पावत्या पुन्हा रद्द करून अपहार होत असल्याची बाब विविध कर विभागाच्या लक्षात आली आहे.
संगणक प्रणालीमध्ये भरणा झालेली पावती रद्द करताना वनटाइम पासवर्ड (ओटीपी) प्रणाली कार्यरत झाल्यास पावती रद्द करताना विभागीय अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर ओटीपी संदेश पोचेल. त्यानंतर ओटीपी क्रमांक टाकल्यानंतरच पुढील प्रक्रिया पार पडेल यातून चुकीच्या कामांना आळा घालण्याची संधी आहे. परंतु ओटीपी प्रणाली अमलात आणली जात नसल्याने करोडोंचे व्यवहार करणाऱ्या प्रशासनाच्या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
"मोठ्या प्रमाणात कॅशचे व्यवहार होत असल्याने विविध कर विभागात ओटीपी प्रणालीची नितांत आवश्यकता आहे. यातून महापालिकेची फसवणूक टळणार आहे.'' - श्रीकांत पवार, उपायुक्त प्रशासन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.