Dhule Lok Sabha Constituency 2024 : धुळे लोकसभा मतदारसंघात सध्या तीन उमेदवार आहेत. तथापि महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे व महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्यात सरळ लढत होण्याची शक्यता आहे. २६ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात होईल. डॉ. भामरे महिन्यापासून, तर डॉ. बच्छाव दहा दिवसांपासून गाठीभेटी घेत आहेत.
डॉ. भामरे यांनी धुळे व सटाणा येथे मेळावा घेतला. मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मात्र अद्यापही पक्षांतर्गत गटबाजी शमलेली नाही. डॉ. बच्छाव यांना धुळे व मालेगाव येथून उघड विरोध झाला. दोन्ही प्रमुख उमेदवारांपुढे सक्षम प्रचार यंत्रणा उभारण्याबरोबरच पक्षांतर्गत गटबाजी शमविण्याचे आव्हान आहे. (Dhule Lok Sabha Constituency 2024 internal factionalism marathi new)
महायुतीत धुळ्याची जागा भाजपकडे गेली आहे. विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना पहिल्या टप्प्यातच उमेदवारी जाहीर झाली. त्यांच्या उमेदवारीला देखील प्रचंड विरोध झाला. मालेगावला बॅनरबाजी झाली. अर्धा डझन इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. ते डॉ. भामरे यांच्या प्रचारात अजूनही सक्रिय नाहीत.
यातील काहींना तर अजूनही उमेदवारी बदलण्याची आशा आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर डॉ. भामरे यांच्या विरोधात रान पेटविले जात आहे. यात विरोधकांपेक्षा स्वपक्षातील नाराजांचाच हात असल्याची चर्चा आहे. धुळे व मालेगाव परिसरात भाजपचे तीन ते चार गट आहेत.
अंतर्गत गटबाजीने ऐन लोकसभा निवडणुकीत डोके वर काढले आहे. उघडपणे कोणी बोलत नसले तरी खासगीत मात्र एकमेकांची उणीदुणी काढली जात आहेत. पक्षांतर्गत गटबाजी थांबवून महायुतीतील अन्य घटक पक्षांना बरोबर घेण्याचे शिवधनुष्य डॉ. भामरे यांना पेलावे लागणार आहे.
महाविकास आघाडीत धुळ्याची जागा काँग्रेसकडे आहे. पक्षाने नाशिकच्या माजी महापौर डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली. डॉ. बच्छाव यांची उमेदवारी जाहीर होताच धुळे व मालेगावमधून त्यांना उघड विरोध झाला. उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या मालेगावचे डॉ. तुषार शेवाळे व धुळ्याचे श्याम सनेर यांनी आपापल्या जिल्ह्याच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. (Dhule Political News)
मतदारसंघाबाहेरील परका उमेदवार, अशी टीका काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडूनच होत आहे. डॉ. बच्छाव आठवड्यापासून महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. काही गावांचा त्यांनी दौरा केला. त्यांच्या दौऱ्यापासून काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी चार हात दूरच राहिले. निवडणूकप्रक्रिया सुरू होण्यास अवघ्या काही दिवसांचा कालावधी आहे.
भौगोलिकदृष्ट्या मोठ्या असलेल्या मतदारसंघात कमी कालावधीत पोचण्यासाठी डॉ. बच्छाव यांना कसरत करावी लागेल. त्यातच पक्षांतर्गत नाराजांची त्यांना समजूत काढावी लागले. पक्षांतर्गत गटबाजी शमविण्याबरोबरच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची त्यांना मनधरणी करावी लागणार आहे.
मतदारसंघात डॉ. भामरे यांच्याविरुद्ध असलेली नाराजी कॅच करण्यात डॉ. बच्छाव यांना कितपत यश येते, हेदेखील पाहणे उत्सुकतेचे आहे. याउलट काँग्रेसमधील नाराजीचा फायदा डॉ. भामरे कसा करून घेतात, हेही महत्त्वाचे ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.