नाशिक : नाशिक महापालिका हद्दीत पुन्हा एकदा श्वानांचे निर्बिजीकरण (Disinfection of dogs) होणार आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून श्वान निर्बिजीकरणाचे काम बंद होते. नागरिकांकडून तक्रारी येत असल्याने महापालिकेने (NMC) नव्याने निविदा प्रक्रिया राबवीत पुन्हा निर्बिजीकरणाला सुरवात केली आहे. परंतु, त्याचवेळी निर्बिजीकरणानंतर बेफाम होणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त होण्याची गरज आहे.
शहराच्या विविध भागात भटक्या कुत्र्यांची संख्या दरवर्षी वाढते. काही वेळा नागरिकांवर व लहान मुलांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. यावर उपाय म्हणून शहरातील मोकाट, भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांचे निर्बिजीकरण केले जात आहे. वर्षभरात ११ हजार ५०० श्वानांचे निर्बिजीकरण या संस्थेला करावे लागणार आहे. यासाठी प्रति श्वानासाठी पालिका ६५० रुपये निर्बिजीकरण करणाऱ्या संस्थेला अदा करणार आहे. श्वान निर्बिजीकरणाला सुरवात झाल्यानंतर नागरिकांना त्यांच्या तक्रारीसाठी चोवीस तास सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
दरम्यान, श्वान निर्बीकरणासाठी महापालिका दरवर्षी लाखोंचा खर्च करते. काम पाहणाऱ्या संस्थेला ऍनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया (Animal Welfare Board of India) यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शनाखाली काम करावे लागते. ठेकेदार कंपनीबाबत तक्रार आल्याने पशुसंवर्धन विभागाने काम बंद करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, शहरात २००७ पासून श्वान निर्बिजीकरणाचे काम दिले जाते. दरवर्षी निविदा काढल्या जातात. शहरातील भटके श्वान पकडून त्यांच्यावर विल्होळी येथील महापालिकेच्या जुन्या जकात नाका इमारतीमध्ये निर्बिजीकरण प्रक्रिया पार पाडली जाते. चौदा वर्षात ७८ हजार भटक्या व मोकाट कुत्र्यांवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे महापालिका सांगते. नाशिक रोड विभाग, पंचवटी, सिडको, पूर्व, पश्चिम आदी विभागातून येणाऱ्या तक्रारी सोडवल्या जाणार आहेत.
बेभान कुत्र्यांचा उपद्रव
शहरात निर्बिजीकरणासाठी कुत्रे पकडले जातात, ते चारचाकीत नेले जातात. यथावकाश निर्बिजीकरण होते, पण मूळ प्रश्न मात्र कायमच राहतो. निर्बिजीकरण केल्यानंतर सोडून दिलेले कुत्रे जेव्हा चारचाकी पाहतात, लागलीच अशा चारचाकी वाहनांच्या मागे लागतात. त्यामुळे निर्बिजीकरणातून एक नवाच विषय पुढे येऊ लागला आहे. निर्बिजीकरण करून सोडून दिलेले कुत्र्यांच्या झुंडी चारचाकीच्या वाहनांचे पाठलाग करतात त्यातून अपघात वाढू लागले आहे, याकडे मात्र कुणाचेही लक्ष नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.