Nashik : जिल्ह्यात अल निनो संकट नियोजन, पारा वाढल्याने सुरू असलेली पाणीटंचाई, उष्माघात, उष्णतेची लाट, नरेगाच्या कामावर गटविकास अधिकारी यांचा असलेला बहिष्कार आदी विषयांवर चर्चा होऊन त्यावरील उपाययोजनेचा आढावा होणे अपेक्षित असताना जिल्हा परिषदेच्या समन्वय बैठकीत पुढील वर्षाच्या नियोजनावर, तसेच कामाचा वेग वाढवा यासाठी अधिकाऱ्यांना प्रोत्साहनपर सूचना देण्यात आल्या.
मागील वर्षाच्या कामकाजात मागे असणाऱ्या अधिकाऱ्यांना तंबी देत वेळात कामे करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. (Dose of encouragement to officers in coordination meeting Scarcity heat wave neglect of BDOs NREGA boycott Nashik news)
जिल्हा परिषदेची विभागप्रमुख व गटविकास अधिकारी यांची समन्वय सभा शुक्रवारी (ता. २१) मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीत जलजीवन मिशन योजनेचा आढावा होऊन यात सुरू न झालेल्या कामांवर लक्ष केंद्रित करून या योजना तत्काळ सुरू करण्याबाबत चर्चा झाली.
गत वर्षातील विभागनिहाय नियोजनात मागे असलेल्या कामावर प्रशासनाकडून नाराजी व्यक्त करत, कामात सुधारणा करण्याचे निर्देश या वेळी देण्यात आले. वास्तविक, बैठकीत टंचाई आढावा अन् निनोच्या पार्श्वभूमीवर करावयाचे नियोजन याबाबत चर्चा होणे अपेक्षित होते; परंतु यावर बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, रवींद्र परेदशी, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांसह गटविकास अधिकारी उपस्थित होते.
अधिकाऱ्यांना शाबासकी
शुक्रवारी नागरी सेवा दिन असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी विविध विभागात, योजनेत चांगले काम करणाऱ्या गटविकास अधिकारी, विभागप्रमुख यांचा या वेळी प्रमाणपत्र देऊन गौरव केला.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विष्णू गर्जे, तसेच यंदाच्या मार्च एन्डिंगमध्ये निधी खर्चात आघाडी घेतल्याने लेखा विभागाचा व लेखा वित्त अधिकारी महेश बच्छाव यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. याशिवाय गटविकास अधिकारी यांचाही गौरव झाला.
बदलीपात्र अधिकाऱ्यांना प्रोत्साहनाचे डोस
समन्वय बैठकीत बहुतांश अधिकारी व गटविकास अधिकारी यांचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला असल्याने त्यांनी बदलीसाठी विकल्प भरून दिले असून, त्यांना बदलीचे वेध लागलेले आहेत. पुढील महिन्यात यातील बहुतांश अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत.
असे असताना बैठकीत पुढील वर्षी कामाचे नियोजनावर प्रोत्साहनपर डोस अधिकाऱ्यांना या वेळी देण्यात आले खरे; मात्र पुढील वर्षाचे काम करण्यासाठी हे अधिकारी नसणार आहे. त्यामुळे त्यांच्यापुढे हे प्रोत्साहन कशासाठी, असा प्रश्न अधिकारीवर्गाकडूनच उपस्थित करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.