पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : सणासुदीचे दिवस सुरू झाल्याने सुकामेव्याला (dried fruits) मागणी वाढली असली तरी सुकामेवा मात्र महागला आहे. अफगाणिस्तानमधील (Afganistan) घडामोडींमुळे सुकामेवा मोठ्या प्रमाणावर अडकून पडल्याने नजिकच्या काळात आणखी भाववाढ अटळ मानली जात आहे.
मोठा साठा अडकून पडल्याचा परिणाम
बदाम तर महिनाभरात किलोमागे साडेतीनशे रुपयांनी महाग झाला आहे. जुलैमध्ये साडसहाशेच्या आसपास मिळणाऱ्या बदामसाठी आता किलोमागे एक हजार रुपये मोजावे लागत आहेत. जुलैमध्ये घाऊक बाजारात बदाम ६०० ते ६५० रुपये प्रतिकिलो होते. त्यात वाढ होऊन ऑगस्टमध्ये एक हजार रुपये प्रतिकिलोवर पोचले आहेत. सणासुदीच्या काळामुळे यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काजूचे दर जुलैमध्ये ६६० रुपये किलोवरून ७४० रुपये प्रतिकिलोपर्यंत गेले आहेत. आगामी सण-उत्सव पाहता बदामाची मागणी वाढत आहे. अमेरिकन बदामाचा भारत हा मोठा आयातदार देश आहे. आयात न केल्यास हेच दर लवकरच ११०० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोचतील, असा अंदाज व्यापारी अनिल खाबिया यांनी व्यक्त केला.
नारळातही दरवाढ...
श्रावणतील धार्मिक विधी तसेच सण-उत्सवासाठी नारळ अर्थात, श्रीफळाला अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यामुळेच घरोघरी साजऱ्या होणाऱ्या उत्सवासाठी नारळला मोठी मागणी वाढते. मंदिरे बंद असल्याने नारळाची मागणी असली तरी इंधन दरवाढीचा फटका नारळाला बसला आहे. त्यामुळे नारळाच्या दरात वाढ झाली आहे. दक्षिण भारतातून आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडू येथून नारळाची आवक होते. व्यापाऱ्यांनी नारळांची आगाऊ नोंदणी केली होती. त्यानुसार मागणीप्रमाणे यंदा नारळाचा पुरवठा झाला आहे. मात्र, इंधन दरवाढीचा फटका दराला बसला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नारळाच्या दरात प्रतिनग एक ते तीन रुपयांची वाढ झालेली नाही. मंदिरे बंद असून, २५ टक्के नारळ विक्रीत घट झाली; पण इंधन दरवाढीचा बोजा त्यावर पडला आहे. गेल्यावर्षी एका गोणीचे होलसेल भाव एक हजार ३०० रुपये होते. त्यात आता २०० ते ३०० रुपयांनी वाढ झाली आहे.
शहाळाच्या दराने गाठली फिफ्टी...
कोकणासह राज्यात अतिवृष्टी झाल्याने नारळ उत्पादन प्रदेशात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे काढणी व विक्रीमध्ये खंड पडल्याने बाजारपेठेतील मागणी व पुरवठा यांचे संतुलन बिघडले आहे. शहाळ्याच्या नगामागे १५ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे एका शहाळ्यासाठी ग्राहकांना ५० रुपये मोजावे लागत आहे. शहाळ्याने फिफ्टी गाठल्याने आरोग्यवर्धक शहाळ्याचे पाणी महागले आहे. गेल्या दीड वर्षात पंधरा ते वीस रुपयांवरून ३५ रुपये व आता ५० रुपयांवर शहाळ्याची किंमत पोचली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.