Nashik News : बहुप्रतिक्षित असलेला सिन्नर-शिर्डी (Sinnar Shirdi) राष्ट्रीय महामार्गावरील पिंपरवाडी येथील टोल नाका शुक्रवारी सकाळपासून प्रत्यक्ष कार्यान्वित झाला.
मात्र पहिल्या दिवसापासून नियोजन शून्यतेमुळे हा टोल नाका महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी डोकेदुखी वाढवणारा ठरला आहे. (due Errors in computer system vehicle owners have to pay extra money on sinnar shirdi toll booth nashik news)
संगणकीय प्रणालीमध्ये असलेल्या तांत्रिक अपूर्ततेमुळे वाहनधारकांचे अधिकचे पैसे जात असून स्थानिकांना देखील टोल नाका ओलांडण्यासाठी अनपेक्षित पैसे द्यावे लागत आहेत. टोलनाका परिसरातील गावांमधील वाहनधारकांना टोल आकारण्यात येऊ नये असा आग्रह स्थानिकांकडून केला जात आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्गाचे काम 85% पर्यंत पूर्ण झाल्यामुळे दि. 1 एप्रिल पासून वावी जवळच्या पिंपरवाडी शिवारात टोलनाका सुरू झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र शुक्रवार दि.7 पासून टोलनाका कार्यान्वित करण्यात आला.
मात्र, पहिल्या दिवसापासूनच या टोलनाक्यावर वाहनधारकांना डोकेदुखीचा सामना करावा लागत आहे. टोलनाक्यावर 16 मार्गीका असून त्यापैकी 14 मार्गीका बुथलेस आहेत. फास्टटॅग धारक वाहनांना या मार्गिकांमधून थेट मार्गक्रमण करता येईल. तर येणाऱ्या व जाणाऱ्या लेनमध्ये प्रत्येकी एक बूथ असून तेथे रोखीने पेमेंट स्वीकारण्याची सोय आहे.
अतिशय कमी मनुष्यबळात चालवण्यात येणारा हा टोल नाका असला तरी तांत्रिक चुकांमुळे वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागण्याचे काम पहिल्या दिवसापासून सुरू आहे टोलनाक्यावरून एकेरी फेरी झाली तरी दुहेरी फेरीचे पैसे कापले गेल्याचे प्रकार घडले आहेत.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
स्थानिक वाहनधारकांनी देखील या टोल नाक्यावर आर्थिक लूट करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. स्थानिकां च्या वाहनांना सरसकट टोल माफ करावा अशी आग्रही मागणी वावी, मिरगाव, दुशिंगवाडी, सायाळे, मलढोण, पाथरे, पिंपरवाडी येथील रहिवाशांनी केली आहे.
तर टोल प्रशासनाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा आदेश आल्यानंतरच स्थानिकांसाठी मोफत टोलचा पर्याय देता येईल, तूर्तास स्थानिक छोट्या प्रवासी वाहनधारकांनी 330 रुपयांचा मासिक पास घ्यावा असे सांगण्यात आले आहे. नाशिक-पुणे महामार्गावर शिंदे व संगमनेर येथील टोलनाक्याप्रमाणे स्थानिकांना मोफत प्रवासाची सवलत मिळावी अन्यथा शिर्डी महामार्गावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा परिसरातील वाहनधारकांनी दिला आहे.
वावी येथील फिरोज इनामदार यांची कार शुक्रवारी सकाळी शिर्डीहून येत असताना पिंपरवाडी येथील टोल नाक्यावर त्यांच्या फास्टटॅग मधून 75 रुपये वजा झाले. त्याच दिवशी सायंकाळी त्यांना पुन्हा 40 रुपये वजा झाल्याचा मेसेज आला. वास्तविक इनामदार यांची कार शिर्डीहून आल्यानंतर दिवसभर घरासमोर उभी होती.
मात्र त्यांच्याकडून दुहेरी प्रवास फेरीचे पैसे आकारण्यात आले. श्री. इनामदार यांनी तात्काळ टोल प्लाझाचे ऑफिस गाठत तक्रार केली. झालेली चूक तांत्रिक असल्याचे मान्य करत त्यांना तात्काळ चाळीस रुपये परत करण्यात आले. आपण टोल पासून दोन किलोमीटर अंतरावर होतो म्हणून तक्रार करायला समक्ष आलो. उद्या मुंबई, नाशिकचे वाहनधारक हजारो रुपये खर्च करून पैसे न्यायला परत येतील का असा सवाल श्री. इनामदार यांनी उपस्थित केला.
स्थानिकांना आधार कार्डवर सवलत द्या...
वावी, मिरगाव, दुशिंगवाडी, सायाळे, मलढोण, पाथरे, पिंपरवाडी येथील वाहनधारकांना मासिक पास नको तर आधार कार्ड तपासून मोफत प्रवासाची सवलत द्यावी. राष्ट्रीय महामार्ग विभागाने याबाबत तातडीने निर्णय घेतला नाही तर वरील गावातील वाहनधारक व नागरिक शिर्डी महामार्गावर आंदोलन करतील असा इशारा वावीचे माजी सरपंच विजय काटे यांनी दिला आहे.
टोलनाका सुरू करण्याची माहिती वृत्तपत्रात जाहिराती प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र टोलनाक्यावर लावण्यात आलेले दरपत्रक फलक मात्र कोरे आहेत. कोणत्या वाहनासाठी एकेरी व दुहेरी फेरीचे, तसेच सवलतीचे दर किती रुपये आहेत याची माहिती त्यामुळे वाहनधारकांना मिळत नाही. नाशिकहून येताना शिंदे येथील टोलनाक्याच्या तुलनेत पिंपरवाडी येथील टोलनाक्याचे दर अधिक असल्याने आपली फसवणूक तर होत नाही ना असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे.
"तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर मे ऋषीराज सिंग राठोड या एजन्सीला टोलनाका चालवण्यासाठी देण्यात आला आहे. सद्यस्थितीत स्थानिकांना या टोलनाक्यावर कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सूचनेनुसार 20 किमी अंतरातील स्थानिकांनी 330 रुपये भरून लहान प्रवासी वाहनांसाठी मासिक पास घ्यावा.
परिसरातील स्थानिक वाहनधारकांना मोफत प्रवासाची सवलत राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून आदेश आल्यास देण्यात येईल. टोल नाक्यावर वाहनांना देण्यात आलेली कोणतीही सवलत केवळ फास्टटॅग असलेल्या व टोल प्रशासनाकडे नोंदणी केलेल्या वाहनांनाच मिळेल." - संतोष शेखावत, व्यवस्थापक पिंपरवाडी टोल नाका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.