Nashik News : शिलापूर शिवारात उभारलेल्या केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थेच्या टेस्टिंग लॅबचे काम पूर्णत्वाकडे आहे. या लॅबच्या कामाची पाहणी बुधवारी (ता. २७) खासदार हेमंत गोडसे यांनी केली.
येत्या दोन महिन्यांत लॅबचा केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रारंभ होणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी या वेळी दिली.सध्या इलेक्ट्रिकल उत्पादनाचा दर्जा तपासणीसाठी बंगळूर, भोपाळ येथे जावे लागत असल्याने वेळ आणि आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणात होतो.
नव्या प्रयोगशाळेमुळे महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड आदी राज्यांतील इलेक्ट्रिक उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब प्रकल्पातील प्रयोगशाळेचे काम पूर्णत्वाकडे असून, सर्व काम ऑनलाइन असेल. (Electrical Testing Lab to start soon nashik news)
बुधवारी गोडसे यांनी पाहणी केली. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गणेश कदम, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, शिलापूरचे सरपंच पवन कहांडळ, माजी सरपंच रमेश कहांडळ, सय्यद पिंपरीचे सरपंच भाऊसाहेब ढिकले, विंचूर गवळीचे सरपंच विजय रिकामे, शिलापूर सोसायटीचे चेअरमन गणेश कहांडळ, रमेश कहांडळ आदी उपस्थित होते.
एकलहरेतून थेट वीज
खासदार गोडसे यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे शिलापूर शिवारात १०० एकर जागेत उभारलेली राज्यातील पहिल्या, तर देशातील तिसऱ्या क्रमांकाची ही इलेक्ट्रिकल लॅब असणार आहे. हे काम तीन वर्षांपूर्वी सुरू झाले. कोरोनामुळे प्रकल्पाचे काम मंदावले होते. दीड वर्षापासून प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे.
आता प्रकल्पाचे उद्घाटन होणार असल्याने बुधवारी या प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. प्रकल्पाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रवीण कुमार, राम बाबू, के. एस. वर्मा या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाची माहिती दिली. प्रकल्पासाठी एकलहरे येथून २२० केबीचा वीजपुरवठा घेण्यात आला आहे.
याची होणार तपासणी
नव्याने उभारलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लॅबमध्ये महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, नेपाळ, बांगलादेशातूनही तपासण्यांसाठी इलेक्ट्रिक उपकरणे आणि उत्पादने येणार आहेत. या प्रकल्पामुळे नाशिकची वाटचाल इलेक्ट्रिकल हबच्या दिशेने होईल.
इलेक्ट्रिक तपासणी प्रयोगशाळेत इलेक्ट्रिकल उपकरणे तसेच उत्पादनांचा पॉवर ट्रान्स्फॉर्मर, करंट ट्रान्स्फॉर्मर, पोटेन्शियल ट्रान्स्फॉर्मर, लायटिंग अरेस्टर, ट्रान्स्फॉर्मर ऑइल, विविध कंपन्यांच्या मीटरची गुणवत्ता तपासणी करण्यात येणार आहे. प्रयोगशाळेला बुलेटप्रूफ ग्लास बसविल्याची माहिती प्रकल्पाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रवीण कुमार यांनी दिली.
"केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थेच्या टेस्टिंग लॅबचे काम अंतिम टप्प्यात आहे. डिसेंबरअखेरपर्यंत प्रयोगशाळेचा प्रारंभ होईल. केंद्रीय मंत्री आर. के. सिंग आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रारंभाचे नियोजन आहे." - हेमंत गोडसे, खासदार, नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.