Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यटनाला चालना देण्यासाठी रामायण सर्किट योजनेची घोषणा सन २०१७ मध्ये केली. त्यात नाशिकच्या रामतीर्थासह गोदावरी नदी, तपोवन, सर्वतीर्थ टाकेद यांसह विविध स्थळांच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्यासाठी स्थानिक पर्यटन विकास विभागाकडून स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्यात आला.
परंतु, रामायण सर्किटच्या कोणत्याही हालचाली सध्या नाहीत. त्यामुळे परिसराच्या पर्यटन विकासासाठी सर्वांनाच ‘रामायण सर्किट’ची प्रतीक्षा आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर किंवा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर का होईना, सर्किटच्या कामाचा नारळ फुटणे गरजेचे आहे.
पंतप्रधान मोदी यांनी नेपाळ भेटीदरम्यान भारत व नेपाळच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी रामायण सर्किट योजनेची घोषणा केली. रामायण काळातील संदर्भ व त्यातील प्रसंगानुरूप श्रीरामाचा संबंध आला, त्या दहा राज्यांतील विविध स्थळांशी संबंध आहे. (Everyone is waiting for Ramayana Circuit for tourism development of area nashik news)
पाच हजार ८०० कोटींची योजना असल्याचे त्या वेळी घोषित करण्यात आले होते. सन २०१७ नंतर तीन वर्षांत रामायण सर्किट पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही प्रकल्प उभा राहिलेला नाही. प्रभू रामचंद्रांचा देशात ज्या-ज्या ठिकाणी अस्तित्वाचा इतिहास असेल, अशी ठिकाणे धार्मिकदृष्ट्या केंद्रीय पर्यटन विभागाने स्वदेश योजनेंतर्गत विकसित करण्याचे निश्चित करण्यात आले.
रामायण सर्किट योजना व नाशिकचा जवळचा संबंध आहे. प्रभू श्रीरामचंद्रांचे येथे वास्तव्य होते, त्यामुळे गोदावरी नदी, तपोवन, रामतीर्थ, अन्य मंदिरे, जटायू वध झालेले सर्वतीर्थ टाकेद आदी भागांच्या विकासाला या माध्यमातून चालना मिळेल, अशी अपेक्षा नाशिककरांची होती. हा परिसर आणि धार्मिक स्थळ परिसराचा विकास होऊन नाशिकच्या पर्यटनाला चालना मिळेल. विशेषतः त्याची राष्ट्रीय स्तरावर चर्चा होणार असल्याने देश-विदेशातील पर्यटक त्याकडे आकर्षित होतील.
वाल्मीकी, तसेच अन्य रामायणात वर्णन केलेल्या आणि त्याच्या माध्यमातून प्रभू रामचंद्रांच्या इतिहासाची ओळख सर्वांनाच झालेली आहे. भारतातील त्यांच्या वास्तव्याचा इतिहास रामायण सर्किटच्या माध्यमातून उजळेल, असे स्वप्न दाखविण्यात आले; परंतु ते अद्यापही प्रत्यक्षात उतरले नाही.
रामायण सर्किटमध्ये समाविष्ट भाग
उत्तर प्रदेशमधील अयोध्या, नंदीग्राम, श्रींग्वेरपूर, चित्रकूट, तसेच बिहारमधील सीतामढी, बक्सर, दरभंगा, मध्य प्रदेशातील चित्रकूट, ओडिशातील महेंद्रगिरी, छत्तीसगडमधील जगदलपूर, महाराष्ट्रातील नाशिक व नागपूर, तेलंगणमधील भद्रचालम, कर्नाटकमधील हम्पी, तमिळनाडूतील रामेश्वरम या ठिकाणांची रामायण सर्किटमध्ये निवड करण्यात आली आहे. या सर्किटमुळे धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून अधिक भाविक-भक्त सहभागी होतील व पर्यटनाला चालना मिळणार आहे.
देखरेख कमिटीकडे अहवाल प्रलंबित
नाशिकसाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्रीय पर्यटन विभागाने मागविला होता. केंद्र सरकारला अहवाल सादर करण्यात आला. राष्ट्रीय समितीकडे सादर करण्यासाठी पाठपुराव्यानंतर मंजुरी, त्यानंतर केंद्रीय मंजुरी व देखरेख समितीकडे अहवाल सादर करण्याचे नियोजन होते. सध्या देखरेख समितीकडे अहवाल प्रलंबित आहे.
पंधरा धार्मिक स्थळांची, कागदपत्रांची पाहणी
‘रामायण सर्किट’ योजनेंतर्गत धार्मिक स्थळांच्या पाहणीसाठी केंद्रीय पर्यटन विभागाच्या पथकाने नाशिकमध्ये भेट दिली. पथकाने काळाराम मंदिर, सीतागुंफा, सीताहरण व लक्ष्मणरेषा मंदिर, रामतीर्थ, तपोवन, दंडकारण्य, रामसृष्टी, रामगयातीर्थ, पंचरत्नेश्वर, सीता सरोवर, रामशेज किल्ला, अंजनेरी, सर्वतीर्थ टाकेद, किष्किंदानगरी शुक्लतीर्थ, कावनई कपिलधारा, शूर्पणखातीर्थ आदी १५ धार्मिक स्थळे पाहिली. स्थळांची कागदपत्रे, ऐतिहासिक दाखले आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कोणत्या सुविधा देता येतील, यासंबंधी माहिती पथकाकडून घेण्यात आली. त्या व्यतिरिक्त काम पुढे सरकले नाही.
"रामायण सर्किटचा नाशिक हा अविभाज्य भाग आहे. प्रकल्पासंदर्भात सध्या तरी कुठलेच काम झाल्याचे दिसून येत नाही. स्थानिकांना यासंदर्भात माहिती होणे गरजेचे आहे." - सतीश शुक्ल, अध्यक्ष, पुरोहित संघ, नाशिक
"रामायण सर्किटसंदर्भात काहीच माहिती नाही. ज्यांच्यावर जबाबदारी आहे, त्यांनाही यासंदर्भात कुठलीच माहिती नाही. नाशिकच्या विकासाला चालना देणारा प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे." - सागर वाघचौरे, अध्यक्ष, ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन ऑफ नाशिक (तान)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.