महालपाटणे (जि. नाशिक) : कसमादे परिसरात सध्या उन्हाळ कांदा लागवड जोरात सुरू आहे. कांदा लागवडीसाठी ज्या शेतकऱ्याकडे कांद्याचे रोप निरोगी व चांगले असते त्याचे कांद्याचे उत्पादन दर्जेदार व भरघोस निघण्यास मदत होत असते. देवपूरपाडे (ता. देवळा) येथील प्रयोगशील शेतकरी व पंचायत समितीचे माजी सभापती सुकदेव आहिरे नेहमीच वेगवेगळ्या शेतीपिकांचे दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी तालुक्यात परिचित आहेत. (experimentalism of farmer onion crop in Devpurpade nashik news)
मागीलवर्षी त्यांनी आपल्या एक एकर क्षेत्रात डोंगळे लागवड करून तीन पोती म्हणजे तीनशे किलो कांद्याचे रोप तयार केले होते. सरासरी दोन हजार रुपये किलो दराने त्यांना दोन ते अडीच लाखांच्या आसपास उत्पन्न मिळाले होते. त्यातूनच शिल्लक दीडशे किलो बीयाणाचा वापर घरच्या शेतात कांदा लागवडीसाठी केला.
आज त्यांच्या शेतातील रोप प्रतिकूल हवामानातही जोमात दिसत आहे. रासायनिक खतांना फाटा देत सेंद्रिय खतांचा योग्यप्रकारे वापर, शेतजमिनीची मशागत व योग्य पीक व्यवस्थापन यामुळे हे सहज शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. आज त्यांच्या आठ एकर क्षेत्रात कांदा लागवड रेन पाईप, मल्चिंग पेपरच्या सहाय्याने व ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून पूर्ण झाली आहे. अजून पाच एकर क्षेत्र लागवडीसाठी तयार आहे.
हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...
त्यांच्याकडील कांदा रोपाला शेतकऱ्यांकडून चांगली मागणी आहे. पंधरा ते वीस एकर क्षेत्रावर कांदा लागवड होऊ शकेल, इतके रोप त्यांच्याकडे आज तयार आहे. शेतकरी बांधवांना ते नेहमी ‘फायद्याची शेती’ याविषयी मार्गदर्शन करतात.
वयाची अठ्यात्तरी पूर्ण असून, त्यांचे बायपास झालेले आहे. याही परिस्थितीत ते दिवसभर शेतात मजुरांमागे उभे राहून शेतीची कामे करून घेतात. काळ्या आईची सेवा करण्यात त्यांना आनंद मिळतो. आपण ज्या क्षेत्रात असाल तेथे मन लावून व शंभर टक्के योगदान दिले तर यश मिळतेच, असा मौलिक सल्ला ते देतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.