नाशिक : नाशिकच्या साहित्य क्षेत्रातील संवेदनशील लेखक, प्राध्यापक, प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे यांचे रविवारी (ता. २६) निधन झाले. शहरातील गुरुजी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. वयाच्या ६३ व्या वर्षी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या मागे पत्नी शकुंतला, मुलगा ‘सकाळ’ नाशिक रोडचे प्रतिनिधी हर्षवर्धन बोऱ्हाडे, सून आणि नातू असा परिवार आहे. प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे गेली ४० वर्षे साहित्य क्षेत्रात सक्रिय होते. रयत शिक्षण संस्था, मराठा विद्याप्रसारक संस्थेत ते मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.
सामाजिक प्रश्नांवर लिखाण, साहित्य चळवळींसाठी सतत प्रयत्नशील यांसह अनेक लिहित्या हातांना प्रोत्साहन देणारे साहित्यिक म्हणून त्यांचा सर्वत्र नावलौकिक होता. त्यांचे मरणगाथा (कवितासंग्रह), कडा आणि कंगोरे (व्यक्तिचित्र संग्रह), उजेडा आधीचा काळोख (ललित), देशभक्त शेषराव घाटगे (चरित्र,) विडीची गोष्ट (उद्योगाचे चरित्र), शोध डॉ. वसंतराव पवारांचा, लोकपरंपरेचे सिन्नर ही संपादित पुस्तके प्रसिद्ध आहेत.
अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी सार्वजनिक वाचनालयात विश्वस्त म्हणून काम केले आहे. ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजनात त्यांचा सहभाग होता. त्यांचा अंत्यविधी सोमवारी सकाळी साडेदहाला जेल रोड येथील दसक अमरधाम येथे होणार आहे.
बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपले
शिपायाच्या नोकरीपासून सुरू केलेल्या प्रवासात काहीतरी मोठं करण्याची अन् धाडसी व ठाम निर्णयाचे तत्त्व अंगी बाळगत यशोशिखर गाठत चार दशके साहित्य क्षेत्रात प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे यांचे नाव अधोरेखित होत राहिले.
ते कवी, लेखक, स्तंभलेखक, कार्यकर्ता, विद्यार्थिप्रिय प्राध्यापक अशा विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा अमीट ठसा उमटवणारे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व ठरले. त्यांच्या जाण्याने नाशिकचे साहित्यावर शोककळा पसरली असून, साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
"डॉ. शंकर बोऱ्हाडे हे एक जिंदादिल व्यक्तिमत्त्व होते. संवेदनशील साहित्यिक आणि प्रचंड मोठा संपर्क असणारा सजग सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातला कार्यकर्ता आपल्यातून गेला आहे."- प्रा. दिलीप फडके, अध्यक्ष, सार्वजनिक वाचनालय, नाशिक
"आम्ही पाच वर्ष वाचनालयाच्या कार्यकारिणीत काम केले आहे. त्यांच्या जाण्याने नाशिकच्या साहित्य क्षेत्रातील मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले आहे."
- संजय करंजकर, सांस्कृतिक सचिव, सार्वजनिक वाचनालय नाशिक
"अचूक निरक्षण करत जे समोर दिसतेय ते आणि त्या व्यक्तीच्या मनात खोलवर जे रुतले आहे ते कागदावर अचूक शब्दांत मांडणारा अवलिया. एक रसरशीत माणूस तब्येतीकडे दुर्लक्ष करण्याची एवढी मोठी किंमत मोजेल असं स्वप्नातही वाटले नाही."
- जयप्रकाश जातेगावकर, सार्वजनिक वाचनालय, नाशिक
"नाशिक येथे संपन्न झालेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या आयोजनात आम्ही एकत्रित काम केले, तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा जलालपूर शाखेचे अध्यक्ष म्हणून अनेक वैविध्यपूर्ण उपक्रमांत त्यांचे मार्गदर्शन होते. नाशिकमधील अनेक संस्थांना जोडणारे ते दुवा होते." - विश्वास ठाकूर
"लहानपणापासून साहित्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. अनेक संमेलने, साहित्य चळवळी भरवत साहित्यिक निर्माण केले. वाचनाला नवी दिशा देणारा सामान्य कुटुंबातून आलेला असा उमदा माणूस गेला."- रावसाहेब कसबे, ज्येष्ठ साहित्यिक
"गरजूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणारं व्यक्तिमत्त्व. त्यांच्या जाण्याने माणूस म्हणून जगू पाहणाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय."- श्रीकांत बेणी, अध्यक्ष, वसंत व्याख्यानमाला
"पुढील २५ वर्षांत त्यांच्या हातून अतिशय उत्तम साहित्यनिर्मिती होईल, असे वाटत असताना अचानक प्रवास थांबला. त्यांच्या जाण्याने नाशिक जिल्हा उत्तम साहित्यिकास, उत्तम शिक्षकास मुकला आहे."-प्राचार्य प्रशांत पाटील, राजर्षी शाहू पॉलिटेक्निक नाशिक
"संवेदनशील कवी, साहित्यिक, समिक्षक, सूत्रसंचालक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपलं."
- वसंत खैरनार, संचालक, ज्योती स्टोअर्स
"महाविद्यालयीन जीवनापासून आम्ही कवितेच्या प्रांतात बरोबर मुशाफिरी केली. अनेक नवकवींना बळ देणारा अन् अनेक साहित्यिक घडवणारा एक उपक्रमशील सच्चा आणि धडपड्या साहित्यिक आपल्यातून गेला आहे. असा साहित्यिक पुन्हा होणे नाही."
- रवींद्र मालुंजकर, कवी
"माणसांना माणुसकीच्या भावनेतून जोडणारा अनेकांचा जिवलग गेला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आयुष्य कसे फुलवावे, याचा तो दीपस्तंभ होता. माझ्यापेक्षा वयाने बराच लहान असूनही मलाच त्याच्या मैत्रीचा मोठा आधार वाटायचा."- नरेश महाजन, ज्येष्ठ साहित्यिक
"विडी कामगारांचा इतिहास लिहण्याचं काम त्यांनी केलं. समाजव्यवस्थेबाबत परखड मत मांडणारा लेखक हरपला. "- कॉ. राजू देसले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.