नाशिक / बाणगाव बुद्रुक : शेतीसाठी वीज अखंडपणे मिळण्यासाठी सौर कृषिपंप योजना शेतकऱ्यांना मोलाची ठरत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना 95 टक्के अनुदानावर सौर कृषिपंप वाटप करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे शक्य होणार आहे. नाशिक विभागात नाशिक व नगर जिल्ह्यांत 2019-20 मध्ये एक हजार 840 सौर कृषिपंप कार्यान्वित झाले आहेत.
नाशिक-नगर जिल्ह्यांत एक हजार 840 सौर कृषिपंप कार्यान्वित
राज्यात शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी एक लाख सौर कृषिपंप तीन टप्प्यांत देण्याची योजना नोव्हेंबर 2018 पासून सुरू झाली. पहिल्या टप्प्यात 25 हजार सौर कृषिपंप देण्यास मंजुरी देण्यात आली होती. 25 हजार सौर कृषिपंपांना उच्च दाब वितरण प्रणाली जोडणी दिल्यास 625 कोटी रुपये, तर सौरऊर्जेवर उभारणीसाठी 454 कोटी 72 लाखांचा खर्च येतो. तुलनेत सौर पद्धतीमुळे 170 कोटी 28 लाखांची बचत होणार आहे.
सौरऊर्जेद्वारे शेती उत्पन्नात वाढ
2020-21 या वर्षाच्या अर्थसंकल्पात राज्यात पुढील पाच वर्षांत पाच लाख सौर कृषिपंप वाटपासाठी महाविकास आघाडी सरकारने तीन हजार 254 कोटींची तरतूद केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता विजेवर अवलंबून राहावे लागणार नसून, सौरऊर्जेद्वारे शेती उत्पन्नात वाढ करता येणार आहे.
शेतकऱ्यांना दिवसा शेतीला पाणी देता यावे, यासाठी राज्य शासनातर्फे मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना राबविण्यात येत आहे. कमी दाबाने वीजपुरवठा होणे, वारंवार बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होणे, रोहित्र बिघाड, विद्युत अपघात यांसारख्या गोष्टींपासून मुक्ती मिळणार आहे. पाच एकरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना तीन अश्वशक्ती, तर पाच एकरपेक्षा अधिक जमीन असलेल्या शेतकऱ्यांना पाच अश्वशक्तीचा सौर कृषिपंप मिळणार आहे. सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांना पंपाच्या किमतीच्या दहा टक्के, तर अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना पाच टक्के हिस्सा भरावा लागेल. त्वरित सौर कृषिपंप मिळणार आहेत.
योजनेचे फायदे
- वीजबिल भरण्यापासून कायमची मुक्ती
- पाच वर्षांसाठी सौरपंपाची देखभाल व दुरुस्ती कृषिपंप कंपनी करणार
- सौरपंप संचाचा पाच वर्षांचा विमाही कृषिपंप कंपनी उतरविणार
- संचासोबतच दोन एलईडी बल्ब, मोबाईल व बॅटरी चार्जिंगसाठी सॉकेट मिळणार
योजनेसाठी पात्रता
ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत आहे, मात्र वीजजोडणी झालेली नाही असे सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. योजनेसाठी शेतकऱ्यांना महावितरणच्या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करताना केवळ सात-बारा उतारा व आधारकार्ड या किमान कागदपत्रांची गरज असून, अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधित खात्याचा ना-हरकत दाखला आणि शेतजमीन, विहीर व पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना-हरकत प्रतिज्ञापत्र लागेल.
दृष्टिक्षेपात...
नोव्हेंबर 2018 पासून राज्यात तीन टप्प्यांत एक लाख सौर कृषिपंप उद्दिष्टे
पहिला टप्पा - 25 हजार
दुसरा टप्पा - 50 हजार
तिसरा टप्पा - 25 हजार
यामुळे भारनियमन, वीजबिलाची कटकट मिटली
सौर कृषिपंपामुळे पिकांना वेळेवर पाणी देता येते. उत्पन्नवाढीसाठी उपयुक्त आहे. रात्री-अपरात्री शेतात जाण्याची गरज नाही. यामुळे भारनियमन, वीजबिलाची कटकट मिटली आहे. सौर कृषिपंप योजना आम्हाला वरदान ठरली आहे. 2016 मध्ये सौर कृषिपंप वाटप केलेल्या शेतकऱ्यांना नवीन शासननिर्णय नुसार शेतातल्या घरात विजेसाठी दोन एलईडी बल्ब, मोबाईल व बॅटरी चार्जिंगसाठी सॉकेट मिळावे. - सतीश बोरसे, सौर कृषिपंप लाभार्थी, साकोरा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.