येवला (जि. नाशिक) : मागील वर्षी क्विंटलला विक्रमी १२ हजार रुपये भावाचा पल्ला गाठलेले पांढरे सोने यंदाही असेच उजळेल ही जाणकारांची शक्यता बाजारातील व्यवस्थेने फोल ठरविली आहे. मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी पांढऱ्या सोन्याचे पीक घेतले, पण या हंगामात आठ ते साडेआठ हजार रुपयांचा दर पदरी पडत असून उत्पादन खर्चात विक्रमी वाढ झाल्याने हा दर असून नसल्यासारखा झाला आहे. (Farmers get low money cotton Due to record increase in production costs rate become low nashik news)
त्यामुळे ज्याच्यावर भरवसा ठेवला त्याच पांढऱ्या सोन्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे १२५ ते १५० कोटींना लुटल्याची भावना व्यक्त होत आहे.
मागील महिन्यात बाजारात कापसाला ९ हजारापर्यंत भाव होता. यामध्ये भावात सातत्याने चढउतार पाहायला मिळाला असून आज हा दर जिल्ह्यात मोठी बाजारपेठ नसल्याने खासगी व्यापाऱ्यांकडून आठ हजाराच्या आसपास दिला जात आहे. तर खानदेश व विदर्भात आठ हजार ५०० रुपयांदरम्यान कापसाला भाव मिळत आहे.
राज्यात अद्यापही हवा तसा कापूस शेतकऱ्यांनी बाजारात आणला नाही. कापसाच्या गाठीसह आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस दरात चढउतार होत आहे. त्यामुळे कापसाच्या भावातही सातत्याने घसरण होत आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या अपेक्षाप्रमाणे कापसाला भाव नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
सरकारने आयतीवर बंदी घालून आयात शुल्क वाढवण्याचा पर्याय सांगितला जात असून सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आज मोठ्या अडचणी उभ्या आहेत. सरकारने आयात बंदी केल्यास अथवा त्यावर शुल्क वाढविल्यास देशातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकणार आहे.
हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस
मजुरीचा खर्च दुप्पट वाढला
१९९० च्या दशकापासून जिल्ह्यातील मालेगाव, नांदगाव, येवला या तीन तालुक्यात कापसाची विक्रमी लागवड होत आहे. किंबहुना खानदेशच्या शेजारील या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला देखील २००० च्या दशकात कापसाने झळाळी दिली आहे, हे विसरता येणार नाही.
मात्र कालौघात कापसावर कीटकनाशके, मशागत, खतांसाठी मोठा खर्च वाढला असून वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने मजुरीचा खर्च दुप्पट वाढला आहे. यामुळे सध्या मिळालेल्या दरातून खर्चही निघत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत. १०-१२ वर्षापूर्वी जिल्ह्यातील सरासरी ४२ ते ४५ हजार हेक्टरवर लागवड होणारा कापूस आता ३२ ते ३६ हजार हेक्टरवर खाली आला आहे.
मागील वर्षी भावाला झळाळी मिळाल्याने यंदा जिल्ह्यात दीड ते दोन हजार हेक्टरने क्षेत्र वाढले परंतु, पुन्हा एकदा भावाने घात केल्याने शेतकऱ्यांचा संताप व्यक्त होत आहे. खानदेश मध्ये यंदा विक्रमी आवक वाढली असून अद्यापही अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे. कदाचित पुढे भाव वाढतील. पण सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातील गणित विस्कळित झाल्याने भाव पडले असून शेतकऱ्यांना कोट्यवधीचा फटका सहन करावा लागला हे नक्की.
मालेगावात वाढले क्षेत्र!
यंदा भावामुळे कपाशीचे क्षेत्र देखील कमी जास्त झाले. मालेगाव तालुक्यात तब्बल चार ते पाच हजार हेक्टर क्षेत्रात अचानक वाढ झाली. अशीच वाढ नांदगाव तालुक्यातही झाली आहे. त्या तुलनेत येवलेकरांनी मात्र पांढऱ्या सोन्याला टाटा करून कांद्याकडे आपला मोर्चा वळविलेला दिसला. येवल्यात पाच हजाराहून अधिक हेक्टरने क्षेत्र घटले आहे. सिन्नरमध्ये देखील थोडेफार असलेल्या क्षेत्रातही घट झाली आहे. मात्र, सरासरी ३९ हजार हेक्टरच्या आसपास यंदा कापसाचे पीक घेतले गेले आहे.
"मागील वर्षीप्रमाणे यंदाही १२ हजाराच्या वर कापूस विकायला पाहिजे होता. या अपेक्षेने यंदा क्षेत्र वाढले आहे. अनेक देशांतून आजही कापसाला मागणी असून बफर स्टॉक देखील संपलेला आहे. गाठीचे भावही घटलेले आहे. एकीकडे मागणी आहे का तर दुसरीकडे भाव पडल्याची परिस्थिती दिसते. त्यामुळे सरकारने यात हस्तक्षेप करून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी धोरण ठरविण्याची गरज आहे." -अशोक कुळधर, शेती अभ्यासक, येवला
जिल्ह्यातील कापसाचे क्षेत्र
तालुका - सरासरी क्षेत्र - होणारी लागवड
मालेगाव – २५७९८ – २५६७१
नांदगाव - ७८२४ – ८९५२
सिन्नर - १२७० – ४९६
येवला - ११०३९ – ३६९१
बागलाण - ११६ – ७६
एकूण - ४६०४८ – ३८९०२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.