'पूर्वेच्या देवा नित्यनेमाने उगवा अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा’, ही कविवर्य महानोरांची काव्यपंक्ती उगविणाऱ्या दिवसाला काहीतरी चांगले करण्यासाठी साद घालते. मात्र, २०२३ या सरणाऱ्या वर्षातील उगवणाऱ्या दिवसांनी येवलेकरांना फक्त दुःख, वेदना आणि नुकसानच दिले.
शेतीमालाचे पडलेले भाव आणि दुष्काळामुळे २ ते ३ हजार कोटींच्या झळा शेतकऱ्यांना व बाजारपेठेला सहन कराव्या लागल्या. राजकीय पटलावर नेत्यातील सुंदोपसुंदी, गटबाजी प्रकर्षाने दिसली. शिवाय आख्खे वर्षच टंचाईच्या वणव्यात गेले. (Farmers hit reservation movement All round damage to Yeola people Nashik News)
२०२३ उजाडले तेच नैसर्गिक आपत्तीत. सततचे ढगाळ हवामान, अवकाळी पावसामुळे रब्बीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. शिवाय उन्हाळ कांद्याचे विक्रमी उत्पादन घेऊनही पडलेल्या भावामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले.
खरिपात पुन्हा एकदा उभे राहू, हे स्वप्न जून-जुलैत रूसलेल्या पावसाने हवेत विरले. केवळ रिमझिम पाऊस झाल्याने पेरण्या सुरवातीपासून अडगळीत अडकल्या, त्या शेवटपर्यंत. कपाशी, मका, कांदे, सोयाबीन शेतातच पावसाअभावी करपले.
अनेकांनी उभ्या पिकात नांगर फिरविला. सर्वाधिक ३६ हजार हेक्टरवर मकाची पेरणी झाली होती. मात्र, हे पीक बहुतांशी प्रमाणात चाऱ्यापुरतेच आले. सोयाबीन, मूग, भुईमूग या पिकांचा फक्त सांगाडा शेतात दिसला.
खरीप गेला, पण सरतेशेवटी पाऊस आल्यास रब्बी फुलेल, ही अपेक्षाही पावसाच्या अवकृपेमुळे केवळ स्वप्नात राहिली. परिणामी, दोन्ही हंगामातून शेतकऱ्यांना हजार कोटींची झळ बसली. येथील बाजार समितीत मागील वर्षी ६४४ कोटींचा शेतमाल विक्री झाला होता.
या वर्षी अवघे ५०० कोटींपर्यंत विक्री पोचली. शेतकऱ्यांनी प्रतिकूलतेवरही मात करत शेतकऱ्यांनी कांद्याचे पीक घेतले. पडलेल्या बाजारभावामुळे मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला.
वर्षभर पाणीटंचाई
२०२२ मध्ये चांगला पाऊस झाल्याने यंदा फेब्रुवारीपर्यंत जलस्रोतांना पाणी होते. नंतर अचानक टंचाई जाणवू लागल्याने मार्चपासूनच उत्तर-पूर्व भागात टॅंकरने पाणीपुरवठ्याची मागणी सुरू झाली.
प्रशासनाच्या ‘तूतु- मैमै’मध्ये १२ एप्रिलला तालुक्यात टँकर सुरू झाले ते अव्यातपणे आजही सुरू आहे. आठ महिन्यांपासून पावसाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा सुरू राहिला किंबहुना दिवाळी टँकरच्या पाण्यावरच झाली.
मंदीचा फटका बाजारपेठेला
या वर्षातील मंदीचा फटका येवल्याच्या बाजारपेठेलाही बसला.वर्षभरात गणेशोत्सव, दिवाळी या दोनच सणाला बाजारपेठेत काहीसे नवचैतन्य दिसले.
दुष्काळ असूनही दिवाळीत कोट्यावधीची उलाढाल व्यावसायिकांना दिलासा देणारी ठरली तर करोडोंची उलाढाल होणाऱ्या पैठणी व्यवसायाला मात्र वर्षभर घरघर राहिली.दुष्काळी परिस्थितीमुळे लगीनसराई मंदावली असून आता तर बाजारपेठेत थंडावाच आहे.
राजकीय पटलावर सुंदोपसुंदी
राज्याच्या सत्तेत राष्ट्रवादीतील एक गट सहभागी झाल्याने तालुक्याला मंत्रिपद मिळाले. नेत्यांमधील गटबाजी व सुंदोपसुंदी प्रत्यय या वर्षीही आला.
जिल्हा मजूर फेडरेशनच्या निवडणुकीतील दुभंगलेली मने, बाजार समितीच्या निवडणुकीतही पडलेले दोन गट, आरोप-प्रत्यारोप चर्चेचे ठरले. खरेदी- विक्री संघाची निवडणूक बिनविरोध झाली. मात्र, चार जागांवर झालेल्या निवडणुकीतही नेत्यांची गटबाजी दिसून आली.
आरक्षणामुळे राज्यात चर्चा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाची सर्वाधिक चर्चा येथे झाली. गावोगावी साखळी उपोषण, रास्ता रोको, गावबंदीचे फलक, कार्यालयातील प्रतिमा फोडो आंदोलने झाली.
विकासाला मिळाले कोट्यवधी
विविध विकासकामांना कोट्यवधींचा निधी उपलब्ध झाला. पुणेगाव-डोंगरगाव कालव्याच्या आस्तरीकरणाच्या कामाला मिळालेली गती दिलासादायक ठरली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.