gynecology and obstetrics esakal
नाशिक

Female Health : स्त्रीरोग, प्रसूतीशास्त्र काळानुसार बदलते वास्तव!

सकाळ वृत्तसेवा

"सुमारे ४२ वर्षांपूर्वी मी जेव्हा वैद्यकीय व्यवसायाला सुरवात केली, तेव्हा नाशिक शहरात स्त्रीरोगतज्ज्ञांची संख्या हातांच्या बोटांवर मोजण्याएवढी होती. आज नाशिक स्त्रीरोग संघटनेचे ३४२ सदस्य आहेत. याव्यतिरिक्त अनेक जनरल प्रॅक्टिशनर्स मॅटर्निटी होम चालवत आहेत. ते जमेस धरले, तर नाशिक महापालिका क्षेत्रात किमान ५०० लहान-मोठ्या रुग्णालयांमध्ये स्त्रीरोग व प्रसूती शाखेची सेवा उपलब्ध आहे. खासगी क्षेत्राव्यतिरिक्त शासकीय रुग्णालये, महापालिकेची रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, कॅन्टोन्मेंट, सिक्युरिटी प्रेस, धर्मादाय, औद्योगिक क्षेत्रातील आदी रुग्णालये आहेत, ती वेगळीच." - डॉ. रवींद्र शिवदे, एम. डी., डी. जी. ओ.

पूर्वी तालुक्याच्या ठिकाणी एमबीबीएस डॉक्टर क्वचितच आढळायचे. आज तालुक्याच्या ठिकाणी, तसेच मोठ्या गावांमध्ये स्पेशालिस्ट, सुपरस्पेशालिस्ट बस्तान मांडून बसले आहेत. यात स्त्रीरोग तज्ज्ञांचाही भरणा आहेच. बरेचसे आयुर्वेदिक, होमिओपॅथिक डॉक्टरही प्रसूतिगृहे चालवितात.

शासनाच्या आरोग्य सेवेतही लक्षणीय भर पडली आहे. नवीन ग्रामीण रुग्णालये व तेथे वाढत्या आधुनिक सुविधा असे चित्र सध्या दिसत आहे. अर्थात, चाळीस वर्षांत लोकसंख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे.

परंतु लोकसंख्येच्या मानाने वैद्यकीय सुविधांमध्ये कित्येक पटीने वाढ झालेली दिसते. हे चित्र वरवर पाहता छान दिसते. पण रुग्णांच्या दृष्टीने, विशेषतः गरीब रुग्णांच्या दृष्टीने ते खरोखरच सुखद व लाभदायक आहे का, याचाही विचार केला पाहिजे.

पुढील विवेचन संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला लागू पडणारे आहे, पण स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र ही वैद्यकशास्त्राचीच एक शाखा असल्यामुळे अपरिहार्यपणे ते त्या शाखेलाही लागू पडते. त्यासाठी वेगळे विवेचन करण्याची गरज नाही.

संपूर्ण वैद्यकीय विश्वात सुष्टदुष्ट स्वरूपाचे अनेक बदल ४०-५० वर्षांत झाले आहेत. The only constant in life is change है हैरॅक्लिटस्चे वचन अक्षरशः खरे ठरले आहे. वैद्यकीय क्षेत्रात तर खूप झपाट्याने बदल होत असतात. आधुनिक वैद्यकशास्त्र हे आयुर्वेदाप्रमाणे पोथीनिष्ठ नाही. वीस वर्षांपूर्वीची पुस्तके कालबाह्य होतात.

शस्त्रक्रियेची तंत्रे व उपकरणे ही दहा-वीस वर्षांत बदलतात. हे प्रवाहीपणच आधुनिक वैद्यकशास्त्राचे बलस्थान आहे. त्याच्याच बळावर आधुनिक वैद्यकशास्त्र, म्हणजेच अॅलोपॅथी ही उपचारपद्धती आज जगात सर्वोत्कृष्ट म्हणून मान्यता पावली आहे.

वैद्यकीय शास्त्रात पुस्तकी बदल तर होतातच, पण भोवतालची राजकीय, सामाजिक व आर्थिक परिस्थितीही वैद्यकीय विश्वात मोठे बदल घडवून आणते. हे बदल चांगले आणि वाईट असे दोन्ही स्वरूपाचे असतात. दोन्ही बाजू आपण तपासून पाहूया.

परिस्थितीची काळी बाजू

एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात तंत्रे कालबाह्य झाली तरी तत्त्वे कालबाह्य होत नाहीत.

हिप्पोक्रेटस्चे औषधोपचारांचे पुस्तक कालबाह्य झाले, पण ‘First do no harm’ हे तत्त्व कालबाह्य होणार नाही. इंडियन आर्मीच्या रायफली व रणगाडे कालबाह्य होतात, पण ‘The safety, honour and welfare of your country first’ हे तत्त्व कधीच कालबाह्य होणार नाही.

मग वैद्यकीय व्यवसायाचे असे शाश्वत तत्त्व कोणते आहे.? ‘वैद्यकीय व्यवसाय हा व्यापार नसून सेवा आहे’ हेच ते तत्त्व... पूर्वीही वैद्यकीय सेवा विनामूल्य नव्हती. पण पैसा, प्रतिष्ठा, सन्मान या गोष्टी सेवेच्या अनुषंगाने येत होत्या.

आता काय चित्र आहे? भारत सरकारने वैद्यकीय व्यवसायाचे मूळ तत्त्वच कालबाह्य ठरवून टाकले. ते वर्ष होते १९९५... जेव्हा वैद्यकीय व्यवसायाला ग्राहक संरक्षण कायद्याच्या दावणीला बांधले गेले.

एकदा रुग्ण म्हणजे गिऱ्हाईक हे निश्चित झाले, की व्यापाराची सगळी तत्त्वे वैद्यकीय व्यवसायाला आपोआपच लागू होतात. तो ‘नोबल प्रोफेशन’ राहातच नाही. जणू ‘हिप्पोक्रेटस्’च्या शपथेऐवजी सरकारने डॉक्टरांना पुढीलप्रमाणे नवीन शपथ दिली-

‘मी एक व्यापारी. क्लिनिक हे माझे दुकान. रुग्ण माझे गिऱ्हाईक, वैद्यकीय उपचार हा माझा माल. तो विकून मी जास्तीत जास्त नफा कमावण्याचा प्रयत्न करीन’.

वैद्यकीय व्यवसायाचे मूळ तत्त्वच कालबाह्य करण्याचा प्रयत्न झाला व त्याचे परिणाम डॉक्ट, रुग्ण व सर्व समाजालाच भोगावे लागले. यानंतर वैद्यकीय व्यवसायाचे झपाट्याने व्यापारीकरण झाले. त्याची फळे डॉक्टरांवरील हल्ले, हुल्लडबाजी, कोर्टबाजी, या रूपाने आपण पाहतच आहोत.

आज वैद्यकीय व्यवसाय पूर्णपणे कॉर्पोरेशन्स, मोठ्या व्यापारी कंपन्या, इन्शुरन्स कंपन्या, फार्मास्यूटिकल कंपन्या यांच्या ताब्यात गेला आहे. डॉक्टर इच्छेने किंवा अनिच्छेने त्यांचे कर्मचारी झाले आहेत.

एलियाहू गोल्डरॅटने ‘द गोल’मध्ये सांगितल्याप्रमाणे कोणत्याही कंपनीचे ध्येय ‘भांडवल गुंतवणे व त्यावर नफा कमावणे’ इतकेच असते. या परिस्थितीत रुग्णाची ससेहोलपट होणारच, अगदी इस्ट इंडिया कंपनीने भारत देशाची केली तशी.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सद्यःपरिस्थितीत कशीबशी तग धरून राहिलेली छोटी खासगी रुग्णालये, जिथे थोडीफार आपुलकी शिल्लक होती, तीही जाचक नियमांच्या वरवंट्यात सापडून बंद पडण्याच्या मार्गावर आहेत आणि सरकार व कार्पोरेट्स् यांना हेच हवे आहे.

यातच भर पडली आहे, राजकीय वरदहस्त लाभलेल्या, शिक्षणसम्राटांनी चालवलेल्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची. प्रचंड कॅपिटेशन फी भरून डिग्री घेऊन बाहेर पडणाऱ्या डॉक्टरांकडून समाज कोणत्या सेवेची अपेक्षा ठेवू शकतो? त्यांची मानसिकता ही व्यापारीच असणार.

वैद्यकीय व्यवसायाची ही काळी बाजू- (त्यातून स्त्रीरोगतज्ज्ञही सुटलेले नाहीत), दिवसेंदिवस गडद होत चालली आहे. याचा सरकार, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत आणि वैद्यकीय क्षेत्राचे नेतृत्व करणारी मंडळी यांनी एकत्र बसून विचार केला पाहिजे. नाही तर या क्षेत्राकडे गुणवान विद्यार्थी वळणे बंद होईल.

परिस्थितीची पांढरी बाजू

जरी वरीलप्रमाणे परिस्थिती पाहून निराशेचे काळे ढग दाटून येत असले, तरी त्यांनाही थोडी रूपेरी कडा आहे. एकूणच महिलांचे, गर्भवतींचे व नवजात शिशूंचे आरोग्य ४०-५० वर्षांत चांगलेच सुधारले आहे, यात तीळमात्र शंका नाही.

आकडे काय सांगतात? १९८० मध्ये मातामृत्यू दर एक लाख गर्भवतींमागे ६७७ होता तो २०२० मध्ये २७ पर्यंत आला आहे. हे श्रेय कुणाचे? मुख्यतः सरकारी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे. अंगणवाडी, आशासेविका, परिचारिका, डॉक्टर, सुधारलेली दळणवळणाची साधने आणि जनजागृतीदेखील.

सरकार आरोग्यासाठी पुरेसे बजेटच देत नाही, अशी ओरड आहेच. भ्रष्टाचार आहेच, तरीही चांगले काम होत आहे हे निश्चित!

नवजात शिशू मृत्यूदरातही अशीच स्पृहणीय घट झाली आहे. २०२३ मध्ये दरहजारी २६ असलेला हा दर १९८० मध्ये दरहजारी १९४ होता. मी प्रॅक्टिसला सुरवात केली, तेव्हा एक हजार ग्रॅमच्या खालची बाळे जगत नसत.

आता ५०० ग्रॅमची बाळेही घरी जातात. ही सुधारित इन्क्युबेटर्स, अँटिबायोटिक्स, स्टरिलायझेशन टेक्निक आदींची किमया आहे. वंध्यत्वावरील उपचार, दुर्बिणीची शस्त्रक्रिया, सोनोग्राफी, गर्भपाताची तंत्रे या सगळ्यात प्रचंड क्रांती झाली आहे.

पाच महिन्यांपर्यंतचे गर्भपात प्रोस्टाग्लैडिनमुळे सुरक्षित झाले आहेत. क्रिटिकल केअरमुळे गर्भापस्माराचे रुग्ण वाचू लागले. रक्तस्रावाने मृत्यूचे प्रमाणही खूप कमी झाले. या सगळ्याला मुख्यत्वे वैद्यकीय शास्त्रातील संशोधन कारणीभूत असले, तरी आपल्या देशातील स्त्रीरोगतज्ज्ञांचे ज्ञान व कौशल्य यांचाही सिंहाचा वाटा आहे.

सीझेरियन्सचे प्रमाण वाढले आहे हे निश्चित! पण त्यामागे आर्थिक कारण नसून बदलती सामाजिक परिस्थिती हे मुख्य कारण आहे. लग्न उशिरा होणे, संतती उशिरा होणे, शारीरिक श्रमाचा अभाव आणि समाजाची बदलती मानसिकता, यामुळे नैसर्गिक प्रसूती न होणे किंवा डॉक्टरांकडूनही गुंतागुंतीची नैसर्गिक प्रसूती टाळणे ही सीझेरियनच्या वाढीची मुख्य कारणे आहेत.

भारतीय डॉक्टर जगात अग्रगण्य आहेत, हे परदेशात तर सिद्ध झालेच आहे. आपल्याच देशातील जनतेने ते ओळखण्याची गरज आहे.

चाळीस वर्षांतील बदलत्या परिस्थितीचा हा लेखाजोखा मी मांडला आहे. वैद्यकीय व्यवसायातील अनिष्ट प्रवृत्ती वाढत जातील काय? की वैद्यकीय व्यवसायास पूर्वीसारखे सन्मानाचे दिवस येतील? काळाच्या उदरात काय दडले आहे? पांढरी बाजू काळीवर मात करेल, की उलटे होईल? हे सांगता येणे कठीण आहे.

कसेही असो, वैद्यकीय व्यावसायिकांनी निष्ठेने मानवी मूल्यांची जपणूक करीत आपले कर्तव्य करीत राहिले पाहिजे आणि समाजानेही सध्याची आत्मघातकी प्रवृत्ती सोडून वैद्यकीय व्यावसायिकांना योग्य ती सुरक्षा, मानसन्मान दिला पाहिजे, तरच ही कोंडी फुटू शकेल हे निश्चित!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde: ''विनोद तावडे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्यावर हल्ला झालाय'' फडणवीस अखेर बोललेच

Vinod Tawde Video: ''हितेंद्र ठाकूर यांनी मला गाडीमध्ये सगळं सांगितलंय'' भाजप नेत्याने टीप दिल्याच्या आरोपावर तावडे स्पष्टच बोलले

यंदा 70 टक्क्यांहून अधिक होईल मतदान! 2014 मध्ये 10.49 लाख तर 2019 मध्ये 12.16 लाख मतदारांनी केले नाही मतदान; 5 वर्षांत सोलापुरात वाढले 4.14 लाख मतदार

Vinod Tawde: ''अप्पा मला वाचवा!'' विनोद तावडेंनी खरंच 'तो' मेसेज केला का?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT