Film theater land and Nashik  esakal
नाशिक

Nashik Cultural Development : चित्रपट-नाट्यभूमी अन्‌ नाशिक

सकाळ वृत्तसेवा

''साहित्य क्षेत्राबरोबरच नाशिकने चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातही नावलौकिक मिळवला आहे. चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या चित्रपटनगरीत नाशिकच्या अनेक कलाकारांनी नावलौकिक मिळवला आहे. त्यांच्यामुळे समृद्ध झालेली नाशिकची परंपरा गंगेप्रमाणे अहोरात्र वाहत असल्याचे दिसून येते.'' (Film theater land and Nashik sakal anniversary special article news)

नाशिकमधून भारतीय चित्रपटसृष्टीची सुरवात

नाशिकचे भूमिपुत्र व चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी १९१३ मध्ये ‘राजा हरिश्चंद्र’ चित्रपट बनवून भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर २९ वर्षांनंतर आलेल्या नर्गिस व सुनील दत्त यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मदर इंडिया’ या हिंदी चित्रपटाला पहिला ऑस्कर वारीचा मान मिळाला.

या ‘मदर इंडिया’ चित्रपटाच्या काही भागांचे चित्रीकरण नाशिकमधील गंगा घाटावर झाले होते. तेव्हापासून नाशिक जिल्ह्यात अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. अमिताभ बच्चनच्या ‘खाकी’पासून ते नवजोद्दिन सिद्दिकीच्या बदलापूर व आमीर खानच्या ‘पिके’ चित्रपटांचे चित्रीकरण नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांत झाले आहे.

आत्ताच काही महिन्यांपूर्वी किरण राव दिग्दर्शित हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण नाशिक जिल्ह्यामध्ये झाले. तसेच आताही जोया अख्तर दिग्दर्शित एका हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण दोन महिन्यांपासून नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांत सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चित्रपट व मालिकांचे चित्रीकरण होत असल्यामुळे अनेक कलाकार व तंत्रज्ञ यांना रोजगार मिळत असून, कलाकारांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण आहे.

मुंबई व पुणेनंतर झपाट्याने वाढणारे शहर म्हणजे नाशिक. चित्रपट व मालिकांचे चित्रीकरण हे जास्त प्रमाणात मुंबई किंवा पुण्यात होते. परंतु या दोन्ही शहरांच्या जवळ असणारे शहर म्हणजे नाशिक. नाशिक हे निसर्ग संपन्नतेने नटलेले शहर असून, दळणवळणाच्या दृष्टीने सोपे आहे. त्याचबरोबर या ठिकाणी गड-किल्ले, प्राचीन मंदिरे, गंगा गोदावरी नदी, पशू-पक्ष्यांचा वावर, धरणे या गोष्टी मोठ्या प्रमाणात आहेत. चित्रीकरणासाठी लागणाऱ्या या गोष्टी सहज नाशिकमध्ये उपलब्ध होतात.

तसेच या ठिकाणी कलाकार मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे त्यांना चित्रपट व मालिकांमध्ये चांगले पात्र साकारायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यात अनेक मराठी चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. नुकताच नाशिकचे लेखक प्राजक्त देशमुख यांनी लिहिलेल्या ‘गोदावरी’ या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. ‘गोदावरी’ चित्रपटाचे चित्रीकरण नाशिकमध्ये झाले आहे.

तसेच अनेक मालिकांचे चित्रीकरणही नाशिकमध्ये होत आहे. ‘सुंदर मनामध्ये भरली’ या मालिकेने नुकतेच एक हजार भाग पूर्ण केले. त्याचे सुरवातीपासून ते आत्तापर्यंतचे सर्व चित्रीकरण नाशिकमध्ये मखमलाबाद या ठिकाणी झाले आहे. तसेच ‘लग्नाची वाइफ वेडिंगची बायकू’, ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकांचे चित्रीकरण नाशिकमध्ये झाले आहे. आता टीव्हीवर सुरू असलेल्या ‘योगयोगेश्वर जय शंकर’ व ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मराठी मालिकांचे चित्रीकरणही नाशिकमध्ये सुरू आहे.

नाशिकच्या भूमीने अनेक कलाकार दिले आहेत. त्यात दत्ता भट व नीलकांती पाटेकर यांच्यापासून ते आताच्या कल्याणी मुळे, अभिजित खांडकेकर, अनिता दाते, चिन्मय उदगीरकर, नेहा जोशी, सायली संजीव, अक्षय मुदावडकर, मृणाल दुसानीस, चेतन वडनेरे, सिद्धार्थ बोडके व इतर अनेक कलाकार चित्रपट व मालिकांमध्ये मुख्य भूमिकांमध्ये झळकत आहेत. दिग्दर्शन क्षेत्रातही नाशिकने अनेक दिग्दर्शक दिले आहेत.

त्यात प्रामुख्याने नाव घेता येईल ते राजीव पाटील यांचे. त्यांनी अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले व त्यातील काही चित्रपटांना राष्ट्रीय पारितोषिकेही मिळाली आहेत. जोगवा, पांगिरा व ७२ मैल-एक प्रवास हे त्यांचे चित्रपट खूप गाजले. तसेच आताच्या घडीला सुहास भोसले, सचिन शिंदे, भगवान पाचोरे, संतोष प्रभुणे असे इतर अनेक दिग्दर्शक आपल्या दिग्दर्शनतून चित्रपट करत आहे व अनेक पुरस्कारही मिळवत आहेत.

काही दिग्दर्शकांनी हिंदी चित्रपटांचेही दिग्दर्शन केले आहे. नाशिकमध्ये चित्रपट, कथा-पटकथा लिहिणारे ही लेखक आहेत. त्यात दत्ता पाटील, देवेन कापडणीस, प्राजक्त देशमुख व इतर अनेक लेखक आहेत, ज्यांनी चित्रपटांसाठी लेखन केले आहे. तसेच मालिकांचे लेखन श्रीपाद देशपांडे, बाळकृष्ण तिडके व इतर अनेक लेखकांनी केले आहे. मराठी चित्रपटांना व मालिकांना संगीत देण्याचे काम नाशिकमधील अनेक संगीतकारांनी केले आहे. कवी प्रकाश होळकर व कवी मिलिंद गांधी अशा अनेक कवींनी चित्रपटांसाठी गीतलेखन केले आहे.

नाट्यपरंपरा

नाशिकने वि. वा. शिरवाडकर आणि वसंत कानेटकर यांच्यासारखे महान लेखक रंगभूमीला दिले. वि. वा. शिरवाडकर व वसंत कानेटकर यांनी मराठी रंगभूमीला अनेक दर्जेदार नाट्यकृती दिल्या. वि. वा. शिरवाडकर यांनी भाषांतर, रूपांतर, चित्रपटावरून नाटक, नटाच्या जीवनावरून नाटक, भाषांतर रूपांतर अशी विविधपूर्ण नाटके लिहिली.

‘नटसम्राट’ या नाटकाने इतिहास रचला. या नाटकामुळे डॉ. श्रीराम लागू यांची ओळख सर्वदूर पसरली. काही वर्षांपूर्वी ‘नटसम्राट’ या नाटकावर ‘नटसम्राट’ हा चित्रपट येऊन गेला.ज्यामध्ये नाना पाटेकर यांनी प्रमुख भूमिका होती. वसंत कानेटकर यांनी सामाजिक, व्यक्तित्व प्रदान आणि चरित्रवान अशी नाटके लिहिली व त्यात व्यावसायिकता जपली.

‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या वसंत कानेटकरांच्या नाट्यकृती अजरामर झाल्या. नाट्यक्षेत्रात चार दशके अतुल्य योगदान देणाऱ्या प्रा. वसंत कानेटकर यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. एचपीटी महाविद्यालयात ‘वसंतोत्सव’ कार्यक्रमात वसंत कानेटकर यांचे नातू अंशुमान कानेटकर यांनी सांगितले, की लवकरच ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे नाटक आता इंग्रजीमध्ये येणार आहे.

नाशिकमध्ये वि. वा. शिरवाडकर, वसंत कानेटकर यांच्यानंतर विवेक गरुड, दत्ता पाटील, भगवान हिरे, श्रीपाद देशपांडे, प्राजक्त देशमुख, शंतनू चंद्रात्रे व इतर लेखकांनी पुढील लेखनाची जबाबदारी सांभाळली आहे. या लेखकांनी अनेक नाटकांचे लेखन केले असून, त्यांनी अनेक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे.

बऱ्याच प्रसिद्ध नाट्य महोत्सवांमध्ये त्यांची नाटकं सादर झाली आहेत. नाशिकच्या व्यावसायिक रंगभूमीवर क्रांतिचक्र, खंडोबाचं लगीन, विच्छा माझी पुरी करा, गाढवाचं लग्न, बगळ्या बगळ्या कवडी दे, रिमझिम रिमझिम, हंडाभर चांदण्या ही नाटके आली. आता सध्या रंगभूमीवर प्राजक्त देशमुख यांचे नाटक खूप गाजत आहे. प्राजक्त देशमुख यांच्या ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाने २९ पेक्षा अधिक पुरस्कार पटकावले आहेत.

तसेच अनेक हिंदी व मराठीतील दिग्गज कलाकारांनी ‘संगीत देवबाभळी’ या कलाकृतीचे कौतुक केले आहे. यामध्ये नसरूद्दिन शहा यांनीही ‘संगीत देवबाभळी’ बघून संपूर्ण टीमचे कौतुक केले होते. नाशिकमधून अनेक नाटके व्यावसायिक रंगभूमीवर गेली. पण संगीत नाटकात एवढे मोठे यश फक्त ‘संगीत देवबाभळी’ या नाटकालाच मिळाले.

तसेच दत्ता पाटील यांचे ‘तो राजहंस एक’ व ‘कलगीतुरा’ ही नाटके रंगभूमीवर गाजत असून, ‘तो राजहंस एक’ यामधून मानसिक आरोग्यावर भाष्य केले आहे, तसेच ‘कलगीतुरा’ यातून लोककलेवर भाष्य केले आहे. लवकरच दत्ता पाटील यांचे दगड आणि माती हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर येत आहे. त्याचबरोबर नवीन लेखक शंतनू चंद्रात्रे यांचे ‘देवमाणूस’ हे नाटकही व्यावसायिक रंगभूमीवर गाजत आहे.

हे नाटक सत्य घटनेवर असून, यामध्ये वेगवेगळ्या कलांचा सुरेख वापर केला आहे. नाशिकच्या रंगभूमीला नावरूपास आणण्यात नाशिकच्या अनेक दिग्दर्शकांचा वाटा आहे. प्रा. रवींद्र कदम, सुरेश गायधनी, मुकुंद कुलकर्णी, संतोष प्रभुणे, सचिन शिंदे, प्राजक्त देशमुख, प्रवीण काळोखे, महेश डोईफोडे, प्रशांत हिरे, सुनील देशपांडे, जयेश आपटे तसेच अनेक ज्येष्ठ दिग्दर्शक व तरुण दिग्दर्शक आहेत.

आत्ता रंगभूमीवर गाजत असणारे नाटक ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाचे दिग्दर्शन प्राजक्त देशमुख यांनी केले आहे. ‘तो राजहंस एक’ व ‘कलगीतुरा’ यांचे दिग्दर्शन सचिन शिंदे यांनी, तर ‘देवमाणूस’ याचे दिग्दर्शन जयेश आपटे यांनी केले आहे.

राज्य नाट्य स्पर्धा, विविध नाट्य मंडळ, प्रयोग परिवार, लोकहितवादी मंडळ, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, प. सा. नाट्यगृह, कालिदास कलामंदिर नाट्यगृह असे अनेक घटक नाशिकच्या रंगभूमीला चालना देत आहेत. बालनाट्य एकांकिका, महाविद्यालयीन एकांकिका यातूनही अनेक नाटककार तयार होत आहेत. सार्वजनिक वाचनालय हे एकांकिका व बालनाट्य स्पर्धा घेऊन कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देते.

अखिल भारतीय नाट्य परिषद, नाशिक शाखा दर वर्षी एकांकिका स्पर्धा घेऊन कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देते. राज्य नाट्य स्पर्धा कलाकारांसाठी आशा व आकांक्षा निर्माण करणारे चांगले व्यासपीठ आहे. अनेक मोठ्या कलाकारांनी राज्य नाट्य स्पर्धेतूनच सुरवात केली आहे.

राज्य नाट्य स्पर्धेमुळे अनेक लेखक तयार झाले, दिग्दर्शक मिळाले. अभिनेते व अभिनेत्री पुढे आल्या. यामध्ये दत्ता भट, नीलकांती पाटेकर यांच्यापासून ते आताच्या नेहा जोशी, अनिता दाते, अक्षय मुदावडकर, सिद्धार्थ बोडके, सायली संजीव यांच्यासारखे तरुण कलाकार राज्य नाट्य स्पर्धेने पुढे आणले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT