नाशिक : दूरस्थ शिक्षण देणाऱ्या व राज्यभर विस्तार असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रवेशाची प्रक्रिया पूर्णत्वाकडे आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये चार लाख ६० हजार १३५ विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांना प्रवेश निश्चित केले आहेत. प्रवेश अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना येत्या शुक्रवार (ता.१८) पर्यंत शुल्क भरून प्रवेश घेण्याची मुदत असेल. विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली होती. (Four half lakh admissions in YCMOU this year Nashik News)
'ज्ञानगंगा घरोघरी' हे ब्रीदवाक्य घेताना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दूरस्थ शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. मुक्त विद्यापीठातर्फे नुकताच शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. याअंतर्गत प्रारंभी नियमित शुल्कासह प्रवेशाचा पर्याय उपलब्ध करून दिलेला होता. विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, याकरिता दुसऱ्या टप्यात शंभर रुपये विलंब शुल्कासह प्रवेशाचा पर्यायदेखील उपलब्ध करून दिला होता. व वेळोवेळी प्रवेश निश्चितीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. ही वाढीव मुदत मंगळवारी (ता.१५) संपली आहे. राज्यभरातून या संपूर्ण मुदतीत चार लाख ६० हजार १३५ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरून निर्धारीत शुल्क भरलेले आहे.
पाच लाखांहून अधिक नोंदणी
प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या पाच लाख २० हजार ६२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी वैयक्तिक माहिती भरण्याची प्रक्रिया चार लाख ९८ हजार ४१६ विद्यार्थ्यांनी पूर्ण केली होती. यापैकी चार लाख ९३ हजार ५३२ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरला होता. यापैकी चार लाख ६० हजार १३५ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून प्रवेश निश्चित केले.
शुल्कासाठी शुक्रवार, प्रवेश मान्यतेसाठी रविवारपर्यंत मुदत
कृषी शिक्षणक्रम, शालेय व्यवस्थापन पदविका, बी.एड., बी.एड. (विशेष) व एम.ए. (शिक्षणशास्त्र) आदी शिक्षणक्रमांव्यतिरिक्त उर्वरित अभ्यासक्रमांची मुदत मंगळवारी संपुष्टात आली आहे. संपूर्ण भरलेल्या प्रवेश अर्जाचे ऑनलाइन प्रवेश शुल्क भरण्यासाठी शुक्रवार (ता.१८) पर्यंत मुदत दिलेली आहे. तर प्रवेश अर्जास अभ्यासकेंद्र मान्यतेसाठी रविवार (ता.२०) पर्यंत मुदत असेल, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज विहित मुदतीत निवडलेल्या अभ्यासकेंद्रावर सादर करत प्रवेशास अभ्यासकेंद्राची मान्यता घ्यावी, असेही विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे नमूद केले आहे.
विभागीय केंद्रनिहाय झालेले प्रवेश असे-
विभागीय केंद्र प्रवेशीत विद्यार्थी
नाशिक ६८,१५४
मुंबई ३६,४६८
पुणे ७२,६५६
अमरावती ७२,१०३
नांदेड ७५,६२२
औरंगाबाद ४४,५७३
नागपूर ५८,८५५
कोल्हापूर ३१,५५९
विद्यापीठ मुख्यालय १२७
एकूण ४,६०,१३५
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.