सटाणा : 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...' चा जयघोष, ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, फुले व गुलालाची उधळण करीत शहर व परिसरातील हजारो गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला काल गुरुवार (ता.२८) रोजी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला.
शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्य विसर्जन मिरवणूक रात्री उशिरा तब्बल नऊ वाजता सुरु झाली. जामा मशिदीसमोरील किरकोळ अपवाद वगळता सर्व मिरवणुका शांततेत पार पडल्या. गणरायाला निरोप देण्यासाठी शहरवासीयांचा आनंद ओसंडून वाहत होता. (Ganesh Visarjan 2023 Ganesh Visarjan procession concludes in unprecedented atmosphere in Satana nashik)
श्रीहरिओम पतसंस्थेतर्फे किशोर भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली ठेंगोडा (ता.बागलाण) येथील गिरणा नदीपात्राच्या विसर्जनासाठी तराफावर मूर्ती घेऊन जाताना तर दुसर्या छायाचित्रात नदीच्या खोल पाण्यात गणेश मूर्त्यांचे विधिवत विसर्जन करताना जीवरक्षक दलाचे कार्यकर्ते.
शहरातील मानाच्या मालेगाव रोड गणेश मित्र मंडळाने थेट विसर्जन मिरवणुकीत सहभाग न घेता यंदा ‘हाई झुमकावाली पोरं...’ अहिराणी गीत फेम विनोद कुमावत व राणी कुमावत या युवा कलाकारांचा लाईव्ह शो, भव्य स्टेज लेझर लाइट शारपी शो आणि महाराष्ट्र फेमस दास साऊंड, डीजे सचिन यांचा डिजे सादर केला, तर लाडशाखीय वाणी समाज मंडळाने पारंपारिक वारकर्यांच्या वेशभूषेत टाळ मृदुंगाच्या ताल धरीत विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला, हेच प्रमुख आकर्षण ठरले.
विसर्जन मार्गावर जामा मशिदीसमोरच यंदा पहिल्यांदाच मुस्लिम पंच कमिटी आणि मुस्लिम बांधवांकडून गणपती मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले नाही.
गणपती बाप्पाच्या जयघोषाने सटाणा शहर दुमदुमून गेले होते. शहरातील तब्बल अनेक नामवंत मंडळांनी थेट मुख्य मिरवणुकीत सहभागी न होता बुधवार (ता.२७) रोजी तर काल गुरुवार (ता.२८) रोजी सायंकाळी तर रात्री उशिरा सर्व मानाच्या गणपतींचे ठेंगोडा (ता.बागलाण) येथील गिरणा नदीपात्रात विसर्जन झाले.
पर्यावरणपूरक विसर्जन व्हावे यासाठी पालिका प्रशासनासह सामाजिक संघटनांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत भाविकांनी शेकडो गणेशमुर्त्या विसर्जनासाठी दान दिल्या. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा शहरातून आजपर्यंत अवघ्या २६ मंडळांचीच नोंदणी झाली होती.
दरवर्षी तहसील कार्यालयाच्या आवारात सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्व मंडळे एकत्रित येऊन मिरवणूकीची सुरुवात करतात. मात्र शहराच्या इतिहासात प्रथमच मुख्य मिरवणुकीस तब्बल नऊ वाजता सुरुवात झाली.
शहरातील ओम शिवतीर्थ गणेश मंडळ, राजमाता आहिल्यादेवी चौक मित्र मंडळ, कॅप्टन चौक मित्र मंडळ, जय भद्रा मित्र मंडळ, कचेरी रोड मित्र मंडळ, गेस्ट हाऊस मित्र मंडळ, आर.एन. मित्र मंडळ, वीर सावरकर गणेश मित्र मंडळ, पिंपळेश्वर रोड गणेश मित्रा मंडळ या प्रमुख मंडळांनी आपापल्या गणेशमूर्ती सजविलेल्या ट्रॅक्टर ट्रोलीसह ढोल ताशे, बॅंड, तसेच इतर वाद्य व रोषणाईसह ताहाराबाद नाक्यावर सायंकाळी साडेआठ वाजेपासून आणण्यास सुरुवात केली.
काही गणेश मंडळांनी रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी न होता सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपले गणेश विसर्जन आटोपले. तर काही मंडळांनी पाचव्या, सातव्या दिवसानंतर आपापल्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले.
उर्वरित गणेश मंडळे पारंपारिक विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाली होती. तहसील आवारापासून (कै.) पं.ध.पाटील चौकमार्गे विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरून ढोल ताशांच्या गजरात एकेक गणेश मंडळ पुढे सरकू लागले.
रस्त्याच्या दुतर्फा विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी महिला, लहान बालके आणि गणेश भक्तांची अलोट गर्दी उसळली होती.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील, उज्वलसिंग राजपूत, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रेय राऊत, विजया पवार आदींसह पोलीस पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील चार फाटा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मिरवणूक पोहोचताच प्रत्येक मंडळातर्फे महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जात होते.
यावेळी फटाक्यांची आतषबाजी आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ व ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’ असा जयघोष करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यानंतर पुतळ्याला वळसा घालून मिरवणूक मुख्य बाजारपेठेतून जामा मशिदीकडे निघाली.
यावेळी मिरवणुकीतील पहिला गणपती जामा मशिदीसमोर येऊन ठेपताच गणेश भक्तांनी एकच जल्लोष केला. दरवर्षी जामा मशिदीसमोर मुस्लीम पंच कमिटी व मुस्लीम बांधवांनी मिरवणुकीतील प्रत्येक मंडळाचे जल्लोषात स्वागत केले जाते.
मात्र यंदा पहिल्यांदाच मुस्लीम समाजातर्फे कोणत्याही मंडळाचे स्वागत करण्यात आले नाही. जामा मशीद परिसरात जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे, तहसिलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, तलाठी जयप्रकाश सोनवणे, नगरसेवक राहुल पाटील, माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ, शिवसेनेचे जयप्रकाश सोनवणे, नगरसेवक काकाजी सोनवणे, पंकज सोनवणे, सुमित वाघ आदींसह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान तालुक्यासह परिसरात गणरायाला घराघरातुन मोठ्या श्रध्देने व जल्लोषपुर्ण वातावरणात अभिवादन आणि विघ्नहर्त्याला पुढच्या वर्षी लवकर येण्याची आर्जव करत साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला.
दरवर्षी विविध सामाजिक उईपक्रम राबविणार्या लाडशाखीय वाणी समाज मंडळाने यंदा बॅंड आणि डीजे सारख्या कर्णकर्कश आवाजाला व वाद्याला फाटा देत पारंपारिक वारकर्यांच्या वेशभूषेत टाळ मृदुंगाच्या ताल धरीत विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला.
टाळ मृदंगाला प्राथमिकता देत गणरायाला निरोप दिल्याने मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बाळगोपाळांनी इतर मंडळांसमोर एक आदर्श निर्माण केला असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ठेंगोडा (ता.बागलाण) येथील गिरणा नदीपात्रात मूर्ती विसर्जनावेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी येथील श्रीहरिओम पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली ठेंगोडा व लोहोणेर ग्रामस्थांच्या सहकार्याने गेल्या चोवीस वर्षांपासून जीवरक्षक दल तैनात केले जाते.
गिरणा नदीपात्रात सटाणा शहरासह बागलाण व देवळा तालुक्यातील हजारो भाविकांनी आपापल्या गणेशमूर्त्यांचे विसर्जन केले. यावेळी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर भांगडिया, सर्व संचालक मंडळ व सामाजिक कार्यकर्ते स्वत: उपस्थित राहून गणेशभक्तांना मार्गदर्शन करीत होते.
नागरिकांची संभाव्य गर्दी टाळण्यासाठी गिरणा नदीपात्रात थेट गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली होती. जीवरक्षक दलाच्या मदतीने सर्व लहान मोठ्या गणेशमूर्तींचे नदीपात्रातील खोल पाण्यात विसर्जन करण्यात आले.
यावेळी श्रीहरिओम पतसंस्थेतर्फे आलेल्या भाविकांसाठी नाश्त्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत गणरायाचे विधिवत विसर्जन बघण्यासाठी गिरणा पुलावर भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी देवळा पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.