Vadala Gaon  esakal
नाशिक

Nashik News: वडाळागाव...काल आणि आज; गुन्हेगारीमुळे वडाळागावच्या वैभवाला गालबोट

स्वातंत्र्यापूर्वी तीनशे- साडेतीनशे उंबऱ्यांचे असलेले वडाळा गाव शहरीकरणाच्या रेट्यात लुप्त होत असताना आपल्या गावपणाच्या खुणा आजदेखील जपून आहे.

राजेंद्र बच्छाव

Nashik News: स्वातंत्र्यापूर्वी तीनशे- साडेतीनशे उंबऱ्यांचे असलेले वडाळा गाव शहरीकरणाच्या रेट्यात लुप्त होत असताना आपल्या गावपणाच्या खुणा आजदेखील जपून आहे. माळी, रामोशी, कोळी, बौद्ध आणि मुसलमान वतनदार असलेले आणि गावात एकही मराठा नसलेले हे गाव विशेष असेच समजावे लागेल.

एकेकाळी गुण्यागोविंदाने राहणाऱ्या या गावचा प्रवास आज गाजत असलेल्या एमडी ड्रग्ज रॅकेटचे कनेक्शन आणि अस्ताव्यस्त पसरलेल्या वसाहतींमधील गुन्हेगारीमुळे कलंकित होत आहे. (glory of Wadala Gaon has been tarnished by crime nashik news)

स्वातंत्र्यपूर्व काळापासून माळी समाजाचे शंकर नारायण खोडे, गोपाळा दगडू खोडे, पुंजाजी विधाते, निवृत्ती काश्मीरे, रामोशी समाजाचे बाळू शिरतार , दुलाजी गुरुकुले, कोळी समाजाचे पांडुरंग कडाळे, हिरामण धाटे, चंद्रकांत झांजर, बौद्ध समाजाचे निंबा साळवे, राघू साळवे, मुस्लिम समाजाचे शक्रम इस्माईल शेख, कासम शेख यांच्यासह गोफने कंपनी गावचा गाडा हाकायची.

आजही आपली ओळख जपून ठेवणारे राजवाडा, कोळीवाडा, रामोशी वाडा, माळी गल्ली या सर्वांच्या देवघेव करण्याच्या जागा. जुने मारुती मंदिर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आजही सर्वांचे श्रद्धास्थान आहे. आजचे इंदिरानगर, राजीवनगर, डीजीपीनगर, शरयूनगरी, बजरंगवाडी, भारतनगर पखाल रोडपासून थेट मुंबई नाक्यापर्यंत सर्वत्र उपरोक्त कुटुंबीयांच्या जमिनी होत्या.

हजारो एकर असणारी ही जमीन कसणे हाच एक मुख्य व्यवसाय होता. गावात येण्या- जाण्यासाठी कोणतेही रस्ते नव्हते. मुंबई नाक्यावरून येणाऱ्या पाटचारीने ये- जा करण्याचा रस्ता तेवढा होता. स्वातंत्र्यानंतर सैन्य दलासाठी गावाची सुमारे २५ ते ३० टक्के जमीन आरक्षित करण्यात आली. कालौघात अनेकांनी आपल्या जमिनी विकून गंगापूर, गिरणारे, दुगाव आणि इतर ठिकाणी जमिनी घेतल्या. सुरवातीला लष्कराच्या जमिनीला अवघे लाकडी कुंपण होते. त्यानंतर तारेचे कुंपण झाले आणि नंतर आता असलेली पक्की भिंत करून ही जागा लष्कराने सुरक्षित करून घेतली.

तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी या ठिकाणी एकदा भेट दिली होती. त्यानंतर गावात अनेकांनी आपल्या मुलांचे नावेदेखील पंडित ठेवल्याच्या आठवणी आज गावात असलेले ज्येष्ठ नागरिक शंकर बाळा खोडे सांगतात. भारत स्वतंत्र झाल्यानंतर गावातील राजवाडाजवळ असणाऱ्या चावडीवर मराठी शाळा भरण्यास सुरवात झाली.

याच शाळेत मग सर्वांचे शिक्षण सुरू झाले. त्याकाळी गावातील गंगाधर खोडे, अंबादास खोडे, बाळासाहेब काश्मिरे आणि एक विधाते म्हणून गृहस्थ हे चौघे नाशिक शहरात तेदेखील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जायचे हे विशेष. पुढे भाऊसाहेब हिरे यांची गावातील ज्येष्ठांशी भेट झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या संस्थेचे हायस्कूल येथे सुरू केले. आजदेखील हे हायस्कूल त्याच जोमात सुरू आहे. गावात आज दोन महानगरपालिकेच्या शाळा असून उर्दू शाळादेखील आहे.

१९५९ ला सहकारी सोसायटी

१९५९ ला गावात सहकारी सोसायटीची स्थापना झाली. सोसायटीमध्ये द्वारका भागातील काठे, बनकर आदी मंडळींपासून टाकळी गावचे शेतकरी खते घेण्यासाठी यायचे. वीटभट्टीवाले म्हणून ओळखले जाणारे पुंडलिक विधाते यांनी नगरपालिकेची शाळा आणली. माजी आमदार वसंत गिते नाशिक शहराचे महापौर झाले आणि वडाळा नाका आणि मुंबई नाका येथे असलेली झोपडपट्टी वडाळा गावानजीक आली.

तीच आजची सावित्रीबाई फुले आणि पिंगुळबाग वसाहत म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी असलेल्या मूळच्या वतनदारांनी जमिनी विकल्या. त्यातील काही मुस्लिम बांधवांनी घेत गुंठेवारीने विक्री केली आणि या जागेवरच आजचे मेहबूबनगर, झीनतनगर उभे राहिले. आसपासचे शहरीकरण आणि या वसाहतींच्या गर्दीत पूर्वीचे वडाळागाव जणू लुप्त झाल्याची स्थिती आता निर्माण झाली आहे.

गुन्हेगारीचा कलंक

गावानजीक असलेल्या वसाहतींमध्ये परप्रांतीयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातूनच भाईगिरी सुरू झाली आहे. प्लास्टिक आणि भंगाराच्या बेकायदा गुदामामुळे चोऱ्या वाढल्या आहेत. मोठ्या प्रमाणात वीज आणि पाणीचोरी येथे होते. पोलिसांना सातत्याने येथे कोंम्बिंग ऑपरेशन करावे लागतात. अनेकांवर येथे तडीपारीच्या कारवाई झाल्या आहेत. सध्या राज्यभर गाजत असलेल्या एमडी प्रकरणाचे धागेदोरे याच भागात राहणाऱ्या आणि छोटी भाभी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या महिलेपर्यंत पोचले आहेत.

नव्वदच्या दशकात पाणी योजनेचे भूमिपूजन करताना तत्कालीन नगरसेवक गंगाधर खोडे.

या भागात सर्रास अमलीपदार्थांची विक्री होते असे सातत्याने बोलले जाते. जनावरांची बेकायदा कत्तलदेखील येथे होते. नागरी सुविधा आल्या मात्र त्यासोबत मोठ्या अपप्रवृत्ती गाव परिसरात वाढल्याने गावाच्या सामाजिक आरोग्याला बाधा पोचली आहे. गावात असलेले स्थानिक मात्र नेटाने आजदेखील सिमेंटच्या वाढत्या जंगलात गावाच्या पाऊलखुणा जपत आहेत.

ही आहेत वैशिष्ट्ये

गावातील पहिले सरकारी नोकर म्हणून परशराम खोडे यांनी नाशिक न्यायालयात नोकरी केली. माजी नगरसेवक सुनील खोडे यांचे ते वडील होत. एकेकाळी हजारो एकर जमिनीवर शेती होणाऱ्या वडाळ्यात आज अवघ्या ४५ एकर जमिनीवर शेती होते. अंबादास खोडे, दिनकर खोडे, मुन्ना साळवे, गोविंद साळवे आणि हरिभाऊ खोडे आजदेखील गावात शेती करतात. गावात टेलर काम करणारे शांताराम वाबळे आणि निफाडच्या कुंदेवाडीचे सैन्य दलातून निवृत्त झालेले राणू सोनवणे हे दोघेच मराठे गावचे आहेत, असे स्थानिक मानतात. १९५७ साली गावात जलाल शेठ कोकणी यांनी पहिला म्हशींचा गोठा सुरू केला.

आज गावात सत्तरच्या आसपास गोठे आहेत. सोसायटीचे पहिले अध्यक्ष म्हणून निवृत्ती काश्मिरे यांची निवड झाली तर आताचे अध्यक्ष पद योगायोगाने त्यांचे चिरंजीव ॲड. दत्तोपंत काश्मिरे यांच्याकडे आहे. याकूब खाटीक हे महापालिकेत नोकरीला लागणारे पहिले कर्मचारी ठरले. त्र्यंबक विधाते हे पहिले नगरपालिकेचे मेंबर ठरले.

त्यांनीच गावात रस्ते आणि वीज आणली. त्यांच्यानंतर राखीव जागेवर रामचंद्र गंगाराम वायल हे मेंबर झाले. त्यानंतरच्या निवडणुकीत नगरसेवक झालेल्या गंगाधर खोडे यांनी गावात ९० च्या दशकात नगरपालिकेचे पाणी आणि इतर सुविधा आणल्या. त्यांच्यानंतर सातत्याने मनपात चंद्रकांत खोडे, सुनील खोडे, सुप्रिया खोडे यांच्या रूपाने भूमिपुत्र गावाचे प्रतिनिधित्व करत आहेत. महापालिकेच्या सर्व सोयी सुविधा गावापर्यंत पोचवण्यात यांचा मोठा वाटा आहे.

"पूर्वीपासून गावात एकोपा आहे. जात-पात कधीच कुणी मानली नाही. आजदेखील गावातील मूळ समाजबांधव एकमेकाला धरूनच आपली वाटचाल करत आहेत. बाहेरची मोठी वस्ती वाढल्याने समस्यादेखील वाढल्या आहेत, हे खरे आहे. मात्र आजची तरुण पिढी गावाचे गावपण, रूढी आणि परंपरा अभिमानाने जपत आहेत याचे मोठे समाधान आहे." - शंकर बाळा खोडे, स्थानिक ज्येष्ठ नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shahajibapu Patil: काय झाडी काय डोंगर... फेम शहाजीबापू पाटील यांचा पराभव करणा-या युवा आमदाराने केली अनोखी घोषणा

Sharad Pawar : राज्यामध्ये लागलेला निकाल अनपेक्षित आहे

Narayan Rane: त्यांनी आता महाराष्ट्रात तोंड दाखवू नये; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

IPL 2025 Auction Live: अश्विनची १० वर्षांनंतर CSK संघात घरवापसी! तब्बल इतके कोटी मोजत घेतलं संघात

Latest Maharashtra News Updates : कोकण कधीच ठाकरेंचं नव्हतं- निलेश राणे

SCROLL FOR NEXT