निफाड (जि. नाशिक) : भारतातील द्राक्ष उत्पादनाद्वारे परदेशातून कोट्यवधींचे परकीय चलन मिळते. ॲपेडा (APEDA) व इतर संस्थांद्वारे द्राक्ष निर्यात होते. देशातील शेतकऱ्यांनी संशोधित केलेल्या द्राक्ष वाणाचा मात्र परकीय नावानेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गाजावाजा होतो. शासनाच्या दुर्लक्षामुळे स्वदेशी जात व प्रतवारीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेख होत नाही. त्यामुळे याप्रश्नी लक्ष घालण्याची मागणी ‘सुधाकर सीडलेस’ या द्राक्ष वाणाचे संशोधक सुधाकर क्षीरसागर यांनी थेट पंतप्रधानांकडे (PM Modi) पत्राद्वारे केली आहे.
परदेशात दुसऱ्याच नावावर
सुधाकर सीडलेस शेतकऱ्यांमध्ये दर्जेदारपणामुळे खूप लोकप्रिय झाले. त्याची प्रमुख द्राक्ष उत्पादक भागात मोठ्या प्रमाणावर लागवड झाली. या जातीची विविधता निर्यातीसाठी स्वीकारली जाते. या संशोधनाबाबत राष्ट्रीय द्विवार्षिक पारितोषिकासाठी सुधाकर सीडलेसच्या संशोधनाचे नामांकनही झाले होते. द्राक्ष निर्यातीच्या प्रस्तावित यादीचे अवलोकन केले तर सुधाकर सीडलेस या देशात संशोधित झालेल्या वाणाची निर्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर दुसऱ्याच नावाने केली जात आहे.
श्री. क्षीरसागर यांनी अखंड मेहनत आणि प्रयोग करीत टप्प्याटप्प्याने वनस्पतीचा विस्तार केला. त्या विस्तारातून हे वाण वेगवेगळ्या माध्यमातून लागवडीखाली आले होते. त्या काळात कोणतीही नोंदणीप्रक्रिया उपलब्ध नव्हती. गेल्या काही वर्षांत पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क अधिनियम २००१ची माहिती मिळाली. त्यानुसार संबंधित विभागात कागदपत्रांची पूर्तता केल्यावर २०१९ मध्ये शेतात दोन वर्षे त्यासंदर्भातील डस (DUS) चाचणीप्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यातून या वाणाची विविधता नोंदणीकृत झाली. सुधाकर सीडलेस म्हणून प्रमाणित नोंदणी क्रमांक १८१ नुसार प्रमाणपत्रही क्षीरसगार यांना प्राप्त झाले.
नऊ वर्षांपासून पाठपुरावा सुरू
एका भारतीय नोंदणीकृत वाण असल्याने तेच नाव दिले पाहिजे आणि सुधाकर सीडलेस म्हणून निर्यात व्हायला हवे, ही अतिशय रास्त मागणी श्री. क्षीरसागर गेल्या आठ-नऊ वर्षांपासून करीत आहेत. सुधाकर सीडलेस भारतात नोंदणीकृत आहे. त्याच नावाने फळांच्या निर्यातीवरील रॉयल्टीबाबत अपेडादेखील काहीही खुलासा करत नाही. कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन भरून परदेशी पेटंट वाण भारतात आणले जातात. त्यापासून परकीय चलनाचा देशाला लाभ होत नाही, मात्र विविध जैविक अस्त्र भारतीय मृदेत समाविष्ट केले जाऊन उत्पादन क्षमतेला धोकादेखील निर्माण होऊ शकतो.
केंद्राच्या कृषी विभागाने दखल घ्यावी
जर कोणाला परदेशात भारतीय वाणांची लागवड करायची असेल, तर तेथील नियमांनुसार नोंदणी करावी लागते. मात्र त्याच नियमांनुसार, भारतीय कायद्यांतर्गत नोंदणीकृत वाणांनाच भारतात परवानगी दिली पाहिजे. सद्यःस्थितीत देशातील सर्वच द्राक्ष वाणांचे डीएनए अहवाल तपासणी करावी. त्यातून स्वदेशातील नोंदणीकृत वाणांची व परदेशी अनोंदणीकृत वाणांची यादी करावी. त्यातून स्वदेशी उत्पादित वाणांतून मिळणारे परकीय चलन व आयात केलेल्या वाणांतून मिळणारे परकीय चलन याचा तुलनात्मक अभ्यास करता स्वदेशातील द्राक्ष वाण सरस असल्याचे स्पष्ट होते. याचा केंद्र शासनाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. राज्य व केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाकडून याबाबत दखल घेणे गरजेचे असल्याचे श्री. क्षीरसगार यांनी स्पष्ट केले आहे.
आत्मनिर्भर होण्यासाठी खाव्या लागताय खस्ता
''कृषी विभागाकडे निर्यातीसाठी नोंदणी केलेल्या सुधाकर सीडलेस जातीच्या द्राक्षमालाचे प्रमाणपत्र मात्र थॉमसन सीडलेस (Thompson Seedless) नावाने वितरित होते, म्हणजे स्वदेशी नोंदणीकृत उत्पादित मालाची परदेशी बाजारपेठेतील व्याप्ती होऊ न देण्याचा हा डावच आहे. त्याही पलिकडे अपेडाच्या द्राक्ष निर्यातीच्या यादीतील पर्यायामध्ये बहुतांश विदेशी वाणांचाच समावेश आहे. सुधाकर सीडलेसचा उल्लेख नसल्याने आपली अथक मेहनत लालफितीच्या कारभारात अडकली आहे. स्वकष्टाने केलेल्या संशोधनातून शोधलेल्या सुधाकर सीडलेस जातीबाबत मात्र आत्मनिर्भरता प्राप्त करण्यासाठी शासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार करावा लागतो, याचा खेद वाटतो.'' - सुधाकर क्षीरसागर, संशोधक सुधाकर सीडलेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.