मालेगाव : कसमादेसह खान्देशमध्ये ठिकठिकाणी यात्रा, जत्रांची धूम आहे. देवदर्शनाबरोबरच यात्रांमध्ये खरेदीसाठी देखील भाविक दुकानांवर गर्दी करीत आहे. कसमादेसह परराज्यातील व्यावसायिकांनी यात्रेत दुकाने थाटली आहेत.
कसमादेत श्री देव मामलेदार यात्रोत्सव नुकताच झाला. सध्या चंदनपुरी (ता. मालेगाव) व नैताळे (ता. निफाड) येथील यात्रोत्सव सुरु आहे. खाद्यपदार्थांमध्ये शेव-रेवडीची अनेक दुकाने लावण्यात आली आहेत.
शहरात गुडीशेव तयार केली जाते. येथील गुडीशेवला मोठी मागणी आहे. खान्देशातील यात्रा जत्रांबरोबरच कर्नाटकमध्येही मालेगावची गुडीशेव विकली जात आहे. (Gudi Shev market booming due to Yatra fairs Gudi Shev of Malegaon trending in Karnataka Nashik News)
शहरासह कसमादेतील काही वस्तु खवय्यांच्या पसंतीला उतरल्या आहेत. मालेगावची गुडीशेव, सटाणा व चांदवड येथील कंदी पेढे, कळवणची स्ट्रॉबेरी, न्यायडोंगरीची बालुशाही, झोडग्याचा चिवडा, चंदनपुरीतील भजी-जिलेबी प्रसिद्ध आहे. हे खाद्यपदार्थ प्रामुख्याने सप्तशृंगगड, चांदवड, सटाणा, नस्तनपूर, चंदनपुरी, नैताळे येथील यात्रोत्सवात हमखास मिळतात.
सध्या राज्यभरात यात्रोत्सवाची धूम सुरु आहे. अक्षयतृतीयेपर्यंत गावागावांमध्ये यात्रा, जत्रांची रेलचेल असेल. यात्रोत्सवामुळे शेकडो व्यावसायिकांना दिलासा मिळत असतो.
मौत का कुवा, झोका, पाळणे यासह विविध मनोरंजनाचा आनंद नागरिक घेत असल्याने या व्यावसायिकांचाही व्यवसाय वधारला आहे. येथील गुळीशेवने अनेकांना भुरळ घातली आहे.
शहरात तयार होणाऱ्या गुडीशेवला मुंबई, नाशिक, पुणे, कर्नाटक तसेच खान्देशातील यात्रोत्सवात मागणी असते. यात्रोत्सवाच्या हंगामात रोज सुमारे दोन टन गुडीशेवची विक्री होते. हिवाळ्याच्या सुरुवातीपासूनच गुडीशेवला मागणी वाढते.
येथे सुमारे चार ते पाच ठिकाणी गुडीशेव बनविली जाते. येथील गुडीशेव परराज्यातही प्रसिद्ध आहे. गुडीशेव बरोबरच येथे अनारसे, सोनपापडी, म्हैसुरपाक, गुळाची जिलेबी आदींना मागणी असते.
यात्रेत गुडीशेवला सर्वाधिक मागणी
मालेगाव तालुक्यातील चंदनपुरीची यात्रा अनेकांना आकर्षित करते. यात्रेत लाखोच्या संख्येने भाविक येतात. सटाणा येथील देव मामलेदार यांच्या यात्रेलाही मोठी गर्दी असते. कळवण तालुक्यात अभोणा, कनाशी, कळवण, निवाणे, खेडगाव, देवळा तालुक्यात अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर यात्रा भरते.
नांदगाव तालुक्यात नस्तनपुरला वर्षातून दोनदा यात्रा भरते. चांदवडमध्ये नवरात्रोत्सवात यात्रेची धूम असते. याखेरीज कसमादेतील गावागावात ग्रामदैवतांचा यात्रोत्सव उत्साहात होतो. सामान्य व गरीब कुटुंबातील ग्राहक असल्याने यात्रा-जत्रांमध्ये गुडीशेवची सर्वाधिक विक्री होते.
"गेल्या पन्नास वर्षापासून आमचा गुडीशेव बनविण्याचा व्यवसाय आहे. वडिलोपार्जित व्यवसाय असल्याने चांगल्या दर्जाची गुडीशेव बनवितो. विश्वास संपादन केल्याने ग्राहक आवडीने गुडीशेव खरेदी करतात. कर्नाटकमध्येही मालेगावची गुडीशेव प्रसिद्ध आहे."
- तस्लिमम आरीफ, लल्लू गुडीशेव सेंटर, चंदनपुरी गेट, मालेगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.