नाशिक : "सकाळ'च्या माध्यमातून बचतगटांतील महिलांच्या उत्पादनांचा "गलका' नव्हे, तर जागतिक स्तरावर त्यांना "बोलके' करण्यासाठी शनिवारी (ता. 14) कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात मेळावा होत आहे. या वेळी ऍलिकॉन इन्फोमॅटिक्स प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक आनंद पाटील ऑनलाइन व डिजिटल मार्केटिंग बाबत, तर एचओएच टेक लॅब्स प्रा.लि.च्या संस्थापिका राधिका मलिक "ई कॉमर्स' संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. बचतगट आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ या दृष्टीने हा मेळावा टर्निंग पॉइंट ठरणार आहे.
डिजिटल मार्केटिंग व ब्रॅन्डिंग
बचतगट ही संकल्पना महिलांत चांगलीच रुजली आहे. विविध उत्पादने त्या करतात. या उत्पादनांना डिजिटल मार्केटिंग, ब्रॅन्डिंग सेवा, तसेच उत्पादनांसाठी बाजारपेठ मिळविणे ही त्यांची मुख्य समस्या असते. यातून योग्य मार्ग, दिशा व नेमकी कोणती उत्पादने हवीत. यावर श्री. पाटील महिलांना विशेष प्रशिक्षण व मार्गदर्शन करणार आहेत. बचतगटांच्या उत्पादनांचा केवळ गलका असू नये, तर त्यांचे काम व उत्पादन बोलके असावे, हे ध्येय अर्थात टॅगलाइनवर ते प्रबोधन करतील. सध्या ऑनलाइन, ऑफलाइन बाजारपेठ कशी मिळवावी याचा मार्ग या मेळाव्यातून महिलांना मिळेल, अशी अपेक्षा आहे. सध्या आपल्या परिसरात, राज्यात आणि जगात कोणत्या उत्पादनांना मागणी आहे, त्यातील ट्रेंड काय आहे हे ओळखून नेमक्या ग्राहकांना लक्ष्य करून बाजारपेठेत यशस्वी होता येते. बचतगटाच्या महिलांनी या दिशेने कसे काम करावे, सध्याच्या कार्यपद्धतीत कोणते बदल करावेत, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्वयंचलित व्यवसाय प्रक्रिया कार्यान्वित करण्यास बचतगटांच्या महिलांना मार्गदर्शन होईल.
ई-कॉमर्स
बचतगटांच्या महिलांना त्यांच्या उत्पादनासाठी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने जगभर बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी ई-कॉमर्सची कास धरणे ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने ई-कॉमर्स संदर्भात श्रीमती मलिक मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. बचतगटांमध्ये कार्यरत महिला व त्यांची उत्पादने पारंपरिक असतात. या उत्पादनांसाठी बाजारपेठ हा त्यांच्या मार्गातील प्रमुख अडथळा असतो. दैनंदिन व्यस्ततेमुळे बहुतेक लोकांचा ऑनलाइन मार्केटकडे कल वाढत आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांनी ऑनलाइन मार्केटिंगच्या माध्यमातून व्यवसाय वाढविणे, ही काळाची गरज आहे. ऑनलाइन मार्केटिंगमुळे बचतगटांच्या वस्तू देशपातळीवरच नव्हे, तर जागतिक पातळीवर विकण्यासाठी हातभार लागणार आहे. या मेळाव्यात बचतगटांच्या वस्तू ऑनलाइन मार्केटवर कशा पद्धतीने विकल्या जाऊ शकतात, त्या अपलोड कशा केल्या जातात, त्याची प्रक्रिया काय असते आदींबाबत श्रीमती मलिक यांचे सविस्तर मार्गदर्शन महिलांना या मेळाव्याद्वारे मिळेल.
बचतगटांच्या उत्पादनांना डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून नवी दिशा मिळण्यास मदत होणार आहे. राज्यातील हा पहिलाच स्तुत्य उपक्रम यानिमित्ताने नक्कीच दिशा देणारा ठरणार आहे. बचतगटांनी या कार्यशाळेकडे संधी म्हणून पाहावे व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. - संपत चाटे, सहसंचालक, कौशल्य विकास विभाग, नाशिक
महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांसाठी "सकाळ समूहा'तर्फे होत असलेल्या डिजिटल मार्केटिंग कार्यशाळेतून नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. महिलांना पारंपरिक गर्तेतून बाहेर पडत, डिजिटल प्लॅटफॉर्म मिळतोय. बचतगटांनी यात सहभागी व्हावे. - प्रफुल्ल वाकडे, सहसंचालक, व्यवसाय व प्रशिक्षण विभाग, नाशिक
बचतगट डिजिटल मार्केटिंग कार्यशाळेनिमित्त नक्कीच महिला तसेच बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना ऑनलाइन मार्केटचे नवे दालन उभे राहणार आहे. बचतगटांनी मेळाव्याला उपस्थित नक्कीच या कार्यशाळेचा लाभ घ्यावा. - संजय गायकवाड, जिल्हा व्यवस्थापक, माविम, नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.