Gurumauli Annasaheb More : ‘सम सकला पाहू’ या भावनेतून सेवेकऱ्यांनी सेवाकार्य करावे, असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी केले. उपस्थित हजारो सेवेकऱ्यांनी त्यांच्या आवाहनाला टाळ्यांचा कडकडाटाने प्रतिसाद दिला.
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गुरूपीठात शनिवारी (ता. २३) मासिक महासत्संग पार पडला. गुरुमाउलींनी आध्यात्मिक सेवांसह विविध विषयांवर मार्गदर्शन केले. गुरुमाउली म्हणाले, की राष्ट्रपिता महात्मा गांधींनी ‘गावाकडे चला’ असा नारा दिला. त्यांना कल्पना होती, की गावे समृद्ध झाली की देश समृद्ध होईल. (Gurumauli Annasaheb guidance about service work jalgaon news)
आज याच धर्तीवर सेवामार्गातर्फे गावे सशक्त करण्यासाठी ग्रामअभियान राबविण्यात येते. ग्रामअभियान हा सेवामार्गाचा कणा आहे. या अभियानाच्या माध्यमातून दु:खी, कष्टी, पीडित लोकांसाठी निष्काम भावनेतून कार्य केले जाते, असे स्पष्ट करून गुरुमाउली म्हणाले, की गुरूपीठात झालेले संकल्पित नवनाथ पारायण आणि सेवेकऱ्यांच्या सेवेमुळे पर्जन्यराजाला पुन्हा यावे लागले. यामुळे सेवेकऱ्यांनी पर्जन्यसूक्ताची सेवा अखंड सुरूच ठेवावी.
आदर्श, सुसंस्कारित, निर्व्यसनी पिढी घडविणे ही काळाची गरज असली तरी हे खूप मोठे आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी गर्भ-शिशू-मूल्यसंस्कार विभागाने अधिकाधिक झोकून देऊन सेवाकार्य करण्याची आवश्यकता आहे. जगभरात दु:खी, कष्टी, रोगी, पीडित, बाधित, शापित आणि अज्ञानी लोकांची संख्या प्रचंड आहे. त्यासाठी प्रश्नोत्तर विभागाने आपल्या कार्याचा जास्तीत जास्त विस्तार करणे गरजेचे आहे.
आपल्या रोजच्या आहारात मीठ, साखर, तेल, तिखट या पदार्थांचा कमीत कमी वापर करून रानभाज्यांचा समावेश केल्यास आरोग्य निरामय राहील. त्याचबरोबर वर्षातून एकवेळ आपल्या शरीराचे सर्व्हिसिंग म्हणजे पंचकर्म केल्यास कोणतेही आजार फिरकणार नाहीत. रुग्णांच्या सेवेसाठी परमपूज्य सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलच्या बांधकामाला लवकरच सुरवात होणार आहे. हॉस्पिटलचे काम लवकर व्हावे, यासाठी हॉस्पिटलच्या जागेवर भैरवचंडीची सेवा करणारे सेवेकरी महत् भाग्यवान ठरतात.
छत्रपती संभाजीनगर येथे २७ नोव्हेंबरला मूल्यसंस्कार मेळावा आणि राष्ट्रकल्याणासाठी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर १ जानेवारी २०२४ ला राष्ट्रीय सत्संग आयोजित करण्यात आला आहे. या दोन्ही मेळाव्यांसाठी सेवेकऱ्यांनी योगदान द्यावे.
आपल्या पितरांचा विधी माहिती नसल्यास सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी महालयात श्राद्ध विधी करावा, असे शास्त्र सांगते. नवीन पिढीला पितरांची सेवा, जयंती आणि पुण्यतिथी यांचे महत्त्व अवश्य सांगावे. श्री स्वामी महाराजांच्या सेवेने सेवेकरी ऊर्जावान होतो. ही ऊर्जा ग्राम अभियान राबविण्यासाठी खर्च करा. सेवामार्गाचे अंतरंग ग्रामअभियानाच्या माध्यमातून ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.
अज्ञानी लोकांचे भले व्हावे, या उद्देशाने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून भूकंपशांती यंत्र, वादळशमन ध्वज, स्वसंरक्षण यंत्र, श्रीयंत्र, रुद्रयंत्र, कुबेरयंत्र यांचे महत्त्व सांगणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्र समजून घेऊन त्याप्रमाणे उपाययोजना केल्यास आजारपण आणि कर्ज यांना पायबंद घालता येणे शक्य आहे.
तसेच, गुरूपीठातून सिद्ध करून घेतलेल्या श्रीयंत्र व रुद्रयंत्राच्या सेवेतून अनुक्रमे आर्थिक स्थिरता आणि निरामय आरोग्याचा लाभ मिळतो. रानभेंडी, वेखंड, सप्तरंगीची मुळी आणि काढा यांचा वापर केल्यास कर्करोगासारखा असाध्य आजार बरा होतो. सोबत आहारातून वांगी, मिरची, उडीद, मका हे पदार्थ वर्ज्य करणे आवश्यक आहे, असे गुरुमाउलींनी नमूद केले.
‘मूल्यसंस्कारांतून सर्वांगीण विकास’
गुरुमाउलींच्या आशीर्वादाने आणि बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाचे प्रमुख नितीनभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बालसंस्कार सभागृहात महासत्संगाच्या पर्वावर ‘मूल्यसंस्कारांतून सर्वांगीण विकास’ या महत्त्वपूर्ण विषयावर प्रात्यक्षिक प्रदर्शन उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले.
या प्रदर्शनात सेंद्रिय शेतीचे महत्त्व, शेती व खताचे प्रकार, शेतीपूरक व्यवसाय यांची माहिती देणारे स्टॉल्स, सात्त्विक आहार आणि आरोग्याला अपायकारक विरुद्ध आहार व त्याचे दुष्परिणाम, योगासने- सूर्यनमस्काराचे महत्त्व, शारीरिक व मानसिक लाभ मिळवून देणारे पारंपरिक खेळांचे प्रकार यांचे स्टॉल्स मांडण्यात आले होते. परमपूज्य गुरुमाउलींनी या प्रदर्शनाला भेट देऊन मूल्यसंस्कार विभागाचे कौतुक केले. गुरुपुत्र चंद्रकांतदादा, नितीनभाऊ, आबासाहेब हेही उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.