लासलगाव : गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस व प्रचंड गारपीट झाल्याने सर्वांत जास्त फटका द्राक्ष पिकांना बसला आहे. ऐन काढणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच गारपिटीचा तडाखा बसल्याने अनेक बागेतील द्राक्षांचा खुडा होण्याआधीच शेवटच्या घटका मोजत आहेत.
यामुळे अनेक द्राक्ष बागायतदार वैतागून द्राक्षबाग ठेवण्यापेक्षा तोडण्यावर अधिक भर देत आहेत. (Hail hit vineyard with ax decision of disgruntled orchard farmers of Waki Khurd Nashik News)
६८ वर्षांच्या आयुष्यात अशी गारपीट पाहिली नाही. १५ मिनिटांत होत्याचे नव्हते झाले. कोरोनाने आम्हाला उभरू दिले नाही. द्राक्षाने घात केला. त्यातून बाहेर पडलो कसाबसा आणि पुन्हा द्राक्षासाठी नऊ ते १० लाख रुपये खर्च केले.
मात्र, गारपिटीने ते पूर्ण पाण्यात गेले. आम्ही यंदा खूप स्वप्न पाहिली होती, पण नियतीला मान्य नव्हती. आता बाग ठेवून काही फायदा नाही, तोडलेली बरी, असे ६८ वर्षीय विश्वनाथ जगताप यांनी सांगितले. बोलत असतानाच, थरथरत्या हाताने ते द्राक्षबाग तोडण्यात पुन्हा एकदा मग्न झाले.
वाकी खुर्द येथील विश्वनाथ भाऊराव जगताप यांनी पूर्ण आयुष्यात लासलगाव बाजार समितीत हमाली करून उदरनिर्वाह केला. तीन मुलांचे संगोपन करून मुलांना शिकवली व त्यांनी आपल्या शेतात तीन एकर द्राक्षबाग लागवड केली.
यात दोन एकर थॉमसन व एक एकर सोनाका द्राक्ष पीक घेतले. दोन वर्ष कोरोनामुळे १७ ते १८ लाख रुपयांचे वार्षिक नुकसान सोचले. यंदा सुमारे ९ लाख रुपये द्राक्ष बागेवर खर्च केले. द्राक्षबाग करून फक्त ५ वर्ष झाली होती.
अजून १५ वर्षे क्षमता असलेली चांगल्या दर्जाची बाग टिकविण्यासाठी पालखेड डाव्या कालव्यातून पाइपलाइन केली होती. यंदा द्राक्षाचे घड यंदा चांगल्या प्रमाणात लागल्याने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात खुडा सुरू होईल.
यंदा २० ते २५ लाख रुपयांचे उत्पन्न झाल्यावर घराची डागडुजी व नूतनीकरण, धाकट्या मुलाचे लग्न आणि चारचाकी गाडी घ्यायचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. मात्र, निसर्गाला ते मान्य नव्हते.
दोन वर्षांपूर्वी सोसायटीचे संपूर्ण कर्ज परतफेड केल्याने यंदा कुठलाशही कर्ज उराशी नाही. त्यामुळे चांगला पैसा हातात मिळेल, हे स्वप्न गारपीटीने स्वप्नच राहून गेले, असे हताशपणे विश्वनाथ जगताप सांगत होते.
तीन एकर द्राक्ष बाग पूर्णतः हातातून गेल्याने त्यांनी ही बाग तोडून टाकण्याचा निर्णय घेतला. तीन मुले व मजूर लावून त्यांनी सोमवारी (ता. ४) सकाळपासून ही बाग तोडण्यास सुरवात केली आहे. जी परिस्थिती जगताप यांची झाली, तशीच काहीशी परिस्थिती अनेक गावांमध्ये द्राक्ष उत्पादकांची झाली आहे.
लाखो रुपये खर्च करून एकरकमी उत्पन्न मिळवून देणाऱ्या द्राक्षबागा यंदा गारपिटीने पूर्णतः जमीनदोस्त झाल्या आहेत. यामुळे अनेक द्राक्ष बागायतदारांच्या स्वप्नांची राख रांगोळी झाल्याचे चित्र सर्वच ठिकाणी पाहायला मिळत आहे.
शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.