Vishnu Thore sakal
नाशिक

Vishnu Thore : बांधावर राहून पुस्तकांना चेहरा देणारा अवलिया

नुसता चित्र काढतो अभ्यास करत नाही म्हणून लहानपणी आईने त्याची चित्रकलेची वही चुलीत घातली. वही जळताना पाहून त्याला रडू आलं. पण जळणाऱ्या वहीचा रंगीत जाळ पाहून तो सुखावला.

हर्षल गांगुर्डे

‘काठीचे वळ जेव्हा दुखत असायचे पाठीवर मी अक्षरे गिरवत बसायचो मातीवरच्या पाटीवर’ असे लिहिणारा चांदवडच्या मातीतला कवी, गीतकार, चित्रकार, निरुपणकार अशा अनेक अंगांनी समृद्ध झालेला एक सृजनशील चेहरा म्हणजे विष्णू थोरे. शेती मातीचा लळा आणि गोड गळा असलेला हा कवी मातीवर रेघोट्या ओढता-ओढता महाराष्ट्रातील अनेक नामवंत लेखकांच्या पुस्तकांना चित्र काढतो, रेखाटणे करतो आणि त्याने चित्र काढलेल्या पुस्तकांना साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळतात. त्याने चित्र काढलेली पुस्तके अभ्यासक्रमाला लागतात, हे विशेष.

नुसता चित्र काढतो अभ्यास करत नाही म्हणून लहानपणी आईने त्याची चित्रकलेची वही चुलीत घातली. वही जळताना पाहून त्याला रडू आलं. पण जळणाऱ्या वहीचा रंगीत जाळ पाहून तो सुखावला. त्याचं रडणं थांबलं आणि घडणं सुरु झालं. वेदनेचे कितीतरी रंग त्याने पाहिले ते कधी चित्रातून तर कधी शब्दातून हा अवलिया साकारत राहिला.

आनंद देणारी ही माणसे नेहमी खडतर वाटेने प्रवास करीत असतात. विष्णू थोरे यांचा प्रवासही तसाच आहे. लहानपणी चित्रपट बघायला पैसे नाही म्हणून टॉकीजबाहेर रेंगाळणारा हा कवी पुढे जाऊन चौर्य, घाटी, पीटर, गैरी, राडा, जैतर या सहा मराठी चित्रपटांना गाणी लिहितो. त्याने लिहिलेले ‘पायरीला गेले तडे पाय झाले जड, देवा तुझ्या देवळात चोरट्यांचा फड’ हे गाणं महाराष्ट्रभर गाजतं.

दहावीला बोर्डाचे पेपर आणि गव्हाची सोंगणी एकत्र आल्याने अभ्यास करता आला नाही म्हणून गणित, इंग्रजी व मराठी या तीनही विषयात जो नापास होतो पुन्हा जिद्दीने अभ्यास करून पास होतो. तो पुढे जाऊन चांदवड व लासलगाव महाविद्यालयात काही काळ मराठीचा प्राध्यापक म्हणून काम करतो.

त्याची कविता संदर्भ म्हणून अभ्यासक्रमात लागते. त्याचा ‘धूळपेरा उसवता’ कवितासंग्रह प्रसिद्ध होतो. त्याला अनेक पुरस्कार मिळतात. महाराष्ट्रभर त्याचे कवितेचे कार्यक्रम असतात. कवी विष्णू थोरेंचा प्रवास चित्रपटासारखाच वाटतो.

आजपर्यंत विष्णू थोरे यांनी सहाशेच्या वर पुस्तकांना मुखपृष्ठ रेखाटली आहेत. त्यात राजन गवस, ऐश्वर्य पाटेकर, दिलीप धोंडगे, डॉ. विलास थोरात, डॉ राजेंद्र मलोसे या सारख्या अनेक दिग्गज लेखकांच्या पुस्तकांना त्यांचे चित्र आहे. दोनशे कवींच्या कवितांना त्यांनी अक्षरसाज देवून सजविले. या सर्व अक्षर कविता ओझर येथील पुस्तकांच्या हॉटेलमध्ये लावण्यात आल्या आहेत.

डिजिटल युग आलं आणि कलावंतांच्या वाट्याला परवड आली. कित्येक कलावंतांची हाताची कामे गेली, परंतु विष्णू थोरे यांनी वेगळी वाट शोधून काढली. आजही शेताच्या बांधावर बसून हा अवलिया शब्द, चित्र रेखाटत असतो. शेतात राहायचं पण जागतिक व्हायचं! हे त्याचं स्वप्न आहे. त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास गाव खेड्यातील तरुणांना उभारी देणारा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT