वावी (जि. नाशिक) : वाळू, मुरूम, माती, दगड, खडी अशा विविध प्रकारच्या गौण खनिजाचे अवैधरीत्या उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी सिन्नर तालुक्यात पोलिस पाटीलांची मदत घेतली जाणार आहे. सिन्नरचे तहसीलदार एकनाथ बंगाळे यांच्या आदेशाने तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचे नेतृत्वात पोलिस पाटलांची पथके स्थापन करण्यात आली आहेत.
गाव आणि शिवाराची खडाण खडा माहिती असणारे पोलिस पाटील सिन्नर तालुक्यातील गौण खनिजाच्या अवैध वाहतूक व उत्खननास आळा घालण्यासाठी यापुढील काळात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसणार आहेत. (Help of Police to prevent illegal transport Order of Sinnar Tehsildar Nashik News)
शासनाच्या निर्णयानुसार गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. सिन्नर तालुक्यातून वाळू, मुरूम, माती, दगड, खडी अशा विविध प्रकारच्या गौणखनिजाचे अवैधरीत्या उत्खनन व वाहतूक होत असल्याची शक्यता लक्षात घेता तहसीलदार श्री. बंगाळे यांनी नायब तहसीलदार , मंडळ अधिकारी व तलाठी यांची कार्यरत असणारी पथके अधिक सक्षमपणे काम करण्यासाठी पोलिस पाटीलांची मदत घेतली आहे.
वाहनांतील गौणखनिजाचे स्वामित्वधन भरून सक्षम प्राधिकरणाकडून गौणखनिज उत्खनन व वाहतुकीचा परवाना घेणेत आलेला आहे किंवा नाही, परवान्यापेक्षा अधिक परिमाणाच्या गौणखनिजाची वाहतूक केली जात तर नाही ना, एकाच परवाना व पावतीवर एकापेक्षा अधिक वेळा गौणखनिजाची वाहतूक केली जात आहे काय या बाबींची तपासणी करण्याची जबाबदारी आता पोलिस पाटीलांवर देखील सोपवण्यात आली आहे.
गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांची महाखनिज प्रणालीवर तपासणी करण्यासाठी चेकनाके कार्यान्वित करण्यात येणार असून त्या ठिकाणी मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या नेतृत्वात प्रत्येकी चार पोलिस पाटील जबाबदारी घेणार आहेत.
सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडे, मोहदरी, विंचूर दळवी, पांढुर्ली चौफुली, हिवरगाव, वावी, पाथरे खुर्द व नांदूर शिंगोटे या ठिकाणी गौण खनिज तपासणी साठीचे चेक नाके असणार आहेत. प्रत्येकी चार याप्रमाणे ३२ पोलिस पाटीलांच्या नियुक्ती तहसीलदारांच्या आदेशाने करण्यात आली आहे. त्यात महिला व पुरुष पोलिस पाटीलांचा समावेश आहे.
पथकाचा दैनंदिन आढावा
गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या तपासणीअंती वाहतूक पासवर तपासणीचे ठिकाण, दिनांक व वेळ नमूद करावी लागणार आहे. तपासलेल्या प्रत्येक वाहनाची नोंद रजिस्टरला घेतली जाईल. जेणेकरून वाहतूक पासचा दुबार वापर होणार नाही.
नियंत्रण अधिकारी असणाऱ्या मंडळ अधिकारी व तलाठी यांनी सदर पथकाचा दैनंदिन आढावा घ्यावा व पथक नेमून दिलेल्या तपासणी नाका येथे आहे याची खात्री करावी. आदेशात तलाठी यांनी स्वतः तपासणी नाका येथे उपस्थित राहावे. सदर पथक कार्यान्वित करणेबाबत संबंधित नियंत्रण अधिकारी यांची जबाबदारी राहील असे तहसीलदारांनी आदेशात नमूद केले आहे.
"महसूल विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्याने अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर कारवाई करण्यास नेहमीच मर्यादा येते. त्यामुळे सिन्नर तालुक्यात प्रयोग म्हणून पोलिस पाटीलांची मदत घेतली जाणार आहे. निफाडच्या उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे यांचे मार्गदर्शन घेऊन व जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या परवानगीने ही कार्यवाही करण्यात येत आहे." - एकनाथ बंगाळे, तहसीलदार, सिन्नर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.