नाशिक : शहरातील बंगले परिसरातील बंद असलेला बंगला हेरून भरदिवसा घरफोड्या करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने परराज्यातून अटक केली.
संशयितांकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चौकशीतून चार घरफोड्यांची उकल झाली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी एका घरफोडीच्या गुन्ह्यात दोघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर जामीनावर बाहेर येताच पुन्हा त्यांनी घरफोडीचे सत्र सुरू केले होते. (High profile burglars arrested busted in doing crime broad daylight Nashik news)
रोहन संजय भोळे (३६, रा. उपनगर), ऋषिकेश उर्फ गुड्डू मधुकर काळे (२७, रा. नाशिकरोड) अशी दोघा सराईत घरफोड्यांची नावे आहेत.
गंगापूर रोड परिसरातील शारदानगरमधील बंद असलेल्या शरण बंगलोच्या किचनचे ग्रील कापून संशयितांनी रोकड, सोन्या-चांदीचे दागिने, महागडे घड्याळे, एअर पॉड असा २ लाख ४१ हजारांची घरफोडी २४ डिसेंबर रोजी केली होती. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्याचा समांतर तपास शहर गुन्हेशाखेच्या युनिटएकचे पथक करीत होते. पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे दोघांना वापीतून (गुजरात) येथून अटक केली.
पोलिस तपासात संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली चोरीची स्विफ्ट डिझायर कार (एमएच ०५ सीबी ३८४०) हिच्यासह ३० ग्रॅम सोसे असा ७ लाख ५३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच, चार गुन्ह्यांची उकलही झाली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, रवींद्र बागुल, नाझीम पठाण, प्रशांत मरकड, विशाल देवरे, राहुल पालखेडे यांच्या पथकाने बजावली.
अत्याधुनिक हत्यारांचा वापर
संशयित रोहन भोळे हा घरफोड्यांचा मास्टरमाईंड आहे. उच्चभ्रू वसाहतीतील बंद बंगल्यांना हेरून तो रेकी करायचा. दोघेही कारमधूनच अशा परिसरातून फिरायचे. रोहनने ऑनलाईन अत्याधुनिक हत्यारे खरेदी केले होते.
गॅसकटर, काच कापण्याचे हायड्रोलिक कटरचा तो वापर करायचा. घरफोडी करताना तो बंगल्याच्या एका बाजूने रिकामा प्लॉट असलेला शोधायचा. त्यामुळे त्याला पाठीमागून जाऊन खिडकी, ग्रील कट करून थेट मास्टर बेडरुममध्ये जात यायचे.
उच्चशिक्षित! शेअर मार्केटची नशा
रोहन भोळे यास शेअर मार्केटचा नाद होता. यामध्ये त्याला लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. तरीही तो घरफोड्यातून मिळालेले पैसे तो शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करीत होता. दोघाही संशयितांच्या घरची परिस्थिती उत्तम आहे.
रोहन भोळे हा कॉन्हेंटमध्ये शिक्षण घेऊन पदवीधर आहे तर, ऋषिकेळ काळे हा मॅकेनिकल इंजिनिअर आहे.
कार अन् एअरपॉडमुळे उकल
गंगापूर घरफोडीमध्ये संशयितांची स्वीफ्ट डिझायर कार वापरली ती त्यांनी ओझर येथून चोरली होती. ओझरमध्येही त्यांनी घरफोडी केली असता, त्यांनी कारही पळविली. तीच कार घेऊन ते गंगापूर रोड परिसरात आल्याचे सीसीटीव्हीतून निष्पन्न झाले.
शरण बंगल्यातील डीव्हीआर संशयितांनी चोरून नेले होते. घरफोडीचा ऐवज नेताना त्यांनी आयफोनचे एअरपॉडस्ही नेले. स्वीफ्ट कारला फास्ट टॅग असल्याने ती कार उपनगर परिसरात असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी नजर ठेवली. तसेच, सीसीटीव्हीतील संशयितांच्या शरीरयष्टीवरून ओळख पटली. परंतु तो घरात दडून बसला होता. त्यानंतर दोघेही त्याच कारने गुजरातकडे निघाले. तसेच त्यांनी ब्ल्युटुथ एअरपॉडचा वापर केल्याने त्यांचा नेमके लोकेशन मिळताच पोलिसांनी गुजरात गाठून दोघांना अटक केली.
जामीनावर सुटताच पुन्हा घरफोड्या
२०२२ मध्ये नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीत पोलिसांनी दोघांना अटक केली होती. त्यानंतर ते जामीनावर बाहेर आले होते.
परंतु त्यानंतर पुन्हा त्यांनी घरफोड्यांचे सत्र सुरू केले. या काळात त्यांनी केलेल्या गंगापूर हद्दीत दोन, ओझरमध्ये एक व सिन्नरमध्ये एक अशा चार घरफोड्यांची उकल झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.