Nashik ZP News : जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यापुढे सेवेवर असताना गळ्यात आपले ओळखपत्र सर्वसामान्यांना दिसेल याप्रमाणे परिधान करावे लागेल. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे ओळखपत्र लावणे राज्य शासनाने अनिवार्य केले असून, तसे आदेश काढले आहेत. (identity card Compulsory for officers and employees of Zilla Parishad nashik news)
याची अंमलबजावणी जिल्हा परिषदेत केली जाईल. त्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी सर्व विभागांना पत्र काढत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत दर्शनी भागावर ओळखपत्र लावावे, असे आदेश दिले आहेत.
शासकीय कार्यालयात असताना ओळखपत्र दर्शनी भागावर न लावणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याविषयीचा आदेश ७ मे २०१४ ला राज्य शासनाने परिपत्रकाद्वारे दिला; मात्र अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचारी ओळखपत्र दर्शनी भागात लावत नाहीत.
त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना अधिकारी आणि कर्मचारी यांना ओळखता न आल्याने अडचण येते. त्यामुळे १० ऑक्टोबरला शासन आदेश काढून याविषयी कार्यवाही न करणाऱ्यांवर कारवाईचा आदेश शासनाने दिला आहे. ओळखपत्र दर्शनी भागात न लावणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांची नावे सुरक्षा व्यवस्थेतील पोलिसांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे देण्याची सूचना या आदेशात देण्यात आली.
शासनाचे आदेश प्राप्त झाल्यावर जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागानेही सर्व विभागांना पत्र काढले आहे. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या कामाशी संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांचे नाव व पदनाम माहीत होण्यासाठी किंवा त्यांची भेट घेण्यासाठी संबंधित अधिकारी/कर्मचारी यांची ओळख पटणे आवश्यक आहे; परंतु शासकीय कार्यालयात हजर असलेले संबंधित अधिकारी/कर्मचारी हे दर्शनी भागावर ओळखपत्र लावत नाहीत.
ओळखपत्राबाबत एखाद्या नागरिकाने विचारणा केली असता शासकीय अधिकारी/कर्मचारी ओळखपत्र दाखवीत नसल्याचे दिसत आहे. या सर्व बाबी विचारात घेता सर्व शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांनी कार्यालयात असताना त्यांचे ओळखपत्र दर्शनी भागावर लावावे. जेणेकरून याबाबत नागरिकांची तक्रार प्राप्त होणार नाही. या आदेशाची सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अंमलबजावणी करावी, असे पत्रात नमूद केले आहे.
"ओळखपत्र लावण्याची सूचना देण्यात आलेली आहे. तरीही काही कर्मचारी ओळखपत्र लावत नाहीत. त्यामुळे विभागप्रमुखांमार्फत अनपेक्षित भेटी देऊन तपासणी केली जाईल. यात ओळखपत्र न आढळल्यास कारवाई केली जाईल." - रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.