नाशिक / वेहेळगाव : ‘तुळशी वृंदावन जयाचे द्वारी, धन्य तो प्राणी संसारी’, असे दारातील तुळशी वृंदावनाचे महत्त्व सांगितले जाते. भारतीय संस्कृतीमध्येच नव्हे तर आयुर्वेदातही तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामुळेच पूर्वी प्रत्येकाच्या घरासमोर सुंदर असं तुळशी वृंदावन असायचं. सकाळच्या प्रहरी तुळशीची पूजा होऊन घरात एक प्रकारचे धार्मिक वातावरण तयार व्हायचे, परंतु सध्याच्या काळात हे सर्व हरवत चाललं आहे.
धार्मिक आणि आयुर्वेदिक आधार
खरं म्हणजे, तुळशीचं हक्काचं अंगणच हरवलं आहे. लोकसंख्येच्या स्फोटात स्वतंत्र घरांचे अस्तित्व, घराची शोभा वाढविणारे तुळशी वृंदावन आणि एकूणच घरपण नष्ट होत चालले आहे. एकेकाळी हिंदू संस्कृतीमध्ये तुळशी वृंदावनाला महत्त्व होते. वृंदावन नसलेले घर क्वचितच बघायला मिळायचे. तुळशी वृंदावन अंगणात असण्यामागे धार्मिक आणि आयुर्वेदिक आधार होता.
अंगणच नसल्याचा परिणाम
साधारणतः २० ते ३० वर्षांपूर्वीचा विचार केला, तर अंगणातील तुळशी वृंदावनासमोर महिला भगिनी दररोज तुळशीला पाणी घालत, प्रदक्षिणा घालून पूजा करीत. सायंकाळी दिवा लावला जायचा. अलीकडच्या काळात फ्लॅट वा प्लॉट संस्कृतीचा शिरकाव झाला. वाढत्या लोकसंख्येसाठी तरतूद म्हणून अपार्टमेंटसारख्या गगनचुंबी इमारती उभ्या राहू लागल्या. फ्लॅट संस्कृतीमध्ये दारासमोर अंगणच नसल्याने तुळशी वृंदावनाची संकल्पना बाजूला पडली.
संस्कृतीच मोडीत
जुन्या काळी लोक घर बांधताना तुळशी वृंदावन आवर्जून उभारीत मात्र आज तसे होताना दिसत नाही.
अलीकडे तुळशीचे अंगणच हिरावून घेतले आहे. तुळशी वृंदावन संस्कृतीच आम्ही मोडीत काढली आहे. तुळशीचं वृंदावन तर हरवलंच, परंतु त्यासोबत लहान मुलांवरील संस्कारसुद्धा हरविले.
‘दिव्या दिव्या दीपत्कार..’
घरातील आई, वडीलधारी माणसं सायंकाळी लहान मुलांना घेऊन तुळशीसमोर ‘दिवा लागला तुळशीपाशी..’, ‘दिव्या दिव्या दीपत्कार..’ यांसह धार्मिक श्लोक म्हणायला लावीत. अलीकडे हे सर्व नाहीसं झालं. वृंदावनासोबतच आमचे संस्कारसुद्धा हरवत चालले आहेत. अंगणामध्ये अगदी मानाचं स्थान असलेली तुळसाबाई आज जनमानसातून लुप्त होत आहे.
वृंदावन बांधकामात घट
गेल्या १५ ते २० वर्षांपासून आम्ही बांधकाम क्षेत्रात काम करतो. पूर्वी घर तेथे वृंदावन बांधकाम व्हायचे. परंतु गेल्या ५ ते ६ वर्षांपासून जागेअभावी व फ्लॅट संस्कृतीमुळे वृंदावन बांधकामात घट झाली आहे. - भरत मोकळ, बांधका व्यावसायिक.
संकल्पनाच बाजूला
पुर्वी आईवडीलांकडे गावी रहायचे तेव्हा प्रत्येक घरासमोर तुळशी वृंदावन असायचे. सध्या फ्लॅट पध्दतीसारखे राहत असल्याने दारासमोर अंगणच नसल्याने वृंदावनाची संकल्पनाच बाजूला पडली आहे.
डॉ. अर्चना नाईक, नांदगाव
संपादन : भीमराव चव्हाण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.