नाशिक : शिवसेनेचे बंडखोर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून आज शिवसेनेने नाशिकमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यादरम्यान जोरदार घोषणाबाजी करीत लाखोली वाहताना महिला पदाधिकाऱ्यांनी पुतळ्याला जोडे मारले. ही अंत्ययात्रा अमरधामपासून गोदाकाठावरील दिवंगत माजी महापौर पंडितराव खैरे यांच्या निवासस्थानापर्यंतच्या अंतरापर्यंत होती, हे विशेष. यावरून शिवसेनेच्या बंडखोरांच्या प्रतीकात्मक अंत्ययात्रेत खांदा देण्यासाठी इच्छुकांत चुरस पाहायला मिळाली. शक्तिप्रदर्शनाच्या अंगाने आंदोलनातील शिवसैनिकांचा सहभाग आणि उत्साह शिवसेनेला बळ देणारे असेच होते.
महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडावे म्हणून बंडखोरी केलेल्या मंत्र्यांच्या निषेधार्थ आज सकाळी अकराला शालिमार येथील शिवसेनेच्या कार्यालयासमोर जमलेल्या शिवसैनिकांनी शालिमार, नेहरू गार्डनमागून संत गाडगे महाराज चौक, भद्रकाली मंदिर, तिवंधा चौक, नाव दरवाजामार्गे नाशिकच्या अमरधामपर्यंत पायी प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी या दरम्यान घोषणाबाजीसह लाखोली वाहत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
खासदार हेमंत गोडसे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, उपनेते सुनील बागूल, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, राहुल दराडे, विलास शिंदे, संजय चव्हाण, नय्या खैरे, योगेश गाडेकर, योगेश बेलदार, बाळासाहेब कोकणे, देवा जाधव, सचिन मांडे, उमेश चव्हाण, सुनील जाधव, ॲड. सुनील बोराडे, प्रशांत दिवे, भागवत आरोटे, शोभा मगर, रंजना बोराडे, मंगला आढाव आदींसह पदाधिकारी आणि माजी नगरसेवक सहभागी झाले.
खांदा देण्यासाठी चुरस
प्रतीकात्मक अंत्ययात्रेत ‘शिवसेनेचा एकच इशारा, गद्दारांना नाही थारा, शिवसेना आमच्या उद्धवसाहेबांची, नाही कुणाच्या बापाची...’ या आणि अशा घोषणा देत आमदारांच्या कथित गद्दारीवर भाष्य करणाऱ्या फलकासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेले मात्र उत्साहात होते. प्रभागातील समर्थक कार्यकर्त्यांसोबत प्रतीकात्मक तिरडीला खांदा देऊन छायचित्रणही करण्यात उत्साह होता. तिरडी दहनानंतर उपनेते सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, दत्ता गायकवाड, विनायक पांडे आदी ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची निषेधाची भाषणे झाली. शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जोडे मारून निषेध नोंदविला.
नाव घेऊन बोला...
नाशिकला अमरधाम येथील प्रवेशद्वारावर विसावाजवळ पुतळ्यांचे दहन करण्यात आले. पुतळा दहनानंतर विविध नेत्यांनी शोकसंदेश स्वरुपात भाषण करीत, बंडखोरांवर टीका केली. त्यांच्या बंडखोरीचा निषेध केला. या दरम्यान निषेध सभेत काही पदाधिकारी बंडखोरांची नाव घेणे टाळत असल्याचे लक्षात आल्यानंतर उपस्थितीत शिवसेना कार्यकर्त्यांनी गोंगाट करीत बंडखोरांची नावे घ्या... नाव घेऊन बोला... अशा घोषणा देत पदाधिकाऱ्यांना उघडपणे भूमिका घेऊन बोलायला लावले. कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे महापालिकेत बस्तान बसविलेल्या काही प्रस्थापितांनी चार हात दूर राहूनच सहभाग नोंदविला.
"येणाऱ्या काळात शिवसैनिक बंडखोरांना निश्चितीच धडा शिकवतील. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील संघटना आणखी मजबूत उभी करावी, तसेच लोकांत सहभागी होऊन त्यांचे प्रश्न सोडवावेत, अशा सूचना आहेत. त्यानुसार शिवसैनिक लोकांत जातील आणि शिवसेना आणखी जोमाने उभी राहीन."
- हेमंत गोडसे, खासदार, नाशिक
"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रिक्षाचालक, पंक्चरवाले, पानटपरीवाले अशा अनेक टिनपाट लोकांना सत्तेची पद मिळवून दिली. आमदार मंत्री केले. पण सत्तेची पद मिळाल्यावर अशा लोकांनी गद्दारी केली. शिवसेनाप्रमुखांनी उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख करून त्यांना सांभाळा, असे राज्यातील शिवसैनिकांना आवाहन केले होते. शिवसैनिक गद्दारांच्या छातीवर उभे राहून पुन्हा भगवा फडकविणारच."
- विजय करंजकर, जिल्हाप्रमुख शिवसेना
"शिवसेनेचे नाव घेऊन जे सत्तेवर आले, शिवसेनाप्रमुखांच्या नावाने विजय मिळाल्यानंतर मात्र त्याच शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा हा प्रयत्न शिवसैनिक सहन करणार नाही. शिवसेनेला धोका देणाऱ्यांच्या विरोधात सगळे एकत्र आले आहेत. धोका दिला आहे, तरी त्यांनी अजूनही परत येऊन हा विषय थांबविला पाहिजे. नाशिकचा शिवसैनिक जागा झाला आहे."
- सुनील बागूल, उपनेते शिवसेना
"बंडखोर मंत्री आणि आमदारांच्या विरोधातील हा आक्रोश आहे. शिवसेनेने आमदार, मंत्रिपद देऊन अनेकांना मोठे केले. पक्षाने मोठे केलेले लोक निवडून आल्यानंतर गद्दारी करतील तर शिवसैनिक नक्कीच त्यांना धडा शिकवतील. सत्ता मिळवून शिवसेनेला पाठ दाखविणाऱ्यांविरोधातील हा आक्रोश आहे."
- सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.