sindhubai bagdane esakal
नाशिक

Inspirational Story : बांधकाम मजूर ते उद्योजिकापर्यंतचा थक्क करणारा प्रवास!

विजयकुमार इंगळे

जगण्याची लढाई लढताना संकटांना सामोरे जाणे आता नित्याचेच झाले होते. अभ्यासात हुशार असूनही केवळ परिस्थितीमुळे सातवीतच शिक्षण सुटले. सासरीही कष्टप्रद जिणे कायम होते. मात्र कुटुंबाला आधार देण्यासाठी सिंधूबाईंनी नियतीलाच आव्हान दिले.

जिद्दीच्या जोरावर मात करायचीच, या सकारात्मक विचाराने त्या चालत राहिल्या. कधीकाळी बांधकाम मजूर म्हणून काम करणाऱ्या कळमदरी (ता. नांदगाव) येथील माहेर व सटाणा येथील सासर असलेल्या सिंधूबाई बगडाणे यांचा एक उद्योजिका म्हणून नावारूपाला आलेला प्रवास थक्क करणार आहे. (Inspirational Story amazing journey of sindhubai bagdane from construction worker to an entrepreneur nashik news)

मुळात संकटे आपली परीक्षा घेण्यासाठीच येत असतात, हे जाणून असलेल्या सिंधूबाई रामदास बगडाणे यांचे माहेर नांदगाव तालुक्यातील कळमदरी येथील, तर सासर सटाणा येथील... शिक्षण जेमतेम सातवी पास...

वडील नामदेव पुंजारा पवार यांचे पत्नी तुळसाबाई यांच्यासह तीन मुली व एक मुलगा, असं मोठं कुटुंब... शेतमजुरी जणू कुटुंबाला पाचवीलाच पुजलेली होती. सिंधूबाई पवार कुटुंबात ज्येष्ठ असल्याने कुटुंबात त्यांच्याही वाट्याला लहानपणापासूनच राबणे ठरलेलेच होते. लवकर लग्न झाल्याने सातवीतच त्यांचे शिक्षण सुटलं.

सासरीही कष्टमय आयुष्य

सिंधूबाई यांचा विवाह सटाणा येथील रामदास बगडाणे यांच्याशी झाला. पती रामदास यांचंही शिक्षण जेमतेम... गवंडीकामातून कुटुंबाचा गाडा चालविणाऱ्या रामदास यांच्याही घरात गरिबी जणू रोजची लढाई उभी करणारी होती.

लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी मजुरीसाठी बाहेर पडाव्या लागलेल्या सिंधूबाई यांच्यासाठी ही बाब नवीन नव्हती. कुटुंबाला आधार द्यायचा असेल तर पती रामदास यांच्या खांद्याला खांदा लावून मदत करायलाच हवी, हे जाणून त्याही सरसावल्या.

खटल्याच्या कुटुंबाचा आधार

बगडाणे कुटुंबाला दोन वेळ खायची भ्रांत. कुटुंबाला आर्थिक खाईतून काढायचे असेल तर आधार देणे महत्त्वाचे आहे, याची जाणीव सिंधूबाई यांना होतीच. सटाणा शहरात धुणीभांडी करण्यापासून ते मातीच्या चुली बनवून विक्री करणे, गवताच्या पेंड्या विकण्याचीही कामे त्या करत होत्या.

याच काळात कुटुंबात मुलगा कमलाकर, श्याम आणि मुली अलका, चित्रा, सविता यांच्यानिमित्ताने कुटुंबाची सदस्यसंख्या वाढली होती. मात्र आयुष्यात आलेल्या प्रतिकूल परिस्थितीची झळ मुलांपर्यंत पोचणार नाही, यासाठी त्यांनी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले.

बांधकाम मजूर ते उद्योजिका

सिंधूबाई यांनी भविष्यातील संकटांची स्थिती ओळखून स्वतःच्या व्यवसायासाठी प्रयत्न सुरू केले. सटाणा शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन उधार उसनवारीने पैसे जमा करत बंद बाटलीतील पाणी विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला.

या व्यवसायातही उधारीने माल नेऊन पैसे न दिल्याने आर्थिक कोंडी झाली. मात्र त्या खचल्या नाहीत. सकारात्मक विचारांची वाट भक्कम करत सिंधूबाई यांनी संयमाने परिस्थिती हाताळत याच व्यवसायाला पुढे नेण्यासाठी जणू कंबरच कसली होती.

सुरवातीला काही महिने उधारीने सुरू असलेला व्यवसाय आर्थिक संकटात आला होता. मात्र पुन्हा जिद्दीने भांडवल जमा करत व्यवसाय पुढे नेत राहिल्या.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

बेरोजगारांसाठी ठरल्या आधार

ललित एजन्सी या नावाने सटाणा शहरासह कसमादे परिसरात स्वतःची ओळख उभ्या केलेल्या सिंधूबाई यांनी पाणी विक्रीच्या माध्यमातून सुमारे दहा कुटुंबांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिला.

कधीकाळी उधार उसनवारीचा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर असताना स्वबळावर सिंधूबाई यांनी आज महिन्याकाठी भक्कम आर्थिक घडी बसवतानाच बगडाणे कुटुंबाची ओळख सर्वदूर पोचविली आहे. मुलगा श्याम, कमलाकर यांनी सामाजिक कार्यात सक्रिय राहत सिंधूबाईंनी उभ्या केलेल्या व्यवसायाला पुढे नेण्यासाठी हातभार लावला आहे.

खचून जाऊ नका

आयुष्यात आलेल्या कठीण परिस्थितीत खचून न जाता जिद्दीने अशा व्यवस्थेला सामोरे गेलो तर नक्कीच यश मिळते, या सकारात्मक विचारांवर कुटुंबाला आर्थिक स्थैर्य दिलेल्या सिंधूबाई बगडाणे व्यवसायात उभे राहतानाच खचून जाणाऱ्या कुटुंबांसाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत.

बाटलीबंद पाणी विक्री व्यवसायातून कुटुंबासाठी आधार ठरलेल्या सिंधूबाई यांना पती रामदास, मुलगा श्याम, कमलाकर, मुली अलका भांडोरे, चित्रा माळवार, सविता शेवाटे यांचेही पाठबळ नक्कीच वाखाणण्याजोगे आहे.

आयुष्यात आलेल्या संकटांमध्ये कुटुंबाला सावरतानाच स्वतःची ओळख उभी केलेल्या सिंधूबाई बगडाणे यांनी निर्माण केलेली जिद्द समाजासाठी आदर्श ठरलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: उमरगा विधानसभा मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार?

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT