Inspirational Story of Raised from business doing maid work of surekha tai borade nashik news esakal
नाशिक

Inspirational Story : मोलकरणीची कामे करीत व्यवसायातून उभारी

परिस्थिती माणसाला घडविते, मात्र आयुष्यात आलेली परिस्थिती संयमाने हाताळली तर नक्कीच मार्ग निघतो

विजयकुमार इंगळे: सकाळ वृत्तसेवा

Inspirational Story : परिस्थिती माणसाला घडविते, मात्र आयुष्यात आलेली परिस्थिती संयमाने हाताळली तर नक्कीच मार्ग निघतो, या विचारांवर आलेल्या संकटांशी तोंड दिले. अभ्यासात हुशार असूनही हातावर पोट असलेल्या कुटुंबात जन्मामुळे मजुरीशिवाय पर्याय नव्हता. मग सातवीतच शिक्षण सुटले.

वीटभट्टीवर कामाला जावे लागले. नातेवाइकांच्या मदतीने नाशिक गाठले. धुणीभांडी करण्याशिवाय पर्याय नव्हता. (Inspirational Story of Raised from business doing maid work of surekha tai borade nashik news)

याही परिस्थितीत स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी धडपड सुरू होती. मोलकरणीची कामे करतानाच नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात तुटपुंज्या भांडवलावर पराठा विक्री करीत व्यावसायिक म्हणून उभे राहत एक जिद्दीचा धडा घालून दिला. नाशिकच्या कामगारनगरमधील शिंदे चाळीतील अल्पशिक्षित सुरेखाताई देसाई-बोराडे यांची ही कहाणी.

ना शिकजवळच्या घोटी शहरातील माहेरवाशीण असलेल्या सुरेखा प्रशांत देसाई-बोराडे यांचे शिक्षण जेमतेम सातवी पास. वडील विनायक बोराडे ट्रकचालक, तर आई लताबाई घोटी परिसरातील गावांमध्ये कुरमुरे तसेच बोंबील विक्रीतून कुटुंबाला हातभार लावत होते. विनायक बोराडे यांचे पत्नीसह पाच मुली व दोन मुलगे असं मोठं कुटुंब...

या कुटुंबात सुरेखाताई घरातील ज्येष्ठ होत्या. तुटपुंज्या मिळकतीवर कुटुंबाला घरखर्चाची तोंडमिळवणी करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. सुरेखाताई यांना पाचवीत असतानाच कुटुंबाला मदत करावी लागत होती. अवघ्या बाराव्या वर्षीच वीटभट्टीवर विटा वाहण्यासाठी त्यांना जावे लागले.

वीटभट्टी कामगार ते मोलकरीण

सकाळी सात ते दुपारी बारा या वेळेनंतर शाळा सुटल्यावर सुरेखाताईंना कष्टाशिवाय पर्यायच नव्हता. बोराडे कुटुंबात खाणारी तोंडं जास्त असल्याने तसेच कुटुंबात ज्येष्ठ कन्या असल्याने अतिशय कमी वयातच कुटुंबासाठी हातभार लावण्याची जबाबदारी सुरेखाताईंवर आली.

वीटभट्टीवर विटा वाहण्याच्या कामातून मिळणाऱ्या पैशांतून कुटुंबासाठी त्यांचीही मदतीची धडपड सुरू होती. विद्यार्थिदशेतच त्या दिवसाला पाच हजार विटा वाहण्याचे काम करीत होत्या. शिकून मोठे होत काहीतरी करण्याची त्यांची तीव्र इच्छा होती, मात्र परिस्थिती साथ देत नव्हती. रोजीरोटीच्या लढाईत शिक्षण सातवीतच सुटलं.

नाशिक गाठलं...

घोटी शहरात रोजगाराच्या फारशा संधी नसल्याने सुरेखाताई यांनी रोजगाराबरोबरच शिक्षणाचीही सोय होईल, या अपेक्षेने मावशीच्या मदतीने नाशिक गाठलं... नाशिकमध्ये नातेवाइकांकडे राहत असतानाच मावशीच्या ओळखीने घरोघरी जाऊन मोलकरणीची कामे सुरू केली.

मात्र, रोजच्या कामांच्या धावपळीत सुरेखाताईंचं शिक्षण बाजूलाच राहिलं. खेळण्या-बागडण्याच्या वयातच त्या कॉलेज रोड परिसरातील सुमारे सहा घरांमध्ये मोलकरणीची कामे करीत होत्या. यातून मिळणाऱ्या पैशांतून गावी आई-वडिलांसाठी त्यांची मदत सुरू होती.

कौटुंबिक आघातातून सावरल्या

नाशिकमध्ये कष्टाची कामे करीत असतानाच सुरेखाताई यांचा विवाह सिन्नर येथे झाला. मात्र, त्यांची परिस्थिती आगीतून फुफाट्यात झाल्यासारखीच... कुटुंबाला सावरण्यासाठी सुरेखाताईंनी अतोनात प्रयत्न केले, मात्र त्यात त्या अपयशी ठरल्या. कौटुंबिक आघातातून सावरताना मुलगा ऋषीकेश याच्यासाठी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे असल्याची जाणीव त्यांना होती.

मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी सिन्नर सोडत पुन्हा नाशिकमध्ये आपला मुक्काम हलविला. नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये मुलाला शिक्षणासाठी दाखल करीत त्याच्या शिक्षणाकडे त्यांनी लक्ष पुरविले. आयुष्यात आलेल्या वादळांमध्ये खचून न जाता परिस्थिती नक्कीच बदलते, या सकारात्मक विचारांवर त्यांनी कष्ट सुरूच ठेवले.

व्यवसायाकडे वळल्या

नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात मोलकरणीची कामे करीत असतानाच काहीतरी वेगळे करण्याची धडपड त्यांना अस्वस्थ करीत होती. या परिसरातील वेगवेगळे पदार्थ तयार करून विक्री करणाऱ्या गाड्यांकडे पाहून त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. वर्दळीच्या परिसरात आणि महाविद्यालयीन युवकांची आवड लक्षात घेऊन पराठे तयार करून विक्रीचा व्यवसाय सुरेखाताईंनी सुरू केला.

व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची अडचण असताना सुरेखाताई धुणीभांडी तसेच स्वयंपाकाची कामे करण्यासाठी जात असलेल्या कुटुंबांनी आर्थिक पाठबळ दिल्याने त्यांचे उद्योजिका होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. सुरेखाताई यांचा सकाळी सहाला सुरू झालेला दिवस रात्री साडेदहाला संपतो, मात्र त्यांनी परिस्थितीशी जुळवून घेत व्यवसायाकडे लक्ष देत उभारी घेतलीय. पहिल्या दिवशी केवळ दोन पराठे विक्री झाले, मात्र आज दिवसाकाठी त्या ५० ते ६० पराठे विक्री करू लागल्या आहेत.

मुलाला अधिकारी बनवायचंय...

मुलगा ऋषीकेशने शासकीय अधिकारी व्हावं, या दृष्टीने व्यवसाय सांभाळून त्याच्या शिक्षणाकडे सुरेखाताई लक्ष देताहेत. वीटभट्टीवर कामगार म्हणून बाराव्या वर्षी सुरू झालेला प्रवास धुणीभांडी करण्यापासून ते आज थेट व्यावसायिक म्हणून सुरेखाताईंनी मजल मारली आहे.

आयुष्यात आलेल्या परिस्थितीत आई-वडील, मावशी सुमनताई शिंदे, वर्षाताई बोराडे, सरोज पाटील, पल्लवी झाला, अनुराधा पवार, रूपाली सोनवणे, नलिनी भगत यांनी बळ दिल्याने स्वतःला सिद्ध करू शकली, हे सांगताना मात्र त्यांचे डोळे पाणावले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत अल्पशिक्षित सुरेखाताई यांनी मिळवलेलं यश नक्कीच महिलांसाठी प्रेरणादायी ठरलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT