Nashik News: गरिबांचा, माफक दरात पाहिजे ती वस्तू मिळण्याचे ठिकाण म्हणून येथील भंगार बाजार जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. स्वस्तात ब्रॅंडेड कंपनीच्या वस्तू येथे सहज मिळत असल्याने दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत चालला आहे.
मुंबई व मोठ्या शहरातून मोबाईल, चार्जर, एलईडी टीव्ही, लाइट, रेडिओ, कॉम्प्युटर, हेड फोन, लहान मुलांची खेळणी, भांडे यासह विविध वस्तू विक्रीसाठी येतात. मोठ्या शहराचा हा ई- कचरा खरेदीसाठी शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांची झुंबड उडते. (Items are available at modest price in scrap market of Malegaon nashik news)
महागाई कितीही वाढली तरी येथील बाजारात मिळणाऱ्या वस्तू माफक दरात मिळतात. त्यामुळे गरीब व सामान्यांसाठी भंगार बाजार हक्काचे ठिकाण झाले आहे. त्यात आता इ-कचऱ्याने मोठा हातभार लावला आहे. यातून रोजगारनिर्मितीबरोबरच येथील अर्थकारणाला चालना मिळाली असून दररोजची उलाढाल काही लाखांवर होत आहे.
येथील भंगार बाजाराचे वैशिष्ट म्हणजे एखादी वस्तू, यांत्रिकपार्ट साठी जिथे सर्व पर्याय संपतात, तिथे येथील भंगार बाजाराचा विचार सुरू होता. शेती व्यवसाय असो किंवा तत्सम कोणताही लघुउद्योग असो किंवा गरजेच्या वस्तू असोत, त्या इथल्या बाजारात हमखास मिळतील.
सर्वच प्रकारच्या वस्तू अल्प दरात व चांगल्या दर्जाच्या मिळत असल्याने बाजाराची विश्वासार्हता देखील टिकून आहे. येथे छिन्नी, हातोडी, पाईप, लोखंडी पट्ट्या, साखळ्या, छत्री, पत्र्याची पेटी, वायर, टेस्टर, स्क्रू ड्रायव्हर, शेती औजारे आदी प्रामुख्याने मिळत होते. आता या वस्तूंबरोबरच मोबाईल, चार्जर, एलईडी टीव्ही, लाइट, रेडिओ, कॉम्प्युटर, हेड फोन, लहान मुलांची खेळणी, लहान मुलांच्या खेळण्यासाठी इलेक्ट्रीक चारचाकी वाहने आदी आधुनिक वस्तू मिळत आहेत.
येथील भंगार बाजारातील व्यापारी मुंबई येथील भारत बाजार येथून येथे साहित्य आणतात. अगदी दहा रुपयापासून ते दोन हजारापर्यंत चांगल्या वस्तू येथे मिळतात. मुंबई येथे व्यापारी या वस्तू किलोने, ढिगाऱ्याने घेतात. मालेगावी आल्यानंतर सर्व वस्तूंची छाटणी केल्यानंतर यातून विविध प्रकारचे साहित्य वेगळे करतात.
आठवडाभर येथे या साहित्याची विक्री होते. प्रामुख्याने शनिवारी या बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मुंबई येथे अल्प दरात फ्रीज, भांडे, गिझर मिळतात. काही व्यापाऱ्यांनी येथील भंगार बाजारात जागा कमी पडत असल्याने जाफरनगर, सलीमनगर, देवीचा मळा या भागात दुकाने लावली आहेत. या वस्तुंची दुरुस्ती करून पाचोरा, भडगाव, घाटनांद्रा, सिल्लोड यासह विविध ठिकाणी वस्तू पाठविल्या जातात. अनेक व्यावसायिक दुसऱ्या पिढ्या या व्यवसायात मजल मारीत आहेत.
बाजार झाला गरिबांच्या हक्काचा
या बाजारात अल्प किमतीत वस्तू मिळतात. जवळच किदवाई रस्ता असल्याने येथे कपडे, चप्पल, बुटे व इतर साहित्य खरेदीसाठी आलेले नागरिक हमखास या भंगार बाजारातही खरेदी करतात. येथे लॉटचा मालाची मोठ्या प्रमाणात विक्री होते. गरिबांना भांडे, कपडे, टिव्ही, मोबाईल, चार्जर यासह इतर वस्तू अगदी स्वस्तात मिळतात. त्यामुळे हा बाजार गरिबांचा हक्काचा झाला आहे.
"कमी किमतीत दर्जेदार वस्तू मिळतात म्हणून नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे. हिंदू- मुस्लीम एकतेचे उदाहरण म्हणूनही या बाजाराकडे पाहिले जाते. स्वस्तात उत्तम वस्तू मिळत असल्याने या बाजाराच्या प्रेमात येणारा प्रत्येक नागरिक पडतोच." - यासीन शाहरुख, जुने साहित्य विक्रेता, भंगार बाजार, मालेगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.