नाशिक : नायलॉन मांजामुळे नागरिकांनाच नव्हे तर, आकाशात मुक्तपणे भ्रमंती करणाऱ्या मुक्या पक्ष्यांच्याही जीवावर बेतते आहे. बिडी कामगार नगर परिसरात असलेल्या गव्हाणी प्रजातीचे घुबड झाडाला अडकलेल्या नायलॉन मांजात अडकले होते.
जागरुक नागरिकांनी पक्षीमित्रांच्या मदतीने या घुबडाची सुटका केली. त्यामुळे मुक्या पक्ष्याला जीवदान मिळाले आहे. (life of owl stuck in nylon net Appeal not to use nylon manja which harmful to life Nashik News)
गेल्या काही दिवसांपासून आकाशात पतंग झेपावतानाचे चित्र दिसत आहेत. तर कटलेले पतंग आणि त्यासाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा विजेच्या तारा, झाडांवर अडकून पडत आहेत. झाडांना अडकलेल्या मांजामध्ये पक्षी अडकण्याची जास्त शक्यता असते.
बिडी कामगार नगर परिसरातील एकाला झाडावर गव्हाणी प्रजातीचे घुबड अडकलेले या परिसरातील नागरिकांनी पाहिले.
या सजग नागरिकांनी तातडीने पक्षीमित्र, सर्पमित्रांचा शोध घेतला असता, त्यांना अक्षय सोनवणे, किशोर रणशुर यांचा संपर्क क्रमांक मिळाला. त्यांना घटनेची माहिती दिल्यानंतर तेही तत्काळ घटनास्थळी पोहोचले.
झाडावर असलेल्या नायलॉन मांजामध्ये गव्हाणी प्रजातीचे घुबड अडकलेले होते. त्यामुळे त्यास उडता येत नव्हते. किशोर व अक्षय यांनी प्रयत्न करून घुबडाभोवती असलेला नायलॉन मांजा काढून त्यापासून घुबडाची सुटका केली.
सुमारे दोन ते तीन तास घुबड त्यात अडकून होते. सुदैवाने घुबडाला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नव्हती. तरीही किशोर, अक्षय यांनी घुबडाचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर त्यास पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आणि घुबडानेही सुटका झाल्यानंतर आकाशात पुन्हा आनंदाने भरारी घेतली.
नायलॉन मांजामुळे नागरिकांच्याच नव्हे तर मुके पशुपक्ष्यांच्याही जीवावर बेतत असते. त्यामुळे पतंगप्रेमीनी नायलॉन मांजाऐवजी साधा मांजा पतंग उडविण्यासाठी वापरण्याचे आवाहन पक्षीमित्र अक्षय सोनवणे, किशोर रणशुर यांनी केले आहे.
तसेच, नायलॉन मांजात पशुपक्षी अडकलेले असल्यास तात्काळ अक्षय सोनवणे (७६६६९२८०२४), किशोर रणशूर (९६३७४४६६६८) यांच्याशी संपर्क साधावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.