नाशिक : सेलडीड न झालेल्या फ्लॅटचे बनावट मुखत्यारपत्र तयार करून बोगस फ्लॅटमालक उभा केला, त्या फ्लॅटवर तब्बल सहा कोटींचे कर्ज घेतले. मूळ फ्लॅटमालक महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा गंगापूर पोलिसांत दाखल झाला असून, तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे तो वर्ग करण्यात आला आहे.
सहा कोटींच्या वसुलीसाठी बँकेने फ्लॅट जप्तीची कारवाई सुरू केल्यानंतर मूळमालकाला फसवणूक झाल्याचे समजले. (Loan of 6 crores taken on flat by making fake power of attorney Nashik Crime News)
आनंदकुमार सिंग (४४, रा. सुषमा स्वरूप कॉलनी, गंगाजी रोड, कारवील, चित्रकूट, उत्तर प्रदेश), प्रीती सिंग (४२), संजय भडके (५१, रा. चव्हाटा, नाशिक) अशी संशयितांची नावे आहेत.
बबली सिंग (रा. दुर्गेश रेसिडेन्सी, आनंदवल्ली, नाशिक, हल्ली रा. भूमिका रेसिडेन्सी, श्रीपुरम, भोपाळ) यांच्या फिर्यादीनुसार २००२ मध्ये त्यांनी आनंदवलीत फ्लॅट खरेदी केला होता. सदरील फ्लॅटचे अॅग्रीमेंट करण्यात आले होते.
मात्र सेलडीड झालेले नव्हते. दरम्यान, त्या काही वर्षांपासून नाशिकबाहेर राहावयास गेल्या. त्यामुळे फ्लॅटचे सेलडीड करणे राहिले होते. २०१२ मध्ये संशयितांनी सदरील फ्लॅटचे बनावट मुखत्यारपत्र बनवून सेलडीड केले.
परंतु, ते करीत असताना मूळ मालक बबली सिंग यांच्याच नावे सेलडीड झाले. त्यामुळे संशयितांनी पुन्हा बनावट मुखत्यारपत्र तयार करून संशयित प्रीती सिंग हिलाच मूळ मालक बबली सिंग बनविले. त्याआधारे आयडीबीआय बँकेच्या शाखेतून फ्लॅटवर संशयितांनी सहा कोटींचे कर्ज घेतले.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
यासंदर्भातील कोणतीही माहिती मूळ मालक बबली सिंग यांना नव्हती. दरम्यान, घेतलेल्या कर्जाचे हप्ते संशयितांनी न भरल्याने आयडीबीआय बँकेने मूळ मालक बबली सिंग यांना हप्ते वसुलीसाठी पत्र पाठविले.
त्यानंतर बँकेने फ्लॅटवर जप्ती आणली. बबली सिंग यांनी याप्रकरणी चौकशी केली असता त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी न्यायालयात दिवाणी दावा दाखल करून त्यावर स्थगिती आणली. तर बनावट मुखत्यारपत्र सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी गंगापूर पोलिसांत फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक रवींद्र मगर अधिक तपास करीत आहेत.
बिल्डरवरही संशयाची सुई
दरम्यान, याप्रकरणात संबंधित फ्लॅटचे सेलडीड झालेले नाही, याची माहिती फक्त बिल्डर आणि फ्लॅटमालक बबली सिंग यांनाच होती. असे असतानाही संशयितांनी संजय भडके यास हाताशी धरून बनावट दस्ताऐवजानुसार मुखत्यारपत्र तयार करून फसवणूक केली. त्यामुळे याप्रकरणात बिल्डरही सहभागी असण्याची शक्यता असून, त्यादिशेने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुख्य संशयित कारागृहात
या गुन्ह्यातील मुख्य संशयित आनंदकुमार सिंग सराईत गुन्हेगार आहे. अशाच प्रकारे फसवणुकीच्या प्रकरणात तो सध्या उत्तर प्रदेशातील लखनौ कारागृहात आहे. चौकशीसाठी त्याचा ताबा घेण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया करून लवकरच नाशिकचे पथक लखनौला रवाना होणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.