इंदिरानगर : तपोभूमी नाशिकला सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या आणि सर्वांना भरभरून देणाऱ्या गंगा गोदावरीच्या तीरी जन्म होणे हे नाशिककरांचे भाग्य आहे. त्यामुळे ही गंगा स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीदेखील तुमची आहे.
गोदावरी स्वच्छ ठेवणे हे माझे आद्य कर्तव्य आहे, असे समजून जेव्हा जेव्हा घाटावर चाल तेव्हा तेव्हा तेथील कचरा, प्लॅस्टिक आणि इतर घाण नदीमध्ये जाऊ देऊ नका, असे आवाहन श्री महाशिवपुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी शहरवासीयांना केले.
पाथर्डी भागात आयोजित श्री शिवमहापुराण कथेचे पहिले पुष्प गुंफताना उपस्थित लाखो भाविकांना त्यांनी तब्बल अडीच तास खिळवून ठेवले. पंडित मिश्रा म्हणाले, की प्रभू श्रीरामचंद्र, श्री त्र्यंबकराज, छत्रपती शिवराय, स्वातंत्र्यवीर सावरकर, हिंदू वीर बाळासाहेब ठाकरे यांची ही भूमी आहे.
गोदावरी केवळ गौतमी ऋषींसाठी नाही, तर तुम्हा सर्वांसाठी आहे. तिला निर्मळ ठेवले तर सर्व काही निर्मळ होईल. जशी घरात आई निर्मळ असली तर घरातील प्रत्येक जण निर्मळ होतो. त्याचप्रमाणे गोदावरीचा महिमा आहे.
२४ हजार श्लोकांचा समावेश असलेल्या या कथेच्या निमित्ताने नाशिकला हा कथारूपी कुंभ भरला आहे. त्याचे पुण्य घेण्याचे भाग्य सर्वांना मिळाले आहे. कुणाला दान करू नका हरकत नाही, पण देवाचा जप करा.
पूजन व कथेत भाव भावनेला महत्त्व आहे. भक्तीच्या भावगंगेत मिसळाल तर जीवन सफल होईल. अहंकार आणि भावना सक्तीरुपी शरीराला लागलेला गंज आहे. परमेश्वराच्या भक्तीमुळे तो दूर होतो. देवाला अलंकार, संपत्ती, प्रतिष्ठा याच्याशी काही घेणे नाही. तो फक्त तुमच्या निर्मळ मनाचा भुकेला असतो.
प्रतिष्ठा मिळाल्यानंतर त्याचा कर्मात वापर करा आणि सोबत देवाची आराधना करा म्हणजे जीवन सफल होईल. मनापासून प्रार्थना केली तर महादेव नक्की ऐकतो. उपदेश करत असताना स्वतः ते आचरणात आणणे महत्त्वाचे असते, असे शिवकथा शिकवते.
तत्पूर्वी ढोल ताशांच्या गजरात महंत भक्तिचरणदास महाराज, आविष्कार भुसे, आमदार सीमा हिरे, अजय बोरस्ते, रंजन ठाकरे, बंटी तिदमे आदींनी त्यांचे स्वागत केले.
प्रार्थना फळाला
१९ वर्षीय मुलाचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यानंतर श्री महादेव कथेच्या महिमामुळे शिवाय आणि शिवांगी यांच्या रूपाने ५० व्या वर्षी प्रसाद मिळाल्याचे पत्र पाठवणाऱ्या नाशिक येथील ममता संतोष तोंडवाल यांना त्यांच्या बालकांना व्यासपीठावर बोलावून घेत पंडित मिश्रा यांनी त्यांचे कौतुक केले.
सुनीता धोंगडे या तीन महिन्यांपासून कथा नाशिकमध्ये व्हावी, अशी देवीला प्रार्थना करत होत्या ती प्रार्थना आज फळाला आली. तर सारिका सुनील भवर यांनीदेखील शिवकथेमुळे कुटुंबातील सदस्याच्या आरोग्य समस्येवर मात केल्याच्या पत्रांचे त्यांनी वाचन केले.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.