Nashik News : येथील मुद्रांक व नोंदणी कार्यालयातील सहाय्यक दुय्यम निबंधक (२) व्ही. एम. माडे यांनी तुकडेबंदी कायद्याविरोधात जाऊन जमीन खरेदी-विक्री प्रकरणे, गुंठेवारी दस्तनोंदणी बंद असताना नोंदणी केल्याच्या आरोपावरून त्यांचा पदभार काढून घेण्यात आला. पदभार काढल्यानंतर त्यांची बुधवार (ता. ४)पासून खातेअंतर्गत चौकशी सुरू आहे. त्यांचा पदभार सागर बच्छाव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
येथील मुद्रांक व नोंदणी कार्यालयातील सहाय्यक दुय्यम निबंधक (१) चे ज्ञानेश्वर खांडेकर यांचा या प्रकरणाशी सुतराम संबंध नाही. खांडेकर यांचे नाव नजरचुकीने घेण्यात आले.
माडे वगळता अन्य कोणताही दुय्यम निबंधक गुंठेवारी व तुकडेबंदीच्या दस्तांची नोंदणी करीत नव्हते. त्यामुळे माडे यांच्यावरच कारवाई झाली आहे. (Malegaon Secondary Registrar V M Made investigation continues nashik news)
बच्छाव यांनी माडे यांचा पदभार स्वीकारला आहे. भाजप आमदार नीतेश राणे यांनी मुंबई येथे पत्रकार परिषदेत मालेगावमध्ये ‘लँड जिहाद’ सुरू असल्याचा आरोप केला होता. राणे यांनी यात मोठे रॅकेट कार्यरत असल्याची टीका करताना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना दूरध्वनीही केला होता. या प्रकरणाची महसूल व नोंदणी मुद्रांक विभागाने गंभीर दखल घेतली.
नोंदणी मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांच्यासह नोंदणी मुद्रांक कार्यालयातील निवडक सहकाऱ्यांनी बुधवारी (ता. ४) मालेगावला येऊन सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात माडे यांच्या कार्यकाळात झालेल्या गुंठेवारी दस्त नोंदणीची तपासणी सुरू केली. माडे हे एकमेव अधिकारी गुंठेवारी दस्त नोंदणी करत असल्याने त्यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी होत होत्या. त्यांच्या या उपद्व्यापाचा अन्य अधिकाऱ्यांनाही मनस्ताप होत होता.
एकाच इमारतीत असलेल्या सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात माडे गुंठेवारी दस्त नोंदणी करीत होते. अन्य अधिकारी त्यास नकार देत. त्यामुळे अनेक गुंठेवारी खरेदी-विक्री करणारे मालमत्ताधारक, दलाल व कार्यकर्ते, संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर ते धावून जात. त्यांच्याशी प्रसंगी अरेरावी व शिवीगाळही करत.
माडे यांनी शासन आदेश डावलून नेमके किती दस्त नोंदणी केले, याची चौकशी सुरू आहे. ही नोंदणी करताना गैरव्यवहार व भ्रष्टाचार होत असल्याचा तसेच यात मोठे रॅकेट कार्यरत असल्याने सर्व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार राणे यांनी केली आहे.
ज्ञानेश्वर खांडेकर यांचा संबंध नाही
गुंठेवारी दस्त नोंदणी राज्यात बंद आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाकडून रिटपिटीशन दाखल झाली आहे. न्यायालयाने त्यावर स्थगिती दिलेली आहे. तुकडेबंदी कायद्याविरोधात जाऊन येथील सहाय्यक दुय्यम निबंधक २ यांच्या कार्यालयात गुंठेवारीचे दस्त नोंदणी करण्यात आले.
व्ही. एम. माडे यांनी आदेशाचे उल्लंघन करून दस्त नोंदणी केली. शहरात सहाय्यक दुय्यम निबंधक १ व सहाय्यक दुय्यम निबंधक ३ अशी एकूण तीन कार्यालये आहेत. सहाय्यक दुय्यम निबंधक १ चे ज्ञानेश्वर खांडेकर यांचा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही. गुंठेवारी दस्त नोंदणी संदर्भात आलेल्या सर्व तक्रारी या माडे यांच्या सहाय्यक दुय्यम निबंधक २ या कार्यालयातील आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.