नाशिक : घरावरील नक्षीकाम, स्मशानातील कोरीव खांब, सोहळ्यातील पोशाख, आभूषणे, मुखवटे, देवतांच्या प्रतिकृती अशा आदिवासींच्या कलाकृती नेहमीच आकर्षित करतात. खरपडी (ता. पेठ) येथील शेतकरी सीताराम ठाकरे हे मासे पकडण्यासाठी बांबूपासून ‘मळी’ बनवतात.
एकदा मासा आत गेला की पुन्हा बाहेर येत नाही, अशी त्याची रचना आहे. एक ‘मळी’ च्या निर्मितीसाठी ४ दिवस लागतात. त्यासाठीचा खर्च अवघा पन्नास रुपये आहे. (mali from bamboo to catch fish made by adivasi community Nashik Latest Marathi News)
आदिवासी बांधवांमध्ये परंपरा जोपासली जाते. एका पिढीचा ठेवा कथा, काव्य, नृत्य, कलाकृतीच्या माध्यमातून दुसऱ्या पिढीकडे येतो. जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, इगतपुरी, दिंडोरी, बागलाण, देवळा, कळवण, नाशिक या तालुक्यात आदिवासी बांधवांची लोकसंख्या अधिक आहे. आता चांगला पाऊस झाल्याने नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत.
त्यामुळे मासे हमखास मिळणार असल्याने श्री. ठाकरे यांनी ‘मळी’ बनवण्याचे काम हाती घेतले आहे. पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ‘मळी’ ठेवली जाते. बांबूच्या काड्या वापरून बनवण्यात आलेल्या एका ‘मळी’मध्ये एका वेळेस दोन किलो मासे पकडले जातात.
ही ‘मळी’ पाच ते सात वर्षे वापरता येते. त्यासाठी बांबूच्या काड्या आणि विळा इतके साहित्य वापरून कलाकुसरीची जोड देऊन कलाकृती तयार होते. मळी, तोंड्या असे आठ प्रकारच्या वस्तू श्री. ठाकरे बनवतात.
शेतीसोबत मजुरी करून बरीच आदिवासी कुटुंब उदरनिर्वाह करतात. शेतात भात, उडीद, नाचणी, तूर, ज्वारी अशा पिकांचे उत्पादन घेतले जाते. कामावेळी जनावरे सोबत नेली जात असल्याने आदिवासी बांधवांचा दिवसभरातील बराचसा वेळ हा निसर्गाच्या सान्निध्यात जातो.
निसर्गातील वस्तू वापरून सुरेख कलात्मक वस्तूंची निर्मिती केली जाते. दुर्गम जंगलाच्या, डोंगरांच्या, टेकड्यांच्या परिसरात वाढलेले अनेक कलाकार आपल्या साध्या जीवनशैलीत रममाण झालेले आहेत.
"बांबूच्या काड्यांपासून मी आठ वस्तू बनवतो. आजोबांनी आम्हाला ही कला शिकवली. पुढची पिढी मात्र पारंपारिक कलेत, वस्तू बनवण्यात रस दाखवत नाही. त्यामुळे पाड्यावरील कला पाड्यावर राहते." - सीताराम ठाकरे, शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.