सिन्नर (जि. नाशिक) : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामामुळे सिन्नर तालुक्यातील रस्त्यांची वाट लागली आहे.
पावसाळ्यात या रस्त्यांवरून प्रवास करणे सर्वसामान्यांसाठी धोकादायक ठरत असल्याने विकास महामंडळाने या रस्त्यांची दुर्दशा दोन दिवसात संपवावी अन्यथा स्थानिक रहिवासी व शेतकऱ्यांना सोबत घेऊन समृद्धी प्रकल्प विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिला आहे. (Manikrao Kokate statement about samruddhi mahamarg Nashik Latest Marathi)
आमदार कोकाटे यांनी मंगळवारी पाथरे पासून गोंदेपर्यंतच्या पॅकेज 12 अंतर्गत समृद्धी महामार्गाची पाहणी करत या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या रस्त्यांचा तसेच समृद्धीखाली बनवण्यात आलेल्या अंडरपासच्या कामांचा आढावा घेतला.
थोड्याशा पावसाने या रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य तयार होत असून अंडरपासमध्ये पाणी भरत असल्याने रस्ता ओलांडणे अडचणीचे ठरत आहे. गेल्या वर्षी देखील याच गोष्टीचा सामना स्थानिकांना करावा लागला होता. मात्र, रस्ते विकास महामंडळाकडून आगामी पावसाळ्यात ड्रेनेज व्यवस्थेसह नुकसान झालेल्या रस्त्यांचे नूतनीकरण करून देण्याची हमी देण्यात आली होती.
याकडे संबंधित प्रशासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष झाले असून समृद्धी प्रकल्प पूर्ण होत आला असताना देखील स्थानिकांच्या अडचणी अद्याप संपलेल्या नाहीत. याच पार्श्वभूमीवर श्री कोकाटे यांनी पाथरे, मलढोण, दुशिंगवाडी, वावी, फुलेनगर, मर्हळ , गोंदेपर्यंत पाहणी करून पावसाळ्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या त्रासाकडे समृद्धी ठेकेदार व अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
येत्या दोन दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी व रस्त्यावरील चिखलाचे साम्राज्य हटवावे. तसेच अंडरपास मधील पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा उभी करावी असे निर्देश श्री कोकाटे यांनी दिले.
प्रशासकीय स्तरावरून याबाबत कार्यवाही न झाल्यास समृद्धी महामार्गाच्या ठेकेदारांच्या वाहनांना स्थानिक रस्त्यांसह समृद्धी महामार्ग वापरण्यास मज्जाव करण्यात येईल व यादरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास संबंधित यंत्रणा जबाबदार राहतील असा इशारा कोकाटे यांनी दिला आहे.
जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे रस्ते विकास महामंडळाचे उपशाखा अभियंता निंबाराम बोरसे, दिलीप बिलकोनचे प्रकल्प, वावी चे माजी सरपंच रामनाथ करपे विजय काटे कन्हैयालाल भुतडा दुसंगवाडी चे सरपंच कानिफनाथ घोटेकर चंद्रभान गोराणे विठ्ठलराव उगले यांच्यासह परिसरातील शेतकरी यावेळी उपस्थित होते
पोलिसांनी ठेकेदाराची पाठ राखण करू नये...
स्थानिक शेतकरी अथवा रहिवासी समृद्धी प्रकल्पामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल ठेकेदार कंपनीकडे विचारणा करायला गेल्यास ठेकेदाराकडून पोलीस यंत्रणा हाताशी धरून शेतकऱ्यांवर दबाव टाकण्यात येतो.
याकडे काहंडळवाडी येथील शेतकऱ्यांनी लक्ष वेधले. यावेळी आमदार कोकाटे यांनी वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांना भ्रमणध्वनीवरून अशाप्रकारे ठेकेदाराची पाठ राखण न करण्याचे आदेश दिले.
मोपलवार यांच्याशी संवाद..
समृद्धी प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधींना लोकांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. सरकारने सांगितले त्याप्रमाणे समृद्धी बाधित रस्त्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा.
प्रकल्पाच्या दोन्ही बाजूंनी शेतकऱ्यांना स्वतंत्र रस्ता द्यावा, ठेकेदार कंपनी प्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांना योग्य सूचना द्याव्यात अशी मागणी आमदार कोकाटे यांनी रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्याकडे भ्रमणध्वनी वरून केली.
पॅकेज 12 अंतर्गत शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणी संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना देऊन कार्यवाही करण्यात येईल असे श्री. मोपलवार यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.