नाशिक : नाशिकमधील अखिल भारतीय मराठी साहित्य (marathi sahitya sammelan) संमेलनाचा भार स्वागताध्यक्ष छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांच्यावर टाकून निमंत्रकांचा एकतंत्री कारभार सुरू राहिला, असे टीकास्त्र अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले- पाटील यांनी ‘अक्षरयात्रा’ नियतकालिकातून सोडले. स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांची मी समक्ष भेट मागितली, पण मी पोचण्याआधीच भुजबळ यांच्याकडे आमच्यात चर्चा होऊ नये, आम्हा दोघांना बोलता येऊ नये, यासाठी लोकहितवादी मंडळाने शहरातील काही वजनदार लोक आधी आणून बसवले, अशी खंत ठाले-पाटील यांनी व्यक्त केली. (marathi-Sahitya-Sammelan-will-be-canceled-due-to-corona-in-Nashik)
‘अक्षरयात्रा’मधून कौतिकराव ठाले- पाटील कडाडले
एकहाती व्यवहाराचे विकेंद्रीकरण, बहुहातीकरण करण्याच्या अनुषंगाने पाय फुटण्याची शक्यता असणाऱ्या अनाकलनीय खर्चावर भुजबळ यांच्याशी बोलायचे राहून गेले. त्यानंतर भुजबळ यांना कोरोना झाला. परिणामी कोरोनामुळे संमेलन स्थगित करावे लागले. नाशिककरांच्या तोंडी आणि लेखी तक्रारींतून माझी व साहित्य महामंडळाची सुटका झाली, असे स्पष्ट करत ठाले- पाटील यांनी कोरोनामुळे संमेलन रद्द होण्याची शक्यता अधिक असल्याचे म्हटले.
साहित्य महामंडळाने केलेली सूचना निमंत्रक संस्था, स्वागत मंडळाने दुर्दैवाने लक्षात घेतली नाही, असेही ठाले-पाटील यांनी ‘अक्षरयात्रा’मध्ये नमूद केले आहे. ते म्हणाले, की आम्ही नाशिकला संमेलन देताना संमेलन आटोपशीर घ्यावे, असे सांगितले होते. सरकारकडून निधी मिळेल, याची अपेक्षा नव्हती. मात्र, भुजबळ यांनी संमेलनासाठी ५० लाखांचा निधी आणला. शहरातून अधिकाधिक स्वागत सभासद करून निधी जमा करण्याची सूचना होती. नाशिकमधून मोठा निधी उभा राहू शकतो. त्यामुळे हे संमेलन फक्त लोकहितवादी मंडळाचे होणार नाही, तर ते संपूर्ण नाशिककरांचे होईल. पाचशे सभासदांच्या वर्गणीतून २५ लाखांचा निधी सहज उभा राहू शकतो. जिल्ह्यातील लोकांना संमेलनाशी जोडून घेतले आणि शंभर ते दोनशे स्वागत सभासद तेथून केले, तर कोणावरही फार मोठा बोजा न टाकता निधीत मोठी भर पडेल, पण दुर्दैवाने महिना ते दीड महिना गेला तरी तसे चित्र निर्माण झाले नाही.
कौतिकराव ठाले-पाटील म्हणतात, की चार ते पाच कोटींचे अंदाजपत्रक कुणी केले नव्हते. एकदा अंदाजपत्रक केल्यावर त्यात कोणत्याही संमेलनात बदल झाला नाही. आमचा एक कोटीचा अंदाज होता. निधी संकलनात लोकांकडे लोकहितवादी मंडळाने पुरेसे लक्ष दिले नाही. आमदार निधी म्हणजे, सरकारचा पैसा. त्यामुळे सरकार संमेलनाचे यजमान राहील. त्यासाठी लोकहितवादी मंडळ अथवा नाशिककरांची गरज राहणार नाही.
० लोकहितवादी मंडळाची भूमिका- कोरोना नियमांमुळे अंदाजपत्रक फुगले. क्रिकेटचे मैदान घ्यावे लागले. तंत्रज्ञानाचा खर्च वाढला. प्रतिसादामुळे स्टॉलची संख्या वाढली. हॉटेलमध्ये प्रतिनिधी अन् पाहुण्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेत व्यवस्था.
गैरसमज दूर केला जाईल. संमेलनाबाबत लोकहितवादी मंडळ आशावादी आहे. कोरोनाच्या सावटाखाली संमेलन होणार होते. वाढत्या प्रतिसादामुळे संमेलन मोठे करण्याचे ठरले. समित्यांमध्ये ७०० सदस्य आहेत. त्यामुळे केवळ लोकहितवादी मंडळ असा प्रश्नच येत नाही. स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांना भेटू दिले नाही, असे काही नाही. कौतिकराव ठाले- पाटील यांच्याकडे श्री. भुजबळ यांचा संपर्क क्रमांक आहे. त्यांच्याशी ते थेट बोलत होते. दोघांच्या संपर्कात लोकहितवादी मंडळ होते. आक्षेप चर्चेतून दूर व्हावा. साहित्य महामंडळ आणि सरकारचे निर्देश पाळले जातील. आमदारांचा निधी घेता येणार नसेल, तर तो निधी लोकहितवादी मंडळ उभा करेल. -जयप्रकाश जातेगावकर, निमंत्रक, साहित्य संमेलन, नाशिक
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.