Mahavikas Aghadi sakal
नाशिक

Nashik Market Committee Election : बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी?

सकाळ वृत्तसेवा

Nashik Market Committee Election : राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाविरोधात वज्रमूठ बांधणाऱ्या महाविकास आघाडीत मात्र नाशिक जिल्ह्यात बाजार समितीच्या निवडणुकीनिमित्ताने बिघाडी झाली. (market committee elections ncp congress and Shiv Sena Uddhav Thackeray group competing against each other nashik news)

काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) अनेक बाजार समित्यांमध्ये गटा-गटात एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्या तुलनेत शिंदे गट आणि भाजपने एकसंघ राहत तुल्यबळ पॅनल रिंगणात उतरवले आहे. माघारीदरम्यान, अनेक ठिकाणी नाट्यमय घडामोडी घडल्या, तर मनमाड बाजार समितीत ठाकरे व शिंदे गटातील समर्थकांमध्ये हाणामारी झाली.

सिन्नरमध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी थेट शिवसेनेच्या ठाकरे गटात उडी घेतली. सुरगाणा बाजार समितीत १८ जागा बिनविरोध झाल्या असून, देवळा बाजार समितीत आठ आणि नाशिकमध्ये तीन जागा बिनविरोध झाल्याने पॅनलच्या विजयाचा श्रीगणेशा झाला. मनधरणी करता-करता अनेक ठिकाणी अपक्ष रिंगणात राहून गेल्याने तेदेखील आता नशीब अजमावीत आहेत.

जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांमध्ये गुरुवारी (ता.२०) माघारी झाल्यानंतर २२३ जागांसाठी ५३७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. दाखल झालेल्या दोन हजार २७७ उमेदवारांपैकी एक हजार ५९८ उमेदवारांनी माघार घेतली आहे. माघारी प्रक्रिया झाल्यानंतर साधारण सर्व बाजार समित्यांमध्ये नेत्यांनी पॅनलची घोषणा करत निवडणुकांचे रणशिंग फुकंले. बहुतांश बाजार समित्यांमध्ये दुरंगी लढती होत आहे.

दोन वर्षांपासून रखडलेल्या बाजार समित्यांच्या रणधुमाळीत यंदा कधी नव्हे, ते विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. १४ बाजार समित्यांमधील २५२ जागांसाठी विक्रमी दोन हजार ४२० अर्ज प्राप्त झाले होते.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

यात सोसायटी गटात एक हजार ४६१, ग्रामपंचायत गटात ६७८, व्यापारी गटात १८३, हमाल-मापारी गटातील ९८ अर्जांचा समावेश होता. छाननी प्रक्रियेनंतर दोन हजार २७७ उमेदवार रिंगणात होते. यापैकी गुरुवारी एक हजार ५९८ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे ५३७ उमेदवार रिंगणात आहेत.

भाजपविरोधात महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करत, तसे फर्मानच जिल्ह्याला देण्यात आले होते. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट-भाजप अशी लढत होईल, असे मानले जात होते. प्रत्यक्षात, माघारीनंतर महाविकास आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना स्थानिक हेवेदाव्यामुळे गटागटांत विभागली गेली.

पिंपळगाव बाजार समितीत राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर विरुद्ध शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम व गोकुळ गिते यांच्या पॅनलमध्ये लढत होत आहे. सिन्नर बाजार समितीत राष्ट्रवादीचे आमदार अॅड. माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी पॅनल उतरविला आहे.

येथे राष्ट्रवादी अंतर्गत झालेल्या गटबाजीमुळे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी थेट ठाकरेंच्या शिवसेना गटात प्रवेश केला. मालेगाव बाजार समितीत पालकमंत्री दादा भुसे यांचे पॅनल व माजी संचालक अद्वय हिरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये सरळ-सरळ लढत होत आहे. नाशिक बाजार समितीत व्यापारी व हमाल मापाडी अशा तीन जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित जागांसाठी माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या आपला पॅनल व माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या शेतकरी विकास पॅनलमध्ये सरज़ळ लढत होत आहे.

मनमाड बाजार समितीत अनुमोदन देणाऱ्यांकडून माघार होत असल्याने ठाकरे गट व शिंदे गटसर्मथक एकमेकांना भिडले. या वेळी संतप्त झालेले सर्मथकांमध्ये हाणामारी झाली. येवला बाजार समितीत राष्ट्रवादी-शिवसेना विरुद्ध सर्वपक्षीय पॅनल आमनेसामने आले आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेची दोन्ही पॅनलमध्ये विभागणी झाल्याचे दिसून आले.

दिंडोरी बाजार समितीत विद्यमान सभापती दत्तात्रय पाटील, ‘मविप्र’ संचालक प्रवीण जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी उत्कर्ष पॅनलची निर्मित्ती झाली, तर माजी आमदार रामदास चारोस्कर, सहकारनेते सुरेश डोखळे, भाऊलाल तांबडे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनलची निर्मिती झाली आहे. पॅनलची निर्मिती होत असताना दोन्ही पॅनलमध्ये सर्वपक्षीय उमेदवारांचा समावेश असल्याचे दिसून येत आहे.

घोटी बाजार समितीत माजी आमदार शिवराम झोले, ॲड. संदीप गुळवे, गोरख बोडके यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनल, तर माजी सभापती संपत काळे व माजी आमदार काशीनाथ मेंगाळ व जनार्दन माळी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी परिवर्तन पॅनल उतरले असून, तिसरे परिवर्तन पॅनलही त्यांना लढत देत आहे.

कळवण बाजार समितीत आमदार नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली माजी सभापती धनंजय पवार यांचे सत्ताधारी गटाचे शेतकरी विकास पॅनल, तर माजी आमदार जे. पी. गावित यांचा बिनशर्त पाठिंबा असलेले ‘मविप्र’ संचालक रवींद्र देवरे यांचे परिवर्तन पॅनल यांच्यात समोरासमोर लढत आहे.

चांदवडमध्ये अटीतटीच्या लढतीत माघारीनंतर महाविकास आघाडीच्या माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, उत्तम भालेराव व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन आहेर यांच्या नेतृत्वाखाली लोकमान्य परिवर्तन पॅनल व भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर, डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलमध्ये सरळ लढत होत आहे. नांदगावमध्ये आमदार सुहास कांदे पुरस्कृत शिवसेना-भाजपविरुद्ध माजी आमदार ॲड. अनिल आहेर, पंकज भुजबळ यांच्या महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलमध्ये सरळ लढत होत आहे.

सुरगाण्यात १८ जागा बिनविरोध

सुरगाणा बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली असून, जिल्ह्यात बिनविरोध निवडणूक होणारी ही एकमेव बाजार समिती ठरली आहे. निवडणूक रिंगणातून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा दिवशी हिरामण गावित, इंद्रजित गावित, दौलत गावित, जनार्दन भोये या चार जणांनी सोसायटी गटातून अर्ज मागे घेतले.

बोरगावचे सरपंच अशोक गवळी यांनीही माघार घेतल्याने बिनविरोध निवडणुकीचा मार्ग खुला झाला. याआधीच किसान विकास पॅनलचे सोसायटी गटातून चार, व्यापारी गटातून दोन, तर ग्रामपंचायत गटातून एक याप्रमाणे सात उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. माघारीच्या दिवशी सोसायटी गटातून चार व ग्रामपंचायत गटातून एक अशा पाच जणांनी माघार घेतली.

त्यामुळे बाजार समितीची ही निवडणूक बिनविरोध ठरली असून, माकपप्रणीत किसान विकास प्रगती पॅनलचे वर्चस्व सुरगाणा कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रस्थापित झाले आहे. २८ एप्रिलला मतदान होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. मात्र निवडणूक बिनविरोध झाल्याने आता अधिकृत निकालाची औपचारिकताच बाकी आहे.

देवळ्यात आठ जागा बिनविरोध

देवळा बाजार समितीच्या बिनविरोध निवडीला संमिश्र प्रतिसाद मिळाला. १८ जागांपैकी आठ जागा बिनविरोध झाल्या असून, दहा जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात आहेत. बिनविरोध झालेल्यांमध्ये धनश्री केदा आहेर, विशाखा दीपक पवार, दिलीप लालजी पाटील, दीपक काशीनाथ बच्छाव, रेश्मा रमेश महाजन, शाहू गंगाधर शिरसाठ, भास्कर बाबूराव माळी, शीतल योगेश गुंजाळ यांची बिनविरोध निवड झाली.

ठळक घडामोडी

- दोन हजार २७७ उमेदवारांपैकी एक हजार ५९८ उमेदवारांनी घेतली माघार

- मनमाडमध्ये माघारीवरून ठाकरे गट व शिंदे गट भिडले

- एकमेव सुरगाणा बाजार समिती बिनविरोध

- देवळ्यात आठ, तर नाशिकमध्ये तीन जागा बिनविरोध

- अनेक ठिकाणी अपक्षही अजमाविणार नशीब

बाजार समितीनिहाय अर्जांचा लेखाजोखा

बाजार समिती दाखल अर्ज माघार अर्ज रिंगणातील उमेदवार

नांदगाव ११७ ७७ ४०

चांदवड १६१ ११७ ४४

नाशिक १३७ ९७ ४०

मनमाड १२५ ८४ ४१

कळवण १३२ ९० ४०

पिंपळगाव-बसवंत २६८ २२७ ४१

देवळा (१० जागांसाठी) १२९ १०३ १८

मालेगाव २०२ १५६ ४६

घोटी १४४ १०१ ४३

येवला २१७ १६९ ४८

सिन्नर १६९ १२४ ४५

दिंडोरी १४९ १०७ ४२

लासलगाव २१० १४६ ४९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT