पंचवटी (नाशिक) : राज्याबरोबरच जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या अटकावासाठी प्रशासनाने नियमांत अधिक कठोरता आणली असून, बुधवार (ता. १२)पासून घराबाहेर पडण्यास पुढील अकरा दिवसांसाठी संपूर्ण बंदी घातली आहे. त्यामुळे दिंडोरी रोडवरील नाशिक बाजार समितीतील व्यवहार ठप्प होणार आहे. याशिवाय मोठे धार्मिक महत्त्व असलेल्या रामकुंडावरील श्राद्धादी विधींवरही प्रशासनाने बंदी घातल्याने आता हे विधी होणार कसे, याबाबत पुरोहितांसह ज्यांच्या घरी विधी आहे, त्यांना प्रश्न पडला आहे. (Market committees and religious ceremonies will be closed in Nashik)
बाजार समिती पुढील अकरा दिवस बंद
वाढत्या कोरोनाच्या उद्रेकामुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत, प्रशासनाने जंग जंग पछाडूनही कोरोनाची साखळी तुटत नसल्याने जिल्हा प्रशासनाने बुधवारपासून पुढील अकरा दिवस म्हणजे २३ मेपर्यंत कडक लॉकडाउनची घोषणा केली आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारणांशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. एवढेच नव्हे, तर दूध विक्रेते, हॉटेल, रेस्टाॅरंट, मद्यविक्री केंद्रांना सकाळी सात ते बारापर्यंत घरपोच सेवा देता येणार आहे. या काळात आठवडेबाजार, बाजार समित्या बंदच राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेली बाजार समिती पुढील अकरा दिवस बंद राहणार आहे.
बाजार समितीवर जबाबदारी
पुढील अकरा दिवसांपासून जिल्हाभरातील बाजार समित्या बंदच राहणार आहेत. मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची विक्री करण्यासाठी पद्धत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित बाजार समित्यांवरच टाकण्यात आली आहे. तसेच समन्वयाची जबाबदारी जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांच्यावर टाकण्यात आली आहे. त्यामुळे २४ तास वर्दळ असलेली नाशिक बाजार समिती बंदच राहणार आहे.
पुरोहित वर्गात संभ्रम
अंत्यविधी अत्यावश्यक सेवेत मोडतो. मात्र संबंधित व्यक्तीच्या दशक्रिया विधीसह तेरावा व अन्य विधींना मात्र प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे गंगाघाटावर होणारे दशक्रिया व अन्य विधी होणार की नाही, याबाबत पुरोहित वर्गात संभ्रम आहे. याबाबत गंगा गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्याशी संपर्क साधला असता प्रशासनाला गंगाघाटावरील धार्मिक विधी रोखता येत नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे आता हे विधी गंगाघाटावर होतात की प्रशासनाच्या धाकाने बंदिस्त जागेत होतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.