नाशिक : पाथर्डी फाटा येथे नेहमीप्रमाणे सिगारेट घेतल्यानंतर घरी जाण्यासाठी योगेश मोगरे त्याच्या कारकडे गेले. त्यावेळी कार चोरीच्या उद्देशाने दबा धरून असलेल्या दोघा संशयितांनी मोगरे यांच्याकडील कारची चावी हिसकाविण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी मोगरे यांनी दोघा संशयितांना जोरदार प्रतिकार केल्याने संशयितांनी त्यांच्याकडील चाकूने मोगरे यांच्या पोटात वार केल्याने गंभीररित्या जखमी मोगरे यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. मोगरे यांनी संशयितांकडे हत्यार असताना प्रतिकार केला नसता तर त्यांचे प्राण वाचले असते...
याप्रकरणी शहर गुन्हेशाखेच्या पथकाने हरियाणातून एका अल्पवयीन संशयिताला अटक केली असून, ते मुंबई फिरण्यासाठी आणि श्रीमंत व्यक्तीची कारसह अपहरण करण्याच्या उददेशाने आल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. मुख्य संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत. (Mogre Murder Case Finally successful case solved nashik crime news)
अंबड औद्योगिक वसाहतीतील रोहिणी इंडस्ट्रिजचे सीईओे योगेश मोगरे (रा. इंदिरानगर) यांच्यावर गेल्या २३ तारखेला रात्री प्राणघातक हल्ला झाला होता. उपचारादरम्यान अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यु झाला होता. इंदिरानगर पोलिसात अज्ञात संशयितांविरोधात खुन, जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.
घटनास्थळावरून संशयितांनी मोगरे यांची किया कारमधून पसार झाले. सदरील कार महामार्गावरील वाडिवऱ्हे शिवारातील बेलगाव कुऱ्हे रोडवर दुसऱ्या दिवशी सापडली होती.
घटनास्थळावर सीसीटीव्ही नसल्याने कोणताही ठोस पुरावा पोलिसांच्या हाती नसताना गुन्हेशाखेच्या पथकाने परिश्रम घेत पुरावे संकलित करीत संशयितांचा माग काढला आणि दोघा संशयितांपैकी एका १७ वर्षीय अल्पवयीन संशयिताला हरियाणातील त्याच्या गावातून अटक केली आहे.
तर, मुख्य संशयित अजितसिंग सत्यवान लठवाल (रा. चुडाना, हरियाणा) याच्या मागावर दोन पथके असून, त्यास लवकर अटक करण्यात येईल, असे शहर गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी सांगितले.
सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट दोनचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक निरीक्षक सूर्यवंशी, सोनवणे, उपनिरीक्षक पोपट करवाळ, गुलाब सोनार, राहुल पालखेडे, आदींच्या पथकाने कारवाई केली.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
हरियाणातून आले किडनॅपिंगसाठी...
संशयित दोघेही एका मित्रासमवेत गेल्या १५ मार्च रोजी मुंबई फिरण्यासाठी आणि या दरम्यान, श्रीमंत व्यक्तीला हेरून त्याच्या कारसह अपहरण करून खंडणी उकळण्याचा त्यांचा कट होता. त्यांचा तिसरा मित्र परत हरियाणाला निघून गेल्यानंतरही दोघे संशयित मुंबईत फिरताना सावज हेरत होते.
परंतु त्यात त्यांना यश आले नाही. ते नाशिकला रेल्वेने २३ तारखेला आले. पाथर्डी फाटा येथे मोगरे हे त्याच्या किया कारमधून आले असता, ते एकटे असल्याने त्यांची कार चोरून पोबारा करण्याचा त्यांनी बेत रचला. मात्र, मोगरे यांनी त्यांना जोरदार प्रतिकार केला. त्यामुळे संशयितांनी त्यांच्याकडील चाकूने मोगरे यांच्या पोटात २२ ते २४ वार केले.
पाच ते सात मिनिटांच्या या झटापटीत संशयितांच्या हातालाही जखमा झाल्या. मोगरे खाली कोसळल्यानंतर संशयितांनी कार घेऊन मुंबईच्या दिशेने पलायन केले. यावेळी टपरीचालकाने कारच्या दिशेने दगड भिरकावला असता, कारची काच फुटून एकाच्या डोक्याला लागला.
संशयितांनी जखमी अवस्थेत बेलगाव कुऱ्हेपर्यंत कार नेत तिथे सोडून रात्र जंगला घालविली. रक्ताने माखलेले कपडे जंगलातच फेकून ते दुसऱ्या दिवशी पुन्हा नाशिकरोड रेल्वेस्टेशनवर आले आणि रेल्वेने हरियाणाला निघून गेले.
ती पिशवी, त्यातील कागदपत्रे ठरले दिशादर्शक
घटनास्थळापासून काही अंतरावर पोलिसांना एक बेवारस पिशवी सापडली होती. त्यात संशयितांनी मुंबईत कपडे खरेदी केल्याची बिले होती. त्यावरून पोलिसांनी मुंबई, रेल्वे तिकिटावरून संशयितांचे छायाचित्र मिळविले.
तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला. दोन पथके तात्काळ हरियाणाच्या दिशेने रवाना करण्यात आली आणि दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन संशयिताला त्याच्या घरातून पोलिसांनी अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.