मालेगाव : मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्यानंतर शहरासह कसमादे भागात लोणचे भरण्याची लगबग सुरु आहे. कसमादे भागात कैऱ्यांचे प्रमाण या वर्षीही जेमतेमच आहे. लोणच्यासाठी गावठी कैऱ्यांना पसंती दिली जात आहे. कळवण, देवळा, नामपूर, दिंडोरी या भागातून येथील बाजारात कैरी (Raw Mango) विक्रीसाठी येत आहेत. सध्या येथील भाजीपाला बाजारात रोज २५ टन कैऱ्यांची आवक आहे. येथे महिनाभरात ७५० टन कैऱ्यांची विक्री झाली आहे. २० ते ३० रुपये किलोप्रमाणे लोणच्याची कैरी मिळत आहे.
जून महिन्याचा पहिला पाऊस पडल्यानंतर शहरासह ग्रामीण भागात लोणचे टाकायला सुरवात होते. कसमादेत आंब्यांची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत. गावठी आंबा या भागाची ओळख आहे. मॉन्सूनपुर्व वादळी पावसात कैऱ्यांची पडझड झाली. आहे त्या कैऱ्या उतवरुन बाजारात विक्रीसाठी आणल्या जात आहेत. कळवण, देवळा व दिंडोरी भागातील आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर कैऱ्या तोडून मालेगावच्या बाजारात विक्रीसाठी आणत आहे.
येथे रोज दहा पिकअपमधून २५ टन कैरी विक्रीसाठी येते. बाजारात २५ मेपासूनच कैरी विक्रीला सुरवात झाली. सुरवातीला बाजारात दहा टन कैरी येत होती. पाऊस पडताच आवक वाढून ती २५ टनावर गेली. मालेगाव शहर व परिसरात आतापर्यंत दोन ते तीन दमदार पाऊस झाले. त्यानंतर येथे लोणचे टाकायला नागरीकांनी सुरवात केली. शहरातील सरदार चौक, एकात्मता चौक, सोमवार बाजार, सटाणा नाका आदी ठिकाणी कैऱ्या विक्री केल्या जात आहेत. एकात्मता चौकात कैऱ्यांबरोबरच नागरिकांना अडकीत्यावर दहा रुपये किलोप्रमाणे कैऱ्या फोडून दिल्या जात आहेत. आणखी आठवडाभर बाजारात तेजी राहणार असल्याचे घाऊक विक्रेते मातोश्री ट्रेडिंग कंपनीचे संचालक महेंद्र उर्फ बाबा वाघ यांनी सांगितले.
आठवडे बाजारातही धूम
कसमादे बरोबरच गुजरात, कर्नाटक व आंध्रप्रदेश आदी राज्यातून कैरी येथे विक्रीसाठी येत आहे. कर्नाटक व आंध्रप्रदेशमधील आवक घटली आहे. लोणच्याची लगबग एकदम वाढल्याने गुजरातची कैरी महागली आहे. अशा परिस्थितीत कसमादेची गावठी कैरी भाव खात आहे. आणखी आठ ते दहा दिवस लोणच्याच्या कैरीला मागणी असेल. ग्रामीण भागात बहुतांशी कुटुंबियांचे लोणचे भरले आहे. शेतकरी व मोठ्या कुटुंबात दीडशे ते दोनशे कैऱ्यांचे लोणचे भरले जाते. शहरी भागात २५ ते ५० कैऱ्यांचे लोणचे भरण्यास पसंती दिली जात आहे. ग्रामीण भागात सध्या आठवडे बाजारात गावठी कैरीची धूम आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.